खजूर, ड्रॅगनफ्रूटद्वारे प्रयोगशील शेतीला आकार 

खजूर, ड्रॅगनफ्रूटद्वारे प्रयोगशील शेतीला आकार 
Updated on

परभणी जिल्ह्यातील असोला येथील सेवानिवृत्त कृषी संचालक अनंतराव जावळे यांनी आपल्या बंधूंसंह फळबाग पीक केंद्रित एकत्रित व नावीन्यपूर्ण शेतीचा आदर्श उभारला आहे. प्रत्येकी सात एकरांत खजूर व ड्रॅगन फ्रूट लागवड यशस्वी केली आहे. दोन्ही शेतदमालांचे पॅकिंग करून थेट विक्री करून बाजारपेठही मिळवली आहे. 

परभणी- वसमत राष्ट्रीय महामार्गावर परभणीपासून दहा किलोमीटरवर जावळे बंधूंची ६५ एकर शेती आहे. सुमारे ४० फूट खोल काळी माती असलेली भारी जमीन आहे. दत्तराव, प्रभाकरराव, अनंतराव, ज्ञानोबाराव, लक्ष्मणराव व किशनराव असे सहा बंधू शेतीत एकत्र राबतात. अनंतरावांनी १९७९ मध्ये तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठातून उद्यानविद्या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. बजावत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून व पदोन्नतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदी विविध ठिकाणी नऊ वर्षे सेवा केली. कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण, फलोत्पादन) पदावरून ते २०१३ मध्ये निवृत्त झाले. त्यानंतर ते पूर्णवेळ शेती करीत  आहेत. लक्ष्मणराव हे कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत. किशनराव ‘आयएएस’ झालेले आहेत. अनंतराव यांचा मुलगा डॉ.सुनील हे देखील कृषी विद्यापीठात कार्यरत आहेत.

खजुराची लागवड  
जावळे कुटुंब शेतीत नवीन प्रयोग करीत असतात. अलीकडील वर्षांत खजूर व ड्रॅगन फ्रूट या पिकांची लागवड त्यांनी केली आहे. मार्च २०१६ मध्ये गुजरात राज्यातून खजुराच्या बऱ्ही जातीची उतिसंवर्धित रोपे त्या वेळी १५०० रुपये प्रति नग दराने खरेदी केली. एकरी सुमारे ६० या प्रमाणे आज सात एकरांत ४२५ पर्यंत झाडांची लागवड आहे. शेणखत, गांडूळ खत, रासायनिक खते, जिवाणू खत आदींच्या वापरासह ठिबकद्वारे विद्राव्य खतांचा वापर केला आहे.  खजुरात नर आणि मादी झाडे वेगवेगळी असता. मादी झाडाच्या फुलांवर परागसिंचन केले जाते.  जानेवारी- फेब्रुवारी काळात फुलोरा अवस्था तर जून- जुलै हा फळहंगाम असतो. पहिल्या वर्षी एकूण साडेपाच टन तर दुसऱ्या वर्षी साडेसात टन उत्पादन मिळाले आहे.

सिंचनाची सुविधा 
मातीची खोली जास्त असल्याने विहिरी खोदणे जोखमीचे होते. त्यामुळे शेतापासून पाच किलोमीटर अंतरावरील पूर्णा नदीकाठी विहीर खोदली. तेथून पाईपलाईनव्दारे पाणी आणले. मागेल त्याला शेततळे  योजनेअंतर्गत शेततळे खोदले. त्यात नदीवरून आणलेल्या पाइपलाइनचे पाणी संकलित केले जाते. खोल काळी जमीन असल्याने पाणी भूगर्भात मुरण्याचा वेग कमी आहे. शेततळ्यातून पंपाव्दारे पाण्याचा उपसा करून ठिबक सिंचन पद्धतीने पिकांना पाणी दिले जाते.

