Agriculture News:काळानुसार शेतीतही हवेत बदल

Agriculture
Agriculture
Updated on

गेली काही वर्षे फ्रान्समध्ये सुद्धा वातावरण बदल होत आहे, गारांचे प्रमाण आणि आकारही वाढत आहे. त्यामुळे केवळ आच्छादनाने द्राक्ष पीक वाचविता येणार नाही, यासाठी पर्यायी पीक पद्धती स्विकारावयास हवी, हा तेथील काही शेतकऱ्‍यांचा विचार काळानुसार आपण बदलावयास हवे, हेच आपणास शिकवून जातो. 

आपल्या देशात शेतीपेक्षाही शेती कसणाऱ्यांमध्ये जास्त उणीवा आढळतात. हे विधान थोडे धाडसाचे असले तरी सत्यतेकडे वळणारे आहे. पहिली उणीव म्हणजे आम्ही मुळातच संघटित नाही. कोणत्यातरी एका जिव्हाळ्याच्या मुद्यावर शेतकरी एकत्र येतात, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो आणि मुळ आवाज निर्णय लादणाऱ्यांच्या कानावर पडण्याऐवजी त्याचे प्रदुषित प्रतिध्वनीच जास्त परावर्तित होतात. त्यामुळे मुळ मागणी आणि त्यातील त्रुटी बाजूला राहून आंदोलन भरकटत जाते. समस्या आणि तिची आपणास बसणारी झळ याचा स्वत: अभ्यास न करता फक्त हाकेला ‘ओ’ देणे ही आपली फार मोठी उणीव आहे. आपल्या जमिनीची रासायनिक खतांची क्षमता संपली असतानाही आपण तिच्यामध्ये खते ओतत जातो, तेच ते पीक घेत असतो म्हणजेच बदल करण्याची आमची इच्छाच नाही, नवीन प्रयोग करण्याची तयारी नाही म्हणूनच विक्रीसाठी रांगेमध्ये कित्येक दिवस थांबावे लागते हे कापूस, सोयाबीन पिकांनी आम्हाला शिकवले. वेळ काढून त्याचे वाचन करावे म्हटले तर तोपर्यंत पाने भिजून गेलेली असतात. 

भूगर्भामधील जलाचा उपसा करताना आपण आपली सोय पाहतो पण भूगर्भामधील जलस्तोत्र किती आहे, कुठपर्यंत पसरला आहे याचा आपला अभ्यास नसतो. तो आमचा विषयच नाही म्हणून आपण बाजूला होतो. ‘एक तीळ सात लोकांनी वाटून खावा’ अशी वाडवडिलांची शिकवण असताना आपण तो एकटाच खातो. आपल्या विंधन विहीरीमुळे परिसरामधील विंधन विहिरीवर काय परिणाम होणार आहे, आपण आपल्या बांधावरचे मधमाशांचे पोळे असलेला वृक्ष तोडतो तेव्हा परिसरामधील कुणाची तरी सूर्यफुल शेती उध्वस्त झालेली असते याची आपण जाणीव ठेवत नाही. एकाने एक पीक उत्पादन घेतले की आपण तेच पीक जास्त क्षेत्रावर घेतो आणि नंतर भाव पडले की आम्ही आवाज उठवतो. पुस्तकी ज्ञान, ऐकीव ज्ञान आणि शेतीचे ज्ञान यात खुप फरक आहे. 

