अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःमध्ये, शेतीमध्ये व परिस्थितीत लक्षणीय बदल वा प्रगती घडवून आणण्याची किमया लातूर येथील आत्माराम गिते यांनी घडविली आहे. विविध गुणांचा कौशल्याने वापर करीत फळपिकांवर आधारित शेतीचा त्यांनी आदर्श विकास केला. घरच्यांनीही तेवढीच साथ दिल्याने हे शक्य झाल्याचे ते सांगतात.
संघर्षाच्या पायऱ्या
अंबाजोगाई तालुक्यातील छोटेखानी तळणी (जि. बीड) येथील गणपतराव गिते यांची वडिलोपार्जित सत्तर एकर शेती. व्यसनापायी शिल्लक राहिली केवळ सहा एकर. घरही विकले. चार मुले. मोठे दोघे कळते झाल्यानंतर मेहुण्याच्या मदतीने नांदेड येथे हॉटेल व्यवसायात गुंतली.
लहान आत्माराम चुणचुणीत, हुशार. बारावीनंतर परभणी कृषी विद्यापीठात बीएस्सी ॲग्रीला नंबर लागला. पण शिक्षणाला पुरेसे पैसे नसल्याने दोन वर्षे शिक्षण सोडून खासगी कंपनीत जॉब केला. बोर्डिंगला राहून जेवणाची सोय केली. नांदेडच्या भावांनीही आर्थिक मदत केली. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर आत्माराम खासगी साखर कारखान्यात ओव्हर सिअर म्हणून रुजू झाले. तुटपुंज्या पगारावर भागेना. दरम्यान लग्न झालं. पुढे संसार वाढला. आर्थिक अोढाताण सुरूच राहिली.
दरम्यानच्या काळात कामानिमित्त मुंबईला गेले असता भायखळ्याचा फळे, भाजी बाजार पाहण्यात आला. तिथं पंधरा रुपयाला एक पपई विकली जात होती. ते पाहून उत्सुकता ताणली. सातारा जिल्ह्यात वाई भागातील भोसलेंची ती पपई लक्षात राहिली.
गावाकडं (तळणी) सहा एकर शेती. त्यात लहान भाऊ दिलीप राबायचा. काहीतरी केल्याशिवाय परिस्थिती पालटणार नाही हे उमगले. मोटारसायकल घेऊन वाई गाठली. पपईच्या बागेला भेट दिली. लग्नात मिळालेली अंगठी पत्नीच्या संमतीने विकून तैवान ७८६ जातीचे बियाणे पुण्याहून विकत घेतले.
साधारण १९९० ची गोष्ट. त्या काळी त्या भागात पपईची शेती अभावानेच होती. मात्र आत्माराम यांनी हे धाडस केले. जीव तोडून दोघा भावांनी मेहनत केली. झाडाला साठ- सत्तर पपया लगडल्या. पंचक्रोशीतील लोक ही पपई पाहायला येत. वाशी मार्केटमध्ये मार्केटिंग करून ती विकली.
लातूर येथील शिक्षण संस्थाचालक बब्रुवान माने यांनी ही यशकथा वर्तमानपत्रात वाचून शेतीला भेट दिली. त्यातून लातूर येथील महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयात शिकवण्याची संधी आत्माराम यांना चालून आली.
पुढील विकासाचे प्रयत्न
शेती लातूरपासून सुमारे ५० किलोमीटरवर तळणी येथे होती. नोकरी करीत स्वतःची शेती विकसित करायला सुरवात केली. पायाला भिंगरी लागल्यात काम सुरू झालं. विहीर, बोअर घेत पाण्याची सोय केली. चार पैसे गाठीला जमल्यावर दोन एकर शेतीही घेतली. दिलीप खंबीरपणे शेती सांभाळू लागले. आत्माराम तांत्रिक मार्गदर्शन, आर्थिक मदत व विक्री व्यवस्था पाहू लागले. पपई पिकात ते कुशल झाले. संस्थाचालकांच्या शेतातही पपईचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. पाइपलाइन केली. बॅंकेकडून कर्ज घेत भांडवल उभारले.
