एकमेकांच्या साथीनेच जिद्दीने फुलवली एकात्‍मिक शेती

माने दांपत्याने सुरू केलेला गांडूळखतनिर्मिती व्यवसाय.
माने दांपत्याने सुरू केलेला गांडूळखतनिर्मिती व्यवसाय.
Updated on

उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या अनसुर्डा गावातील सौ. अर्चना व गोकूळ या माने दांपत्याची केवळ साडेतीन एकरांपर्यंतच शेती आहे. पण एकमेकांना समर्थ साथ देत, प्रोत्साहन देत त्यांनी जिद्दीने ती फायदेशीर केली. शिवाय शेळीपालन, कोंबडीपालन, गांडूळखत व्यवसाय आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे मार्ग व्यापक केले. सौ. अर्चना आज केवळ महिला शेतकरी म्हणून राहिलेल्या नसून बचत गटातील सक्रीय सदस्य व प्रशिक्षकदेखील झाल्या आहेत. 

पूर्वीच्या काळी असलेले पुरुषसत्ताक विचारसरणीचे जोखड आज कुठेतरी कमी होताना दिसत आहे. महिला केवळ चूल आणि मूल यात अडकून राहिलेल्या नाहीत. शेतीसह समाजकारण, राजकारण अशा क्षेत्रांमध्ये त्या कर्तृत्व गाजवू लागल्या आहेत. उस्मानाबाद शहरापासून सुमारे वीस ते बावीस किलोमीटरवर अाडवळणाला अनसुर्डा गाव आहे. इथली माने दांपत्याची कथा काहीशी या विषयाशी संबंधितच आहे. 

माने दांपत्याची वाटचाल
मुख्य रस्त्यापासून पाच-दहा किलोमीटर आत असलेल्या अनसुर्डा गावात जायला अरुंद खाचखळग्याचा रस्ता. गोकूळ व सौ. अर्चना हे माने दांपत्य या गावात राहते. हे कुटुंब तसे अल्पभूधारक म्हणजे शेती केवळ साडेतीन एकर. पण कष्टांना विश्रांती न देता सतत उद्योगी राहात या कुटुंबाने आपल्या कुटुंबाची साधलेली प्रगती निश्चित लक्षात घेण्याजोगी आहे.

संसाराची कसरत व धडाडी 
सौ. अर्चना अत्यंत धडाडीच्या महिला शेतकरी. सासरी येण्यापूर्वी केवळ दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण झालेले. पतीने प्रोत्साहन दिल्याने बीए पर्यंत शिक्षण त्यांना घेता आले. दोघे मिळून शेतीत राबतात. शेती कोरडवाहू. निसर्गाच्या तडाख्यातून हाती फारसे लागत नव्हते. केवळ चार पत्र्याच्या खोलीत संसार रेटण्याची केविलवाणी कसरत सुरू होती. मात्र अंगात असलेला धडाडीचा गुण अर्चना यांनी कृतीत आणला. घरची शेती करण्याबरोबर महिला गटाच्या कामात त्या सक्रीय झाल्या. पतीचा पाठिंबा मिळू लागला. स्वयंशिक्षण प्रयोग परिवार व कृषि विभागाच्या ‘आत्मा'' अंतर्गत छोटी-मोठी कामे करण्याची संधी मिळायची. आरोग्य सेविका म्हणून परिसरातील महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्याचे जिकीरीचे काम अर्चना यांनी लिलया करून दाखवले. अशातच गावातील महिलांनी पुढाकार घेत `उभी बाटली आडवी'' करण्याचे आंदोलन यशस्वी केले. एकी वाढली. त्यातूनच २०११ मध्ये ‘झाशीची राणी महिला गट’ तयार केला. त्यातून प्रत्येकीने आपली घरची आर्थिक स्थिती सुधारण्याकडे लक्ष द्यायला सुरवात केली. 

शेतीचे व्यवस्थापन 
आज माने दांपत्याने आपल्या साडेतीन एकरांत एक एकर क्षेत्र केवळ भाजीपाला पिकांना दिले आहे. यात वांगी, मिरची, कांदा, दोडका, भोपळा अशी विविध पिके असतात. शेतातील बहुतांश कामे पती पत्नी मिळूनच करतात. विक्रीची जबाबदारी मुख्यतः गोकूळ यांची असते. 

