केवळ पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार शेती 

केवळ पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार शेती 
Updated on

निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ अडसुरे यांनी दहा वर्षांपासून केवळ पावसाच्या पाण्यावर म्हणजे जिरायती पद्धतीने तूर, मूग व हरभरा आदींच्या उत्पादनात व गुणवत्तेत सातत्य ठेवले आहे. कोरडवाहू परिसर असूनही पेरणी पद्धतीत तसेच वाणबदल केले आहेत. सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेले अडसुरे आज पूर्णवेळ शेतकरी होऊन शेतीची सेवा बजावत आहेत. 

निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ अडसुरे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांनी अकोले, श्रीगोंदा, नगर तालुक्यांत सुमारे पस्तीस वर्षे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून नोकरी केली. दोन वर्षांपूर्वी ते सेवेतून निवृत्त झाले. त्यांची वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. नगर तालुक्यातील निमगाव घाणा, खारेकर्जुने, निबंळक हा परिसर कायम जिरायती असतो. त्यामुळे या भागात कित्येक वर्षांपासून पावसावरच आधारित खरी मूग, बाजरी तर रब्बीत ज्वारी, करडईचे उत्पादन घेतले जाते. अडसुरे यांची शेतीही जिरायती. नोकरीत असताना ते मजुरांकरवी शेती करीत. ज्वारी, हुलगे, मूग, गव्हाचे उत्पादन घेत. गेल्या दहा वर्षांत त्यांनी पीक पद्धतीत टप्प्याटप्प्याने बदल केला आहे.  अलीकडील काळात दरांची हमी असलेल्या हरभरा, मूग, तुरीच्या उत्पादनाकडे ते वळले आहेत.

पीक फेरपालट
दहा एकर क्षेत्रापैकी सलग चार एकरांचे दोन व दोन एकरांचा एक प्लॅट आहे. दोन एकरांला पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने त्यात गहू, मक्यासारखी पिके घेतात. मात्र आठ एकरांवर दरवर्षी खरीप मूग, तूर आणि हरभरा ही पिके घेण्यात सातत्य ठेवले आहे. गेल्या वर्षी जे पीक घेतले त्याजागी पुढील वर्षी दुसरे पीक घेत फेरपालट करतात. या वर्षी प्रत्येकी चार एकरांवर तूर व मूग व मुगानंतर हरभरा घेतला आहे. 

लागवड पद्धतीत बदल 
कडधान्य उत्पादनात हातखंडा असलेल्या अडसुरे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कडधान्य विभागाचे प्रमुख डॉ. एस. एन. कुटे यांचे मार्गदर्शन घेतले आहे. पूर्वी मुगाची दोन ओळींत साधारण १२ ते १४ इंच अंतर ठेवून पेरणी करत. तीन वर्षांपासून हे अंतर १८ इंच ठेवले आहे. या बदलामुळे बियाणे वापरही कमी झाला आहे. शिवाय अंतर वाढल्याने मधल्या जागेत पाण्याचा निचरा होण्याला मदत झाली. त्यामुळे अधिक पाऊस झाला तरी नुकसान कमी होते. 

आता तुरीच्याही दोन ओळीत तीन फुटांचे अंतर तर दोन झाडांमध्ये एक फुटाचे अंतर ठेवून पेरणी केली जाते. त्यामुळे झाड वाढले तरी वाढ होण्याला पुरेशी जागा उपलब्ध राहते. या वर्षी चांगल्या पावसासह तुरीला पोषक वातावरण तयार झाल्याने झाडाला सुमारे १५०० पर्यंत शेंगा लागल्या होत्या. दोन फुंटांतील अंतर वाढल्याने आंतरमशागतही सोपी झाली आहे.

हरभऱ्याच्या दोन ओळींतही १५ इंच व दोन झाडांत साधारण सहा इंचाचे अंतर ठेवून पेरणी होते. त्यामुळे पिकाची वाढ चांगली झाली आहे. यंदाच्या हरभऱ्याची पावणेतीन फूट उंची झाली असून, अजून साधारण अर्धा फूट उंची वाढण्याचा विश्‍वास आहे. सध्या झाडाला ८० पर्यंत घाटे लागलेले आहेत.

हंगामी पिकांच्या पेरणीआधी मार्च महिन्यात नांगरणी होते. जूनमध्ये पाळी करत पिकांचे अवशेष गोळा केले जातात. त्यामुळे पावसाचे पाणी जमीन धरते.

पूर्वमशागतीनंतर पेरणीआधीच शेणखत व पेरणीवेळी रासायनिक खते दिली जातात. त्यात सेंद्रिय खताचे साठ टक्के, तर रासायनिक खताचे प्रमाण चाळीस टक्के असते. 

जिरायती अवस्थेत उत्पादन 
अडसुरे म्हणतात, की केवळ पावसाच्या पाण्यावर माझी हंगामी पिकांची शेती आहे. त्या व्यतिरिक्त पाण्याचा अन्य कोणताही स्रोत नाही. हरभऱ्याचे पीकही सुमारे एक ते दोन पाण्यातच येते. पूर्वी जिरायती पद्धतीत एकरी साडेतीन  क्विंटलपर्यंत निघणारे तुरीचे उत्पादन यंदा एकरी पाच क्विंटल वर गेले आहे. मुगाचेही एकरी अडीच ते तीन क्विंटलपर्यंत निघणारे उत्पादन यंदा पाच क्विंटलपर्यंत मिळाले महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या फुले विक्रम हरभरा वाणाची यंदा निवड केली आहे. त्याचेही उत्पादन पाच क्विंटलपर्यंत अपेक्षित आहे. पिकांची गुणवत्ताही जपण्याचा प्रयत्न केला आहे. 

यांत्रिकरणामुळे मजूरटंचाईवर मात 
पूर्वी ज्वारीची पेरणी, खुरपणी व काढणीसाठी सातत्याने मजूरटंचाईला सामोरे जावे लागे. शिवाय खर्चही अधिक येई. त्यामुळे यांत्रिकीकरणाचा पर्याय निवडला. मजुरांकरवी ज्वारीचे एक एकर उत्पादन घेण्यासाठी १० ते ११ हजार रुपये खर्च येतो. यांत्रिकरणामुळे मजूरबळ कमी होऊन हा खर्च सात हजार रुपयांवर आला आहे. शिवाय तूर, मूग, हरभरा या पिकांना हमी दराची शाश्‍वती आहे. मुगाला क्विंटलला ६,६०० रुपये, तुरीलाही साधारण तेवढाच दर मिळत आहे. त्यामुळेच कडधान्य उत्पादनात सातत्य ठेवले आहे. 

रामदास अडसुरे  ९०९६३४१४३९ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.