सुमारे २६ वर्षांच्या सेवेनंतर आत्माराम मार्च २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाले. मात्र शेतीद्वारे त्यांनी कामांना अखंड वाहून घेतले आहे. दररोज १२ तासांहून अधिक वेळ कष्ट करीत असल्याचे ते सांगतात.
सद्यःस्थितीतील शेती
तळणी
द्राक्षे- टेबल ग्रेप्स- ५ एकर
केळी- ५ एकर
टोमॅटो- ५ ते ७ एकर
ढोबळी मिरची- २ एकर (नवी शेती)
लातूर परिसर- करार शेती-
८ एकर (पहिलाच हंगाम)
विकासातील टप्पे
सन २००१ मध्ये नाशिक भागात जाऊन ‘वाइन ग्रेप’च्या बागा पाहून १४ एकरांवर प्रयोग.
पाच- सहा वर्षे चांगले उत्पादन. त्या पैशांतून शेती विकत घेतली. पुढे विक्रीच्या समस्या जाणवू लागल्या. कर्ज वाढले. बाग कमी केली. आज पाच एकरांत ‘टेबलग्रेप्स’. उर्वरित बागेतील मांडवाच्या आधारे टोमॅटो.
दत्तपूर पाझर तलावाजवळ थोडी जमीन घेऊन विहीर घेतली. सुमारे पाच किलोमीटरवरून पाइपलाइनद्वारे पाणी आणले. मागील तीव्र दुष्काळातही संरक्षित पाणी मिळण्याची सोय झाली. आज वीस एकरांला उन्हाळ्यातही पाणी पुरते. त्यासाठी स्वतंत्र डीपी उभारून विजेची सोय केली.
आजची प्रगती
विविध नगदी फळपिकांत कुशलता. गाढा अनुभव.
पाण्याच्या बाबतीत शाश्वतता.
वडिलांच्या काळात ७० एकर असलेली शेती सहा एकरांवर आलेली. ती टप्प्याटप्प्याने २० एकरांपर्यंत वाढविली.
लातूर शहरात टुमदार वास्तू. शेतात घर. ट्रॅक्टर व शेतीसाधने.
एकेकाळी सायकल होती. आता मोठी फोरव्हीलर घेतल्याचे आत्माराम यांना समाधान.
योग्य नियोजनातून मुलांना उच्चशिक्षण. एक मुलगा व मुलगी अभियंता. मुलगा एमपीएस्सीची लेखी परिक्षा उत्तीर्ण. एक मुलगी डॉक्टर (बीडीएस).
उत्पादन व मार्केट
द्राक्षे- एकरी १० ते१२ टन
केळी- एकरी ३५ ते ४० टनांपर्यंत
पपई- यंदा आठ एकरांत-त्यात २५० टन मालाची विक्री- दर कमाल- किलोला १४ रू. व सरासरी ८ ते ९ रू. अजून ३० टक्के उत्पादनाची अपेक्षा.
बहुतांश मालाची जागेवरच व्यापाऱ्यांना बोलावून विक्री
लातूर भागातील सुमारे शेतकऱ्यांचा गट. व्यापाऱ्यांना बोलावून जागेवरच बल्कमध्ये माल देतात. मे व ऑक्टोबर अशा दोन हंगामात टोमॅटो. द्राक्षाच्या मांडवावर असल्याने बांधणी खर्च वाचतो.
वर्षभर भांडवलासाठी लागणारे व नवीन शेतीसाठी असे पैशाचे विभाजन.
दरवर्षी लक्ष्मीपूजनाला शेतात उभ्या असलेल्या पिकांची पूजा
निश्चित केलेल्या पिकांमध्ये सातत्य. एखाद्या वेळेस तोटा होतो. पुढच्या वेळेस तो भरून निघतो.
हे गुण ठरले महत्त्वाचे
एकेकाळी अत्यंत गरिबी. शिक्षणासाठीही पैसे नव्हते. अशावेळी उपयोगी आणले खालील गुण
प्रयत्नवाद, सातत्य, प्रचंड कष्ट करायची तयारी, शेतीत झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, काळाची पाऊले अोळखून पीकपद्धतीचा स्वीकार
स्वतःमध्ये बदल घडवण्याची इच्छा.
- गिते, ९८५०९५६३३१, ९४२२०७१०६८ (लेखक लातूर येथे कृषी अधिकारी असून, शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.