‘एकीचे बळ मिळते फळ’ ही म्हण तंतोतंत लागू पडते ती बाभूळगावच्या (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील आग्रे कुटुंबीयांना. शेतातच वास्तव्य करणाऱ्या सख्या व चुलत मिळून पाच भावंडांनी व त्यांच्या पुढील पिढीतीलही भावंडांची एकीच त्यांची शेती व पूरक उद्योग फायदेशीर करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे.
रंगनाथ दादा आग्रे, त्यांचे सख्खे बंधू साहेबराव, सर्जेराव तर रूस्तूम ओंकार आग्रे व त्यांचे सख्खे बंधू रामू अशी ही पाच भावंडे आहेत. सर्वात मोठे रंगनाथ. त्यांचा सर्वात मोठा मुलगा संतोष याने बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर औरंगाबाद येथे २००३ ते २०१३ या काळात खासगी नोकरी केली. पण तुटपुंज्या वेतनातून कुटुंबाचा चरितार्थ भागविण्याची परवड व्हायची. या परवडीपेक्षा शेतीतच लक्ष घालून तिचा विकास करायचा असे ठरवून संतोष गावी परतले.
मजुराच्या मदतीने कसली शेती
पहिल्या वर्षी पारंपरिक पध्दतीने व गरज पडेल तेव्हा मजुरांच्या मदतीने संतोष यांनी वडिलांच्या मदतीने शेती कसण्यास सुरवात केली. पण होणारा खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याचे लक्षात येऊ लागले. शिवाय या खर्चात गावात मजूर मिळत नसल्याने बाहेर गावांहून आणलेल्या मजुरांमुळे खर्चात जास्त भर पडल्याचे आढळले. दुसरीकडे चुलतभाऊदेखील शेतीत व्यस्त होऊन राहणं गरजेचं होतं.
एकत्र केले कुटुंब
शेतीतील श्रम अधिक सुलभ करण्यासाठी संतोष यांनी सख्ख्या व चुलत भावांना एकत्र केलं. काकांच्या तीन एकराच्या आत असलेली अल्प शेतीही आपण कशी फायदेशीर करू शकतो, त्यासाठी सर्वांची मिळून मेहनत कशी आवश्यक आहे हे पटवलं. क्षेत्र जवळपास सारखे असल्याने कुणाकडे एखादा दिवस जास्त काम करावे लागले तर फक्त त्याच दिवसाची मजुरी त्याने काम करणाऱ्यांना द्यायची असे ठरले. प्रत्येक कुटुंबाकडे सारखेच दिवस सर्वांना जावे लागले तर मजुरी देण्याचा प्रश्न नव्हता. सर्वांचे एकमत झाले आणि २०१५ पासून हा प्रपंच सुरू झाला.
एकीने सुरू झाली शेती
सर्वांची मेहनत कामी येऊ लागली. त्यातून प्रत्येक कुटुंबाच्या मजुरी खर्चात दोन हंगाम मिळून किमान ५० हजार रुपये बचत होऊ लागली. संतोषच्या या उत्तम विचार व नियोजनामुळे घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींनी संतोषकडेच नियोजनाची मुख्य जबाबदारी सोपवली. कुटुंबातील प्रत्येकाकडे शेळी किंवा गाय असावी यावर संतोषने लक्ष केंद्रित केले. आधी केले मग सांगितले या उक्तीनुसार स्वत: दोन गावरान शेळ्या घेतल्या. मग साहेबराव यांच्याकडे पाच शेळ्या व एक गाय, सर्जेराव यांच्याकडे दोन बकऱ्या, रूस्तूम यांच्याकडे चार बकऱ्या, एक गाय तर रामू यांच्याकडे सहा बकऱ्यांची जोड मिळाली. त्यातून किमान तीस ते पस्तीस हजार रुपये उत्पन्न वर्षाकाठी प्रत्येक कुटुंबाला मिळणे सुरू झाले.
आंतरपिकांवर भर
या एकत्रित कुटुंबाने आंतरपीक पध्दतीवर भर दिला. कपाशीत उडीद, मूग, भूईमुग, तूर, तीळ तर मक्यात मुगाचे पीक आग्रे कुटुंबीयांनी घेणे सुरू केले. त्यामुळे कुटुंबाना घरी वर्षभर लागणाऱ्या अन्नधान्याचा प्रश्न सुटला.
शेळीपालनाचा विस्तार
संतोष यांनी दोन गावरान शेळ्यांपासून सुरू केलेल्या व्यवसायाला तीन वर्षांपूर्वी चार सिरोही जातीच्या शेळ्यांची व त्याच जातीच्या बोकडाची जोड देऊन विस्तार केला. आता संतोष यांच्याकडे १५ शेळ्या आहेत. सातत्याने विस्तार होतो आहे. कुटुंबातील एक व्यक्ती ही जबाबदारी पाहते. वर्षाकाठी किमान ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न हा व्यवसाय देत आहे.
अल्प शेतीला बटईची जोड
संतोष यांनी कुटुंबाकडील दोन एकर शेतीला १२ एकर बटईच्या शेतीची जोड तीन वर्षांपासून दिली आहे. या शेतीत ते कपाशी, मका, बाजरी व तूर ही पीक घेतात. यंदा तीन एकर कपाशी, साडेसहा एकर मका, एक एकर तूर तर अर्धा एकर बाजरी घेतली आहे. बटईने केलेल्या शेतीतून सुमारे ७५ हजार ते एक लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळत आहे.
आग्रे कुटुंबाच्या शेतीची वैशिष्ट्ये
एकूण शेतीच्या दिमतीला एक बैलजोडी
पाच भावंडांमधील साडेआठ एकर शेतीसाठी सामाईक एक व रंगनाथ यांच्याकडे स्वमालकीची विहीर.
विहिरींना जेमतेम जानेवारीपर्यंतच पाणी
रब्बीत थोडा गहू व हरभऱ्याचे पीक
रामू यांच्या कुटुंबातील सचिन शेतीसह वेल्डिंग व्यवसाय करतो. शेड बांधणी करतो. त्यातून कुटुंबाला आर्थिक आधार होतो.
रंगनाथ यांचा मुलगा कल्याण व सर्जेराव यांचा मुलगा योगेश खासगी नोकरी करून कुटुंबाला हातभार लावतात.
साहेबराव देखील शेती सांभाळताना कंत्राटदाराच्या हाताखाली काम करून कुटुंबाला आधार देतात. त्यांना मुलगा ऋषिकेशची मदत होते.
श्वानपालन
पोलिस दलात असलेल्या भाऊजींकडून संतोष यांना लासा जातीच्या श्वानाची (नर व मादी) दोन पिल्ले सांभाळ करण्यासाठी मिळाली. त्यांनी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जीवापाड त्यांचं पावन केलं. पिल्ले मोठी झाली. पिल्लांची संख्याही वाढली. त्यांच्या विक्रीतूनही कुटुंबाने चांगला आर्थिक आधार मिळवला.
प्रत्येक कुटुंबाकडील शेतीक्षेत्र
रंगनाथ- वडिलोपार्जित दोन एकर (बारा एकर क्षेत्र तीन वर्षांपासून बटईने) साहेबराव- दोन एकर सर्जेराव- दोन एकर रूस्तूम व रामू प्रत्येकी- एक एकर २० गुंठे
- संतोष आग्रे, ९६२३७१७०८१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.