पाऊस आणि दुष्काळ

पाऊस आणि दुष्काळ
Updated on

पाऊस पडला म्हणजे दुष्काळ संपत नाही. वावरात पाय ठेवला की, घोट्यापर्यंत चिखल येतोय. चिबाड रानात किमान तीन आठवडे वाफसा होणार नाही. यंदाच्या वर्षी कमी कालावधीत भरपूर झालेला पाऊस पिकांसाठी नुकसानकारक ठरलाय. सांगण्याचं तात्पर्य एकच. हे सालही शेतीसाठी दुष्काळीच आहे. घातलेला खर्चही निघणे शक्य नाही. केवळ शेतीवर पोट असणाऱ्या शेतकऱ्याचा या परिस्थितीत निभाव लागणे शक्य नाही.

पाऊस पडला की दुष्काळ संपला, असा भाबडा समज करून घेणारे कैकजण असतात. दोन दिवसांत पाऊस नाही. आज सकाळी शेतात सगळीकडं फिरलो. तीन एकरांतील सोयाबिनला पाणी लागलंय. पानं पिवळी पडलीत. वावरात पाय ठेवला की, घोट्यापर्यंत चिखल येतोय. चिबाड रानात किमान तीन आठवडे वाफसा होणार नाही. आम्ही उशिरा येणारं सोयाबिन पेरलयं. शेंगा कोवळ्या आहेत. या पाण्यामुळं शेंगातील दाणा नीट भरणार नाही. पिवळी ज्वारी निम्मी निसवलीय. निम्मी तशीच आहे. तीळ काढायला आलाय. पंधरा दिवसांपासूनच्या पावसामुळं तो कापता येईना. काही दिवस असाच पाऊस राहिला तर, जागेवरच त्याची रास होईल.

आमच्या शेताच्या आजूबाजूला कमी जास्त प्रमाणात अशीच स्थिती आहे. लवकर येणारं सोयाबीन ज्यांनी पेरलंय, ते काढणीला आलंय. त्याचं या पावसानं नुकसान होऊ लागलंय. मध्यंतरी तब्बल ५० दिवसांचा पावसाचा खंड पडल्यामुळे का बियाण्यातील दोषामुळं असं घडलंय, माहीत नाही पण अनेकांच्या सोयाबीनला शेंगाच नाहीत. ते अधिक संकटात आहेत. या वर्षीही कोरडवाहू शेतीत सोयाबीन हेच प्रमुख पीक आहे. उत्पादन निम्म्यापेक्षा कमी येणार आणि बाजारभाव तीन हजारांच्या खाली येणार. ही सगळी परिस्थिती शेतकऱ्यांच्या वाट्याचा दुष्काळ स्पष्ट करणारी आहे.

दुसऱ्या बाजूला शेतीत गाजरगवताचे तण ही मोठी समस्या बनलीय. आम्ही एकदा तणनाशकाची फवारणी केली. दोनवेळा उपसून काढले, तरी जैसे थे स्थिती. आपल्या शेतातील सगळं गाजरगवत संपवलं तरी, पुढच्या वर्षी येतंच. बाजूच्या शेतातील बी उडून येऊन पुन्हा वापतं. अमेरिकेचा दुष्काळात आणलेला गहू फारच महागात पडलाय. 

शिवाय सर्कलवाईज पावसाच्या स्थितीत मोठी तफावत आहे. अहमदपूर तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची सरासरी ७८४ मि.मी.आहे. मात्र शिरूर सर्कलमध्ये आजपर्यंत ८६६ मि.मी. पाऊस झालाय. कमी कालावधीत भरपूर झालेला हा पाऊस पिकांसाठी नुकसानकारक ठरलाय. सांगण्याचं तात्पर्य एकच. हे सालही शेतीसाठी दुष्काळीच आहे. घातलेला खर्चही निघणे शक्य नाही. केवळ शेतीवर पोट असणाऱ्या शेतकऱ्याचा या परिस्थितीत निभाव लागणे शक्य नाही.

९४२२४६९३३९
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.