इस्त्राईल हा हरितगृहांचा देश आहे. तेथे हजारो हरितगृहांत भाजीपाला-फुलांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, शेजारच्या दोन हरितगृहातील पिकामध्ये कायम फरक असतो. तेथील शासन शेतकऱ्‍यांना निर्यातीचे उद्दिष्ट प्रतिवर्षी ठरवून देते. त्याप्रमाणे शेतकरी आपापसात विचारमंथन करुन उत्पादन घेतात. इस्त्राईल हा देश सर्व जगाला उत्कृष्ट दर्जाची फळे, भाज्या निर्यात करतो तो अशा या सुसंवादामधूनच! फ्रान्स आज द्राक्ष पिकामध्ये जगात आघाडीवर आहे. गारांचा वेळी अवेळी होणारा वर्षाव हा द्राक्ष फळांचा प्रथम क्रमांकाचा शत्रू. तेथील शेतकरी पिकांचे योग्य आच्छादन करुन त्यांचे द्राक्षे गारापासून सांभाळतात. गेली काही वर्षे वातावरण बदल होत आहे, गारांचे प्रमाण आणि आकारही वाढत आहे. त्यामुळे केवळ आच्छादनाने हा प्रश्न सुटणार नाही यासाठी पर्यायी पीक पद्धती स्विकारावयास हवी, हा तेथील काही शेतकऱ्‍यांचा विचार काळानुसार आपण बदलावयास हवे, हेच आपणास शिकवून जातो. याला परिस्थितीनुसार शेतीचा अभ्यास म्हणतात. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नुकताच प्रसिद्ध झालेला एक अहवाल सांगतो की महाराष्ट्रात १९७० ते २०१९ या ५० वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडात सात पटीने दुष्काळ आणि त्याबरोबरीने सहा पटीने महापूरांची संख्या वाढलेली आहे. आपण अनेक वेळा पाहतो एका तालुक्यात भरपूर पाऊस पडतो मात्र त्याच्या सिमेवर असलेला दुसरा तालुका कोरडा असतो. एका गावात पाऊस तर बाजूच्या गावात थेंबही नसतो. एवढेच काय एक वावर पावसाने भिजते आणि बांधालगतचे दुसरे कोरडे असते. थोडक्यात पाऊस पंचक्रोशीत पडला हा शब्दप्रयोग पुढील दशकात विसरला जाईल की काय, याची भीती वाटते. नद्यांना महापूर, गुरे-ढोरे वाहून जाणे, उभे पीक नष्ट होणे, मालमत्ता, मनुष्यहानी यामधून प्रतिवर्षी हजारो कोटी रुपयांचे नुकसान होते. २००५ पासून देशामध्ये नुकसानीच्या अशा तब्बल ३०५ घटना घडल्या आहेत. महाराष्ट्राचेच उदाहरण घेताना २००० ते २००९ या दशकात आपल्याकडे नऊ महापूर आले तर २००९ ते २०१९ मध्ये हीच संख्या दुपटीपेक्षा जास्त म्हणजे १९ झाली. यामध्ये मुंबई, ठाणे, रत्नागिरी हे जिल्हे आघाडीवर आहेत. आश्चर्य म्हणजे औरंगाबाद, कोल्हापूर, पूणे आणि सांगली या दुष्काळी जिल्ह्यांवर वातावरण बदलाचा प्रभाव आता प्रकर्षाने जाणवू लागला आहे हे तेथील वादळ, पाऊस आणि पूर परिस्थिती पाहता आता प्रत्यक्ष अनुभवण्यास येत आहे. 

वेगाने पसरणारी शहरे आणि त्याला जागा देण्यासाठी आकुंचित होणारा निसर्ग हे यास कारणीभूत आहे. कर्बवायुचे उत्सर्जन, तापणारी शहरे यामुळे गेल्या दशकात पावसाचे प्रमाण वाढत तर आहेच पण आता ते लांबत सुद्धा आहे. भूपृष्ठावरील वृक्षछाया कमी झाल्यामुळे वादळांची अवस्था शाळा सुटल्यावर घरी धावत येणाऱ्या मुलासारखी झाली आहे. वृक्ष हे वातावरण बदलात सुरक्षा रक्षकांचे काम करत असतात. आज आम्हाला या बिनपगारी सुरक्षा रक्षकांचा विसर पडला आहे. परिषदेचा हा अहवाल येणाऱ्‍या वर्षात राज्याला धोक्याची जाणीव करुन देणारा त्याचबरोबर शेतकऱ्‍यांना वातावरण बदलामधील गेल्या एक दशकाच्या चढउताराची नोंद घेऊन शेतीचा सखोल अभ्यास करण्यास सुचवत  आहे.
 : ९८६९६१२५३१ 
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()