फळबाग, गोपालनातून शेतीला देतेय नवी दिशा

फळबाग, गोपालनातून शेतीला देतेय नवी दिशा
Updated on

‘‘मी मुंबईमध्ये गेली पंधरा वर्षे योगा क्लास घेत होते. परंतु  आम्हाला पहिल्यापासून निसर्ग आणि शेतीची आवड. म्हातारपणी कोठेतरी खेडेगावात जाऊन रहाण्यापेक्षा कोकणात स्वतःची वाडी तयार करता येईल का, या दृष्टीने आम्ही सात वर्षांपूर्वी  केळशीजवळील रोवले या खेडेगावात साडेतीन एकर डोंगर उताराची जमीन घेतली आणि सुरू झाला फळबाग आणि गोशाळेचा प्रवास... पूर्णवेळ फळबाग, पशुपालनात रमलेल्या सौ. कविता अाशुतोष चांदोरकर भविष्यातील वाटचाल सांगत होत्या.

याबाबत कविताताई म्हणाल्या, की रोवले येथे फळबाग व्यवस्थापनासाठी स्थानिक मजूर जोडपे ठेवले. पाण्यासाठी कूपनलिका घेतली. कलमांची लागवड करताना मला दहा हजारांचे शेणखत विकत आणावे लागले. सेंद्रिय पद्धतीने फळबागेचे नियोजन असल्याने पुढील काळात पुरेसे शेणखत, गोमूत्र कसे उपलब्ध होणार आणि खर्च किती करणार, हा प्रश्न होता. त्यामुळे मी स्थानिक शेतकऱ्याकडून कोकण गिड्ड ही देशी गाय खरेदी केली. फळबागेत लहानसा गोठा बांधला. त्यामुळे काही प्रमाणात शेणखताचा प्रश्न सुटला. सहा वर्षांपूर्वी नारळ (बाणावली, सिंगापुरी) २०, काजू (वेंगुर्ला-४, वेंगुर्ला - ७) १००, आंबा (हापूस, पायरी) ५०, सुपारीच्या २० झाडांची लागवड केली. आंतरपीक म्हणून दालचिनी, लवंग, काळीमिरी, जाम, जायफळ, पेरू, पपई, केळी, रामफळ, सीताफळ रोपांची लागवड केली. खरिपात वीस गुंठे स्थानिक भात जातीची लागवड करते. मजूर जोडप्याच्या मदतीने फळबाग नियोजन सुरू झाले. याच दरम्यान नातेवाइकांकडून गीर गाय आणली. दोन गाईंसाठी पुरेसे पशुखाद्य दर महिन्याला शेतातील गोठ्यावर ठेवत होते. फळबाग आणि गाय सांभाळण्यासाठी एक मजूर ठेवला. दर पंधरा दिवसांनी आम्ही मुंबईहून शेतीवर येत होतो. परंतु मजुरांकडून गाईचे संगोपन चांगले होत नव्हते. तसेच फळबागेकडेही दुर्लक्ष होत होते. त्यामुळे साडेतीन वर्षांपूर्वी मुंबईतील माझे योगा क्लास बंद करून स्वतः फळबाग आणि गीर गाईंचे व्यवस्थापन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मला ॲग्रोवनची देशी गोवंश कार्यशाळा, तसेच देशी गोवंश अभ्यासक मिलिंद देवल, पशुपालक माजिद पठाण, अप्पा पाटील यांचे मार्गदर्शन मिळत गेले. 

मुक्त संचार पद्धतीचा गोठा  
गोसंगोपनाबाबत कविताताई म्हणाल्या, की फळबागेत राहण्यासाठी घर बांधले. गाईसाठी चांगला गोठा तयार केला. मजुरांच्या टंचाईला कंटाळून मी स्वतः गाईंची धार काढायला शिकले. अजूनही गाईंच्या व्यवस्थापनाच्या बाबी तज्ज्ञ तसेच प्रयोगशील पशुपालकांशी सातत्याने चर्चा करून शिकत असते. गाईंसाठी पहिल्यांदा बंदिस्त गोठा बांधला होता. परंतु शेण काढणे, खाद्य-पाणी देणे यातच वेळ जाऊ लागला. त्यामुळे मुक्त संचार पद्धतीने गोठा केला. फक्त दूध काढण्यापुरत्या गाई गोठ्यात असतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले झाले. माझे कष्टही कमी झाले. गाईंची धार काढणे तसेच सर्व व्यवस्थापन मी स्वतः शिकून घेतले. शेती आणि गोठ्याच्या रक्षणाची जबाबदारी शक्ती आणि रुद्र हे दोन डॉबरमॅन श्वान सांभाळतात. संपूर्ण क्षेत्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. 