कोंबडीपालन
शेळीपालनाला गावरान कोंबडीपालनाची जोड दिली आहे. सुरवातीला केवळ एक कोंबडी होती. आता ही संख्या १०० पर्यंत नेण्यात हे दांपत्य यशस्वी झाले आहे. नर प्रतिनग ५०० रुपये तर मादी साडेतीनशे रुपये दराने तर अंडे प्रतिनग आठ रुपये दराने विकण्यात येते. या व्यवसायातून महिन्याला सहा हजारांपासून ते नऊ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 

शेतीतील नियोजन 
शेळ्यांसाठी लागणारा चारा स्वतःच्याच शेतात तयार होतो. अर्धा एकरात मका, जयवंत गवताचा हिरवा चाराही मिळतो. 

स्वच्छ पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्थाही शेळ्या व कोंबड्यांसाठी केली आहे. वेळच्या वेळी त्यांचे लसीकरण केले जाते. 

एका जागी शेळ्यांना बांधून चालत नाही. त्यांना मोकळ्या हवेत नेले जाते. 

सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यावर भर असतो. त्यामुळे आरोग्यदायी अन्न खाण्याचे समाधान मिळते.

सतत वेगवेगळी धडपड करीत राहणाऱ्या अर्चना यांना पुरस्कारही मिळाले आहेत. पुणे येथील वसुंधरा फाउंडेशनचा कृषिमित्र पुरस्कार अलीकडे मिळाला. 

गावातील सावकारी झाली बंद 
स्वयंम शिक्षण प्रयोग परिवाराकडून सौ. अर्चना यांच्या महिला बचत गटाला कर्ज मिळू लागले. महिला त्या वेळेवर भरू लागल्या. पूर्वी सावकाराकडून कर्ज काढावे लागे. आज सहा वर्षांत गावातील संपूर्ण बेकायदा सावकारी मोडून काढण्यात या महिला यशस्वी झाल्या अन्‌ मोडून जाऊ शकणारे अनेक संसार सावरले. एवढे सगळे करूनही अर्चना थांबलेल्या नाहीत. घरी रेडिमेड कपडे व साडी विक्री व्यवसाय देखील त्या चालवतात. 

उल्लेखनीय प्रगती  
पूर्वी माने दांपत्य पत्राच्या साध्या घरात राहायचे. शेती व पूरक व्यवसाय यांतून प्रगती साधत माने दांपत्याने आज स्लॅबचे टुमदार घर बांधले आहे याचा त्यांना निश्चित अभिमान आहे. दोन्ही मुलांना शिक्षणासाठी उस्मानाबाद येथे ठेवले आहे. कडबा कुट्टी यंत्र व शेड बांधले आहे. परिसरातील गावातील महिलांना आपल्या पायावर उभे राहण्याचे प्रशिक्षण देण्याइतपत अर्चना यांची जबाबदारी वाढली आहे. ती त्या लिलया पेलतात. आपल्या कुटुंबाचे निर्णयही घेतात. गावातील अनेक महिला आज विविध कामांत सक्रीय आहेत. त्यांच्या या योगदानामुळेच अनसुर्डा गाव प्रगतिपथावर आहे. 

जलयुक्तमध्ये सहभाग 
चालू वर्षी जलयुक्तमध्ये अनसुर्डा गाव आले. `पाणी फाउंडेशन`च्या वॉटर कप स्पर्धेत  सहभागी झाले. या चळवळीत अख्खा गाव श्रमदान करतोय. गाव पाणीदार करण्यासाठी लहान-थोर खांद्याला खांदा लावून झटताहेत. गावात पूर्वी कोरडवाहू पिके घेतली जायची. आज भाजीपाला, दुग्धव्यवसाय, शेळी, कोंबडीपालन, पूरक व्यवसायांमुळे गावातल्या हरेकाच्या हाताला काम मिळाले आहे. गावचा विकास होण्यामध्ये महिलांचा वाटाही महत्त्वाचा राहिला आहे.

गांडूळखत व्यवसाय
उत्पन्नाचे स्त्रोत वाढवताना गांडूळखताचे दहा बेड उभारले आहेत. चार बेडसमधील उत्पादन आपल्या शेतासाठी वापरले जाते. उर्वरित खताची विक्री किलोला ८ रुपये या दराने केली जाते.

शेळीपालन 
केवळ शेतीवर अवलंबून राहणे शक्य नव्हते. परिस्थिती सुधारण्यासाठी माने यांनी उस्मानाबादी शेळ्यांचे पालन अर्धबंदिस्त पध्दतीने सुरू केले. आज त्यांच्याकडे २५ ते ३० शेळ्या आहेत. नरांची विक्री करून वर्षाला सुमारे एक ते दीड लाख रूपयांपर्यंत उत्पन्न हाती येते. शिवाय घरच्या शेतीला लेंडीखत मिळते. गांडूळखत निर्मितीत त्याचा उपयोग होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.