मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव,जि.सांगली) येथील हणमंतराव मोहिते यांची ३५ एकर शेती. प्रतिकूल परिस्थितीतून ते स्वतः शिक्षित झाले. तीनही मुलांना शिक्षित केले. आज वयाच्या ६४ व्या वर्षी देखील ते शेती नियोजनात रमले आहेत. गेल्या पाच वर्षापासून मोहिते बंधूंनी सुधारित पद्धतीने केळी लागवड करून निर्यातक्षम उत्पादनात वेगळी ओळख तयार केली आहे.
सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव (ता.कडेगाव) हे दुष्काळ पट्ट्यातील गाव. या गावातील ६४ वर्षे वयाचे प्रयोगशील शेतकरी हणमंतराव जनार्दन मोहिते. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कुटुंबाची ३५ एकर शेती. परंतु पाणी नसल्याने शेती कोरडवाहूच. सन १९७२ मध्ये दुष्काळ पडला. त्या काळात त्यांना शिक्षणामुळे पाटबंधारे खात्यामध्ये सर्वेअरची नोकरी मिळाली. परंतु नोकरी करणे वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे वर्षभरात मिळाली नोकरी सोडून त्यांनी शेती नियोजनात लक्ष देण्यास सुरुवात केली. दुष्काळाचा सामना करत शेती चांगल्या पद्धतीने विकसित केली. मोहिते यांचे १५ सदस्यांचे कुटुंब आहे. मोठा मुलगा दत्तात्रय यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून ते सांगली येथे नोकरी करतात. सचिन यांनी बी कॉम आणि जयवंत यांनी एम ए शिक्षण घेतले आहे. सध्या सचिन आणि जयवंत हे दोघे मिळून शेती नियोजन पाहतात. आई शिलावती यांचेही शेती नियोजनात मार्गदर्शन मिळते.
शेती झाली बागायती
सन १९९५ साली ताकारी योजनेचे शिवारात पाणी आले. त्यामुळे मोहिते बंधूंनी पीक पद्धतीमध्ये बदल झाला. सुरुवातीच्या काळात तांत्रिक अडचणीमुळे ताकारी योजनेचे पाणी वेळेवर मिळत नव्हते. त्यामुळे दहा वर्षात ३५ एकरामध्ये मोहिते यांनी सहा विहिरी आणि दोन कूपनलिका घेतल्या. वर्षभर शाश्वत पाण्याची उपलब्धता झाली. जमिनीची पाणी धारण क्षमता आणि पोत वाढविण्यासाठी चांगल्या प्रतीच्या गाळाची माती मिसळली. हळद, ऊस लागवड सुरू झाली. परंतु मध्यंतरीच्या काळात हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने ऊस उत्पादनाला फटका बसला. त्यामुळे पुन्हा एकदा पीक बदलाचे नियोजन सुरू झाले. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी ताग,धैंचा या पिकांची लागवड केली जाते. उसाचे पाचट देखील जमिनीत कुजवले जाते. शेणखताचा जास्तीत जास्त वापर केला जातो. शेणखताची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिवाणू खतांचा वापर होतो. याचबरोबरीने गांडूळ खत, जीवामृत आणि दशपर्णी अर्काचा देखील चांगल्या प्रकारे वापर केल्याने पिकाचे दर्जेदार उत्पादन मिळते. गरजेनुसार माती,पाणी, पान व देठाची प्रयोगशाळेत तपासणी करून पीक व्यवस्थापनावर मोहिते यांचा भर आहे. शेतकऱ्यांसाठी जयवंत मोहिते यांनी 'अन्नदाता सुखी भव' हा फेसबुक आणि व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे.