 गोखूर खत, गोमुत्राला मागणी 
कविताताई फळबागेला वापरून उरलेले गोखूर खत, गोमूत्र परिसरातील शेतकऱ्यांना विकतात. चाळीस किलोची गोखूर खत गोणी पाचशे रुपये आणि १५ रुपये लिटर दराने गोमूत्राची विक्री होते. वर्षाला खत, गोमूत्र विक्रीतून वीस हजार रुपये मिळतात. येत्या काळात जीवामृत, गोवऱ्या, गोमूत्र अर्काची त्या विक्री करणार आहेत. पुढील वर्षीपासून किमान तीन कालवडी आणि एक वळू विक्रीचे गणित त्यांनी बसविले आहे. गेल्या वर्षी त्यांनी चार वर्षांचा वळू एक्कावन्न हजाराला विकला. गोपालनाच्या बरोबरीने योग आणि गो थेरपी सेंटरचे नियोजन केले आहे. 

 आंबा, काजू विक्री 
कविताताईंच्या फळबागेतून गेल्या हंगामापासून काही प्रमाणात आंबा, काजू उत्पादनास सुरवात झाली. फळझाडांना शेणखत, गोमूत्र, पालापाचोळा आच्छादन, बायोगॅस स्लरीचा वापर केला जातो. त्यामुळे कलमे काटक झाली. मुंबईमध्ये ओळखीच्या लोकांना थोड्या प्रमाणात  आंबा, काजूची विक्री केली जाते. 

 तूपनिर्मितीवर भर 
कविताताईंनी बाजारपेठ लक्षात घेऊन दूध विक्रीपेक्षा तूपनिर्मितीवर भर दिला. पारंपरिक वैदिक पद्धतीने तूपनिर्मिती केली जाते. इंधनासाठी गोबरगॅसची सोय आहे. दुधाला ५ ते ५.५ फॅट आहे. दर महिन्यास दहा किलो तूपनिर्मिती होते. त्यांचे पती मुंबईत योगा क्लास घेतात, तर मुलगा पुण्यामध्ये शिकत आहे. त्यामुळे  पुणे, मुंबई येथील ग्राहकांना दोन हजार रुपये किलो दराने थेट विक्री केली जाते. गुणवत्तेमुळे मागणी वाढत आहे. प्रतिदिन सरासरी गाईंचा खर्च दोनशे रुपये आहे. येत्या काळात त्या गाईंची संख्या वीसपर्यंत नेणार आहेत. त्यामुळे दर महिन्याला वीस किलो तूपनिर्मितीचे टार्गेट ठेवले आहे. 

असे आहे नियोजन 
 चार कोकण गिड्ड, चार गीर गाई, पाच कालवडी, एक वळू आणि दोन पाड्यांचे संगोपन.
 सकाळी ६.३० आणि संध्याकाळी पाच वाजता दूध काढणी.
 दूध उत्पादनानुसार गाईंना खनिज मिश्रणाच्या बरोबरीने भुसा, सरकी पेंड, हरभरा, तूर, मका, उडीद चुरी याचे आंबोण. आंबोणामध्ये ॲझोलाचे मिश्रण. गोठ्यात क्षार मिश्रणाच्या विटा टांगलेल्या आहेत.
 भात पेंढा, हिरवे गवत अशी सरासरी १५ किलो चारा कुट्टी दिली जाते. 
 पशुवैद्यकाकडून लसीकरण आणि आरोग्य तपासणी. आयुर्वेदिक औषधोपचारावर भर.
 काही क्षेत्रावर संकरित नेपिअर, मका लागवड. वर्षभरासाठी लागणारा भात पेंढा, गवताची खरेदी.
 सकाळी दूध काढल्यानंतर गाई मुक्त संचार गोठ्यात जातात. गरजेनुसार गाई चारा खातात, पाणी पितात. बागेला जाळीचे कुंपण असल्याने वासरांना फळबागेत सोडले जाते. पाच वाजता गाईंना दूध काढण्यासाठी पुन्हा गोठ्यात घेतले जाते. त्यानंतर पुन्हा मुक्त संचार गोठ्यात गाई जातात.
 व्यालेल्या गाई, वासरांसाठी स्वतंत्र व्यवस्थापन. 
 दुपारी बारा वाजता गाईंना हिंगमिश्रित ताक पाजले जाते. यासाठी गोठ्यात टब ठेवला आहे. ताकामुळे पचन, आरोग्य चांगले राहते. गोठ्यामध्ये स्पीकरवर संथपणे भगवतगीता लावलेली असते.
 कोकण गिड्ड प्रतिदिन सरासरी अडीच लिटर तर गीर गाय आठ लिटर दूध देते. सध्या तीन कोकण गिड्ड आणि एक गीर गाय दुधात आहे. रोज सरासरी बारा लिटर दूध उत्पादन होते. येत्या काळात तीन गाई विणार आहेत. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ.

प्रत्येक गाईची संगणकावर नोंद 
कविताताईंनी गाईंना रेणुका, कृष्णा, गौरी, नारायणी, आंबा, कल्याणी, गायत्री ही नावे दिली आहेत. संगणकामध्ये प्रत्येक गाईचे आई-वडील, दुग्धोत्पादन, उपचार, लसीकरण, व्यायलेली तारीख, वासराचे वजन अशा सर्व नोंदी ठेवलेल्या आहेत. त्याचा दूध उत्पादनवाढीस फायदा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.