अकोले तालुक्यात डांगी गोवंशाचे संवर्धन  

अकोले तालुक्यात डांगी गोवंशाचे संवर्धन  
Updated on

अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति पावसाच्या आदिवासी भागाची उपजीविका डांगी गोवंशावर अवलंबून आहे. संगमनेर येथील लोकपंचायत संस्थेने वेळीच सतर्क होऊन डांगी गोवंश संवर्धन प्रकल्प हाती घेतला.संशोधन, पशुपालक, संस्था यांच्या संघटनेतून प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केली. पशुपालकांचे जीवनमान त्यातून पुन्हा उंचावले.   

डांगी हा देशी गोवंश प्रामुख्याने डोंगराळ व अति पावसाच्या भागात उत्क्रांत पावलेला आहे. तेलकट त्वचा व मजबूत खुरांमुळे ही जनावरे पुणे, नगर, नाशिक, ठाणे, पालघर जिल्ह्यापर्यंत पाळली जातात.  साधारण चौदा तालुके डांगीपालनासाठी प्रसिद्ध आहेत.

डांगींच्या अस्तित्वाला बाधा 
नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात महादेव कोळी व ठाकर समाजाचे आदिवासी शेतकरी मुख्यत्वे डांगीपालन करतात. संगोपन, राजूर-घोटी प्रदर्शनात विक्री, दुधापासून खवा-पेढे तयार करणे अशी त्यांची शाश्वत उपजीविका होती. मात्र २००० मध्ये अति पर्जन्यवृष्टी झाली. साथीचे आजार आले. दहा वर्षांत डांगी गोवंश मोठ्या संख्येने कमी झाला. कळसूबाई-हरिश्चंद्रगड पट्ट्यात त्याची तीव्रता अधिक होती. पशुपालक हवालदिल झाले. 

सुमारे २५ वर्षांपासून डांगी गोवंश सांभाळतो. आमच्या भागात अतिवृष्टी होते. त्वचा तेलकट असल्याने पावसात हे जनावर चांगले तग धरते. गाय २५ हजारांपर्यंत तर बैलजोडी ९० हजारांपर्यंत मिळते. दूध पौष्टिक असते. वळूलाही अधिक किंमत मिळते. शेतीकामांसाठी ही फायदेशीर जनावरे आहेत. 
- सुनील पाबळकर, पशुपालक 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 
चौथ्या पिढीपासून डांगीचे संगोपन आम्ही करतो. दोन बैलजोड्या, सहा गायी व कालवडी आहेत. पाच हजार मिमी. पाऊस पडतो. तरीही पावसाळ्यात गाळ तुडवणे, रोपेवाहतूक ही कामे डांगी अधिक वेगाने करतात. सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत न थकता ते औताला जुंपलेले असतात. प्रति लिटर २२ रुपये दराने दुधाची विक्री होते. औषधी असल्याने वळूलाही दूध पाजतो. आमचे सारे कुटुंब या गोवंशावर अवलंबून आहे. जनावरे शक्यतो विकत नाही. 
- गंगाराम धिंदळे, ९४२३१६२७४३, शिरपुंजे

राजूर येथे अनेक वर्षांपासून डांगी जनावरांचे प्रदर्शन भरवण्याची परंपरा आहे. राज्याबाहेरील शेतकरीही  खरेदी विक्रीसाठी येतात. चार दिवसांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. शेतकऱ्यांच्या निवासाची सोय ग्रामपंचायत करते.
— गणपत देशमुख, सरपंच, राजूर 

अकोले-जुन्नर तालुक्याच्या सरहद्दीवरील आमचे दुर्गम गाव आहे. सह्याद्रीच्या डोंगरांनी वेढलेल्या अति पावसाच्या या भागात डांगीशिवाय अन्य जनावरे टिकणे अवघड आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.  
— बुधाजी वळे, डांगीपालक, फोफसंडी

पाचनई-कोथळे-लव्हाळी या गावातील बहुतांशी जनावरे हरिश्चंद्रगडावर चरायला जातात. तेथील निसर्गनिर्मित गुहांमध्ये त्यांना ठेवले जाते. स्थानिक ‘डांगी मित्र’, पशुसंवर्धन विभाग यांच्या मदतीने लसीकरण शिबिरांमधून गाव पातळीवर प्रथमोपचाराची सोय झाली आहे.
— वाळीबा भौरुले, डांगी पालक, लव्हाळी ओतूर
 
दरवर्षी अमृतसागर दूध संघ व जिल्हा सहकारी बँकेकडून गाईंसाठी आर्थिक मदत केली जाते. आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे हा उद्देश असतो.  
— वैभव पिचड, आमदार, राजुरी

संवर्धन प्रकल्प  
संगमनेर येथील ‘लोकपंचायत संस्थेने डांगी गोवंश संवर्धनाची मोहीम हाती घेतली. ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात जैवविविधता संवर्धन कार्यक्रम सुरु झाला. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने डांगी गोवंश संवर्धनाचे काम ‘लोकपंचायत’ संस्था अकोले तालुक्यात करीत आहे.  

