दापोरी (जि. जळगाव) गावाने केळी, मका, कापूस पिकांमध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. केळी पिकाचे योग्य व्यवस्थापन करत दर्जेदार उत्पादनात येथील शेतकऱ्यांनी सातत्य राखले आहे. शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसायदेखील चांगल्याप्रकारे विकसित झाला.
दापोरी (ता. एरंडोल, जि. जळगाव) गिरणा नदीकाठी वसलेले गाव. शिवारात हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आहे. ठिबक सिंचनामुळे गाव शिवार हिरवेगार झाले आहे. गावाचे शिवार सुमारे २०० हेक्टर असून, लोकसंख्या १५०० आहे. केळी हे गावाचे प्रमुख पीक. तसेच कापूस, मका, गहू, कांदा, बाजरी या पिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांचा भर आहे.
अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न
ग्रामस्थांना काही अडचणींचादेखील सामना करावा लागतो. गिरणा नदीवर पूल नसल्याने रवंजा-म्हसावद-शिरसोली असा ४० किलोमीटरचा फेरा पार करून जळगाव शहरात जावे लागते. विद्यार्थ्यांना शहरात जाण्यासाठी गावात एसटी बस नसल्याने प्रवासासंबंधी अडचणी येतात. शिवार हिरवेगार ठेवण्यासाठी पाणी व्यवस्थित पिकांना देण्याची गरज असते. परंतु, कमी दाबाने वीजपुरवठा अनेकदा होत असतो. तसेच जादा रोहित्रांची मागणीदेखील गावकऱ्यांनी केली आहे. परंतु, एकजुटीतून अडचणींवर मात करण्यासाठी गावकरी प्रयत्नशील आहेत.
केळी पिकाने दिली ओळख
गिरणा नदीवर काही वर्षांपूर्वी बांधलेल्या कांताई बंधाऱ्याच्या पाण्याचा चांगला लाभ गावाला होत आहे. ठिबक व्यवस्थेमुळे बहुतांश जमिनी ओलिताखाली आल्या आहेत. त्यामुळे केळी, मका, कांदा, बाजरी या सारख्या पिकांची लागवड वाढली.
गावामध्ये दरवर्षी केळीची ५० ते ५५ हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. ही लागवड ऑक्टोबर आणि जून, जुलै अशी दोन टप्प्यात असते. केळी लागवडीखालील १०० टक्के क्षेत्र ठिबकखाली आहे. मध्यंतरी केळीमधील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी गावातील शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केले. त्यासाठी पंचायत समितीनेदेखील मदत केली होती.
गावामध्ये चांगल्यापैकी पशुपालन केले जात असल्याने पुरेशा प्रमाणात शेणखताची उपलब्धता होते. अलीकडे गादीवाफा तंत्रानेदेखील केळी लागवडीला चालना मिळाली आहे. केळी लागवडीसाठी गहू, बाजरी, कांद्याचे बेवड असलेल्या क्षेत्राला पसंती दिली जाते.
दर्जेदार केळी उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करतात. यामध्ये सुधारित पद्धतीने लागवड, एकात्मिक खत व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रणासाठी कीडनाशकांचा योग्य वापर, केळी घडाला स्कर्टींग बॅग लावली जाते. पाण्यासह खताच्या कार्यक्षम वापरासाठी बागेत एका ओळीत ठिबकच्या दोन लॅटरलचा वापर शेतकरी करतात. एकदा केळीला बेसल डोस व नंतर ठिबकमधून विद्राव्य खते देण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. जमिनीत कुठल्या अन्नघटकांचा अभाव आहे, याची माहिती शेतकरी ठेवतात. त्यानुसार विद्राव्य खतांची मर्यादित मात्रा दिली जाते. यामुळे खतांवरील अनावश्यक खर्च कमी होण्यास मदत झाली आहे.
खासगी संस्था, व्यापारी केळीची जागेवर खरेदी करतात. दर्जानुसार खरेदीदारांकडून केळीचा चांगला दर मिळविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. केळीला मागील दोन वर्षे प्रतिक्विंटल एक हजार रुपये सरासरी दर मिळाला. किमान २० किलोची रास शेतकऱ्यांनी टिकवून ठेवली आहे. कंदांच्या बागेत तीन ते चार वेळेस काढणी होते. उतिसंवर्धित बागेत दोन टप्प्यात काढणी पूर्ण होते. काढणीनंतर अनेक शेतकरी केळीचे अवशेष ट्रॅक्टरचलित अवजारांच्या साह्याने बारीक करून जमिनीत गाडतात. त्यानंतर कापूस, कांदा आदी पिकांची लागवड केली जाते. केळी पिकात मोतीलाल पाटील, मगन पाटील, नवल पाटील, राजू कोळी, राहुल पाटील, मुकुंदा पाटील, भिका पाटील, किरण पाटील आदी शेतकऱ्यांनी प्रयोगशीलता जोपासली आहे.
मका, बाजरी, कापूस लागवडीवर भर
गावात दूध व्यवसाय अधिक असल्याने चाऱ्यासह उत्पादन म्हणून बहुसंख्य शेतकरी मका लागवडीकडे वळले आहेत. कापूस, केळीखालील क्षेत्र रिकामे झाल्यानंतर त्यामध्ये मका लागवड केली जाते. मका लागवडीखाली १०० टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. काही शेतकरी मका पिकासाठी विद्राव्य खतांचा चांगला वापर करतात. मोतीलाल पाटील व काही शेतकरी एकरी ३५ क्विंटलपर्यंत मक्याचे उत्पादन घेतात. मुकेश पाटील यांनी देखील मका पिकाचे चांगले व्यवस्थापन करून दर्जेदार, भरघोस उत्पादन घेण्यासंबंधी सातत्य ठेवले आहे. बाजरी पिकाचेही चांगले व्यवस्थापन करून एकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी गावामध्ये आहेत. बाजरीच्या संकरित जातींच्या लागवडीवर येथील शेतकऱ्यांचा भर आहे. मागील हंगामात बाजरीला प्रतिक्विंटल २१०० रुपये दर काही शेतकऱ्यांना मिळाला. हे पीक घेतल्यानंतर त्यानंतर केळी लागवड केली जाते.
काही शेतकरी कांद्याची खरिपासह रब्बीमध्ये लागवड करतात. मात्र, दरातील चढ उतारामुळे कांदा क्षेत्र मर्यादित राहिले आहे. गावामध्ये दरवर्षी ६० हेक्टर क्षेत्रावर बीटी कपाशीची लागवड असते. ठिबक सिंचन, एकात्मिक खत व्यवस्थापन, कीड, रोग नियंत्रणाबाबत शेतकरी जागरूक आहेत. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी मागील दोन वर्षे सातत्याने शिफारशीत कीडनाशकाच्या फवारण्या आणि कामगंध सापळ्यांचा उपयोग शेतकरी करीत आहेत. बोंड अळीचा पुढील हंगामात प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापसाखालील क्षेत्र डिसेंबरमध्येच रिकामे करण्यावर बहुसंख्य शेतकरी भर देतात. कापसाचे एकरी आठ ते बारा क्विंटल उत्पादन मिळते. यंदा अतिपावसात उत्पादकतेवर मात्र परिणाम झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.