प्रेयसीचा गळा चिरून चेहऱ्याची त्वचा ओरबाडली

मेडिकल परिसरातील धोबीघाट परिसरात हत्याकांडाच्या ठिकाणी पाहणी करताना अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त श्‍यामराव दिघावकर, उपायुक्‍त रवींद्र परदेशी, गुन्हे शाखेचे सोमनाथ वाघचौरे आणि प्रदीप अतुलकर.
मेडिकल परिसरातील धोबीघाट परिसरात हत्याकांडाच्या ठिकाणी पाहणी करताना अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त श्‍यामराव दिघावकर, उपायुक्‍त रवींद्र परदेशी, गुन्हे शाखेचे सोमनाथ वाघचौरे आणि प्रदीप अतुलकर.
Updated on

नागपूर - अनैतिक संबंधातून घरात वाद होत असताना प्रेयसीच्या वाढत्या मागण्यांना कंटाळून मेडिकलच्या शवविच्छेदन विभागात कार्यरत कर्मचाऱ्याने प्रेयसीचा सर्जिकल चाकूने गळा चिरून खून केला. तिची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर रसायन टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. अंगावर काटा आणणारे हे हत्याकांड शनिवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आले. या प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपी गुरुदयाल राजमन पाठक (वय ४५, बालाजीनगर, मानेवाडा) याला अटक केली आहे. अर्चना अनिल भगत (वय ३२, रा. भांडे प्लॉट) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे.

शनिवारी सकाळी मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक ४९ च्या मागील भागात असलेल्या कचराघराजवळील झुडपात एका महिलेचा मृतदेह पडून असल्याची सूचना पोलिस नियंत्रण कक्षाकडून मिळाली. मेडिकलमध्ये उपचारासाठी भरती असलेल्या रुग्णाचा नातेवाईक शौचास गेला असता त्याला निर्वस्त्र अवस्थेतील महिलेचा मृतदेह दिसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाजवळ गुलाबी रंगाची महागडी साडी होती. महिलेचा गळा कापल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. तर, मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर रसायन टाकण्यात आले होते. पोलिसांनी लगेच मृतदेह मेडिकलच्या शवविच्छेदनगृहात नेला.

घटनास्थळावर अतिरिक्‍त आयुक्‍त श्‍यामराव दिघावकर, पोलिस उपायुक्‍त रवींद्रसिंग परदेशी पोहोचले. अजनी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे.

सर्जिकल ब्लेडचा वापर
अर्चना हिचा गळा चिरला असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. गळा चिरण्यासाठी कोणत्या धारदार चाकूचा नव्हे, तर सर्जिकल ब्लेडचा वापर करण्यात आला. तसेच महिलेच्या चेहऱ्यावर रसायन टाकून चेहऱ्याची त्वचा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्जिकल ब्लेड वा रसायन सामान्य व्यक्‍तीला मिळणे कठीण आहे. तसेच मृतदेह मेडिकलच्या परिसरात आढळून आला. त्यामुळे आरोपी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्याची खात्री पोलिसांना होती. त्या दिशेने पोलिसांनी तपास केला.

हुशारी आली अंगलट
गुरुदयाल मेडिकलमध्ये शवविच्छेदनगृहात सहायक परिचालक पदावर कार्यरत आहे. शनिवारी त्याची साप्ताहिक सुटी होती. तरीही तो शवविच्छेदनगृहात होता. पोलिसांच्या कारवाईत तो ढवळाढवळ करीत होता. ‘मृत महिलेवर बलात्कार झालाच नाही’ असे त्याने पोलिसांना सांगितले. त्यामुळे ‘डॉक्‍टर नसूनही ठामपणे तू हे कसे सांगत आहे’ असा सवाल पोलिसांनी केला. त्यावर तो गडबडला आणि पोलिसांना त्याचा संशय आला.

असा लागला सुगावा
अजनी ठाण्यातील महिला पोलिस शिपाई वनिता मोटघरे यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. ऑगस्ट महिन्यात एका महिलेची अजनीत तक्रार दिली होती. त्या तक्रारीत शवविच्छेदनगृहात काम करणाऱ्या व्यक्‍तीच्या पत्नीने आपल्या पतीचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. ती बाब लक्षात येताच वनिता यांनी लगेच संशय व्यक्‍त करीत अर्जावरून संबंधित व्यक्‍तीचे नाव आणि पत्ता अधिकाऱ्यांना दिला.

अर्चनाला पैशाचा मोह
गुरुदयाल आणि अर्चना या दोघांनाही दारूचे व्यसन होते. शुक्रवारी त्या दोघांनीही घरी दारू ढोसून मटण खाल्ले. रात्री साडेनऊ वाजता दोघेही मेडिकलमध्ये आले. कचराघराजवळ त्यांनी जागा स्वच्छ केली आणि तेथेही दारू ढोसली. दोघांमध्ये दिवाळीच्या खरेदीवरून वाद झाला. यानंतर त्याने अर्चनाच्या छातीवर लाथ मारून तिला बेशुद्ध पाडले. ती मेल्याचा समज झाल्याने त्याने लगेच सर्जिकल ब्लेड, रसायन आणि तिचा गळा कापून चेहऱ्याची त्वचाही ओढली. तिची ओळख पटू नये म्हणून त्यावर रसायन टाकले. अर्चनाचा पती रिक्षाचालक आहे. तिला दोन मुले असून पाठकलाही एक मुलगा आहे.

असा झाला उलगडा
अर्चना भगत हिच्या मृतदेहाजवळ घराच्या कुलपाची किल्ली पोलिसांना सापडली. पोलिसांनी गुरुदयाल पाठक याचा शोध घेतला असता तो आढळून आला नाही. पोलिसांनी त्याच्या पत्नीकडून प्रेयसीच्या घराचा पत्ता मिळवला. त्या घराचे कुलूप किल्लीने उघडले. त्यावरून मृतदेह अर्चनाचाच असल्याची खात्री पटली. तिचा प्रियकर गुरुदयाल याच्या पत्नीनेही अनिताबाबत तक्रार दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.