संवर्धन प्रकल्प उद्दिष्टे  
  पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील पश्चिम घाटातील सहा जिल्हे व चौदा तालुक्यांत डांगी संवर्धन कृती संशोधन कार्यक्रम
  पंधरा गावे व चाळीसहून अधिक वाड्यावस्त्यांवर अंमलबजावणी 
  दुर्गम भागात पशुवैद्यकीय उपचार सुविधा, लसीकरण शिबिरे, प्रशिक्षण कार्यशाळा, डांगी पशू-मित्रांची मदत 
  शुद्ध गोवंश निर्माण करणे
  विविध शासकीय योजनांमध्ये संवर्धन प्रक्रियेला आणणे 
पशुपालक संघ कार्यरत 
कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरातील डांगी पालकांनी पशुपालक संघाची (Breeders Association) स्थापना केली. त्याद्वारे डांगीकेंद्रित उपजीविका सक्षम होण्यास व दूध प्रक्रिया, खवा उद्योगाचे अर्थकारणही उंचावण्याचा प्रयत्न झाला. 

प्रकल्पाचे पुढे आलेले परिणाम
जनावरांना होणाऱ्या ‘थंडया’ आजाराचे निदान, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना विकसित. यात  डांगी संशोधन केंद्र, इगतपुरी, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, पशुवैद्यकीय विभाग यांचा सहभाग. -शुद्ध गोवंश निर्मितीसाठी नैसर्गिक व कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब. 
चाऱ्यासाठी जंगलातील २०० पेक्षा अधिक वनस्पतींची (५३ प्रकारची गवते) प्रथमच नोंद
राखण रान या शाश्वत चारा देणाऱ्या संवर्धन परंपरेचा अभ्यास अहवाल. भारतीय विज्ञान संमेलन, पुणे येथे ‘डांगी गोवंश व राखण रान’ या विषयावर शोध निबंध सादर 
दूध, गोमूत्र व शेणावर आधारित उत्पादने विकसित करण्यासाठी कार्यशाळा. त्यात १६० पेक्षा अधिक व्यक्तींचा सहभाग
वार्षिक डांगी प्रदर्शनात सहभाग. ‘चाळीसगाव डांगाणी’ कलापथकाच्या माध्यमातून लोकजागृती.
आदर्श डांगी पालन करणाऱ्या निवडक ३० महिला व पुरुष शेतकऱ्यांचा सन्मान
‘समग्र डांगी’ नावाचे गोवंशाची सविस्तर माहिती देणारे पुस्तक मराठी व इंग्रजी भाषेत. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रकाशन.
सामुदायिक जैवसांस्कृतिक नियमावली  दस्तऐवज अंमलबजावणीसाठी सज्ज 
लोकपंचायतने डांगी मित्र (Animal Health Worker) नेमले. त्यांना प्रशिक्षित केले. त्यांचा उपयोग प्रथमोपचार व लसीकरण कामात प्रभावी.  
अनेक गावांत वळूची परंपरा नष्ट झाली आहे. त्यामुळेच जातिवंत वळू व सुलक्षणी गायी निर्माण होण्यासाठी भर.    

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पशुवैद्यकीय शास्त्राचा वापर 
  कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरात उन्हाळ्यातील चार महिने पाणी व चाराटंचाई. 
  परिणामी जनावरे अशक्त होऊन आजारांना बळी पडतात. 
  स्थानिक वैदू वनौषधींचा वापर तर पशुवैद्यक लसीकरण व प्राथमिक उपचारa करतात. 
  प्रकल्पांतर्गत आजारांचे निदान,  ठोस उपचार पद्धतींवर भर. महाराष्ट्र पशू व मत्स विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांची मदत.  

राखण रान (Grassy Meadows)
  ही परंपरा उत्तर पश्चिम घाटातील पशुपालकांकडून मागील चार पिढ्यांपासून विकसित यात गावाजवळील गवताळ पट्टा राखून ठेवण्यात येतो. त्यात मुक्तचराई होत नाही. पक्व गवत (किमान सहा प्रकार) कापून साठवून ठेवण्यात येतात. पावसाळ्यात त्याचा वापर. 
  याद्वारे स्थानिक जैवविविधतेचे जतन 

विजय सांबरे, ९४२१३२९९४४,  डांगी गोवंश अभ्यासक, लोकपंचायत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()