फळपिके, शेडनेट शेती 
सिंचनासाठी सुविधा निर्माण केल्यानंतर जावळे बंधूंनी काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यात समाधानकारक उत्पन्न मिळवले. अलीकडील काळात ढोबळी मिरची, कलिंगड आणि खरबूज यांचे उत्पादन ते मल्चिंग पद्धतीने घेत आहेत. थेट शेतातून तसेच परभणी येथील बाजारपेठेत विक्री होते. या पिकांपासून एकरी सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 

हळदीत पपईचे आंतरपीक 
दरवर्षी दोन एकरांत हळद लागवड असते. एकरी २१ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. यंदा हळदीत पपईचे आंतरपीक घेतले आहे. आजवर पाच टनांपर्यंत त्याचे उत्पादन मिळाले आहे. नऊ एकर ऊस तसेच उर्वरित क्षेत्रावर हरभरा आहे.

खजूर पीक संरक्षण 
खजुरावर गेंड्या भुंगा ही प्रमुख कीड येते. ती झाडाचा गाभा खाऊन टाकते. त्यामुळे मोठे नुकसान होते. या किडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी झाडांची दररोज निरीक्षणे घ्यावी लागतात. गंध सापळा लावून या किडीचे नियंत्रण करता येते. घडांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्याभोवती प्लॅस्टिकच्या पिशव्या झाकाव्या लागतात.

थेट विक्री व्यवस्था 
खजुराच्या फळांची मजुरांकरवी काढणी करताना हातमोज्यांचा वापर केला जातो. पिवळ्या रंगाची परिपक्व झालेली फळे तोडली जातात. प्रतवारी करून ५०० ग्रॅम वजनामध्ये टेट्रा पॅंकिंग  केले जाते. प्रति फळाचे वजन १० ते१४ ग्रॅमपर्यंत भरते. परभणी- वसमत राष्ट्रीय महामार्गावर शेताजवळ छोट्या स्टॅालची उभारणी केली आहे. तेथे खजुरासह ड्रॅगनफ्रूटची देखील थेट विक्री सुरू केली आहे. खजुराला  प्रति किलो २०० रुपये, तर ड्रॅगनफ्रूटला किलोला ३०० रुपये दर मिळाला आहे.  दत्तराव आणि प्रभाकरराव यांच्याकडे विक्रीची जबाबदारी असते. थेट शेतातील ताजे दर्जेदार खजूर किफायतशीर दरात मिळतात. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे प्रवासी मुद्दाम थांबून दोन्ही फळे खरेदी करतात. या शिवाय मोबाईलद्वारे देखील मागणीनुसार ग्राहकांना पुरवठा केला जातो. खजुरासाठी ‘जीएनफ’ ब्रॅण्ड तयार केला आहे.

ड्रॅगनफ्रूटचा प्रयोग 
नव्या खजूर बागेत सोयाबीन, मूग, हरभरा, वाटणा ही आंतरपिके घेतली आहेत.  खजुरापाठोपाठ २०१७ मध्ये गुलाबी जातीच्या ड्रॅगनफ्रूटची लागवड केली आहे. त्यासाठी सिमेंटचे खांब तसेच त्यावर सिमेंटची चक्री  बसवली आहे. या खांबांवर ड्रॅगनफ्रुटचा वेल वाढतो. या फळपिकाला पाण्याची गरज तुलनेने कमी असते. सध्या प्रति झाड १० ते १५ पर्यंत फळे मिळत आहेत. एकूण सुमारे पंधराशे झाडे आहेत. 

अभ्यासातूनच शेती 
खजूर व ड्रॅगनफ्रूट यांच्याकडे वळण्यापूर्वी लागवड व विक्री अशा दोन्ही अंगाने अभ्यास केला होता.खजुराला पाणी लागते. त्याला परागसिंचनाचीही गरज असते हे लक्षात आले. विशेष म्हणजे स्वतः विक्री व्यवस्था उभारल्याचा फायदा झाला. आमच्याकडे प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटून घेतली असल्याने शेती सोपी झाल्याचे अनंतराव यांचे पूत्र डॉ. सुनील जावळे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.