केळी लागवडीला सुरुवात
साधारणपणे २०१४ पासून मोहिते बंधूंनी केळी लागवडीला सुरुवात केली. लागवडीपूर्वी प्रयोगशील शेतकरी तसेच तज्ज्ञांच्याकडून पीक नियोजन आणि व्यवस्थापनाची माहिती घेतली. मोहिते यांनी ग्रॅंन नैन या जातीच्या लागवडीला प्राधान्य दिले. दरवर्षी चार ते पाच एकरावर सुधारित पद्धतीने केळी लागवडीचे नियोजन असते. याबाबत जयवंत मोहिते म्हणाले की, लागवड २५ मे १० जून दरम्यान केली जाते. आम्ही जोड ओळ पद्धतीने लागवड करतो. दरवर्षी पुरेसे शेणखत, रासायनिक खतांची शिफारशीत मात्रा देऊन लागवड करतो. दोन जोड ओळीतील अंतर साडे तीन फूट आणि त्यानंतर सहा फुटाचा पट्टा राहतो. रोप लागवडीचे अंतर पाच फूट असते. एकरी रोपांची संख्या १,४५० बसते. या पद्धतीचा फायदा म्हणजे मशागत करणे सोपे जाते. मधील पट्यात उडीद, भुईमूग, सोयाबीन ही आंतरपिके घेतो. वाढीच्या काळात ठिबक सिंचनाने शिफारशीत खतमात्रा तसेच पीक व्यवस्थापन करणे सोपे होते. ब्लोअरद्वारे फवारणी केली जाते. घडांची बांधणी करणे सोपे झाले आहे. वादळी वाऱ्याने बाग पडण्याचे प्रमाण कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे उत्पादनात चांगली वाढ मिळाली. आम्हाला एकरी सरासरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. केळी घडांची योग्य पद्धतीने काढणी केली जाते. आम्हाला सरासरी ४५ किलोचा घड मिळतो. एकरी ४५ टन उत्पादनात सातत्य आहे. दर्जेदार केळीची कंपनीच्या माध्यमातून आखाती देशात निर्यात होते. केळी घड स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकिंगसाठी शेतामध्ये सर्व सुविधांची उभारणी केली आहे.
केळी क्षेत्र आणि उत्पादन
वर्ष | क्षेत्र | उत्पादन (टन) | सरासरी दर (रुपये प्रति किलो |
२०१७ | दीड एकर | ५५ | ११.३० |
२०१८ | तीन एकर | १२५ | १०.५० |
२०१९ | तीन एकर | १५० | १२.७५ |
२०१९ | दोन एकर | ८० | ११ |
विहीर जोड प्रकल्प
उपलब्ध पाण्याच्या योग्य वापर होण्यासाठी मोहिते यांनी संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. सध्या त्यांच्याकडे सहा विहिरी, दोन कूपनलिका आहेत. संरक्षित पाण्यासाठी ५० लाख लिटर क्षमतेचे एक शेततळे आहे. विहीर आणि कूपनलिकेचे पुनर्भरण केले जाते. पाणी व्यवस्थापनाबाबत जयवंत मोहिते म्हणाले की, आमचे क्षेत्र विभागून आहे. प्रत्येक ठिकाणी विहीर आहे. मात्र संपूर्ण क्षेत्राला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी एकाच ठिकाणाहून शेतीसाठी पाणी पोहोचले पाहिजे, याचा विचार केला. आमच्या शेती परिसरातून ताकारी योजनेचा कालवा जातो. यातून सायफनद्वारे विहिरीत पाणी घेतले जाते. प्रत्येक क्षेत्रातील विहिरी पाइपलाइनने जोडलेल्या आहेत. यासाठी सुमारे ४५ लाख रुपये खर्च आला.
स्वयंचलित सोलर पंप
शेतीचा आराखडा
शेती नियोजनाबाबत दत्तात्रय मोहिते म्हणाले की, आम्ही शेती व्यावसायिक पद्धतीने करतो. लागवडीपासून ते विक्रीपर्यंतच्या सर्व आर्थिक नोंद ठेवतो. यातून कोणत्या वर्षी शेतीमालाला किती दर मिळाला कळते, त्यानुसार पुढील काळात पीक नियोजन करणे सोपे होते.
पशू आणि कुक्कुटपालनाची जोड
जनावरांसाठी मुक्तसंचार गोठा ः १० संकरित गाई,५ देशी गाई, ५ म्हशी
२०० सुधारित देशी कोंबड्यांचे संगोपन. दीड किलोचा कोंबडा ६०० रुपये आणि कोंबडी ४०० रुपये प्रति नगाने गावामध्येच विक्री.
एकूण शेती - ३५ एकर
हणमंतराव मोहिते यांचा सन्मान
सन २०१२ - पशुसंवर्धन विभागाचा उत्कृष्ट गोपालक पुरस्कार
सन २०१८ - मध्ये जलव्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कामाबद्दल महाराष्ट्र राज्य स्तरीय ‘आयडियल फार्मर अवॉर्ड''
सन २०१९ - सह्याद्री वाहिनीचा पाणी नियोजनासाठी ‘कृषी सन्मान २०१९‘ पुरस्कार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.