इंधनबचतीसाठी पर्यावरणपूरक सौर चूल

इंधनबचतीसाठी पर्यावरणपूरक सौर चूल
Updated on

सौरऊर्जेच्या साह्याने रोजच्या जेवणातील सर्व पदार्थ सौर चुलीद्वारे शिजवता येतात. घरगुती पातळीवर अन्न शिजवण्यासाठी पेटी सौर चूल आणि केंद्रीय सौर चुलीचा वापर केला जातो, तर मोठ्या प्रमाणात अन्न शिजवण्यासाठी शेफलर सौर चूल उपयुक्त आहे.

सौर चुलीवर अन्न शिजवताना ऋतू, हवामान, वेळ, अन्नाचा प्रकार, पदार्थाची जाडी यावर अन्न शिजण्याचा कालावधी अवलंबून असतो. मांसाहारी पदार्थांना तीन ते चार तासांपर्यंत तर भाज्यांना अर्धा तास ते अडीच तास, डाळींना दीड ते दोन तास, भातास अर्धा तास ते दोन तास असा साधारण शिजण्याचा कालावधी लागतो. भाताकरिता तांदूळ व पाण्याचे प्रमाण १ः२ असावे. डाळीकरिता डाळ जेमतेम पाण्यात बुडेल इतके पाणी असावे. पाण्याचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त असल्यास अन्न शिजवण्यास जास्त/अतिरिक्त वेळ लागतो.

सौर चुलीचे प्रकार
अ) घरगुती पातळीवर अन्न शिजवण्यासाठी  
पेटी सौर चूल/बॉक्स प्रकारची सौर चूल 
केंद्रीय सौर चूल/पॅराबोलिक सौर चूल
ब) मोठ्या प्रमाणात अन्न शिजवण्यासाठी  शेफलर सौर चूल

पेटी सौर चूल/बॉक्स प्रकारची सौर चूल 
सूर्यापासून येणाऱ्या किरणाची तरंगलांबी कमी असते. त्यामुळे ही किरणे काचेमधून सहज आत जाऊन आत असलेल्या काळ्या रंगाच्या धातूच्या डब्यांवर शोषली जातात. धातुपात्राद्वारे उत्सर्जित सौरकिरणाची तरंगलांबी जास्त असल्याने ती काचेच्या बाहेर जाऊ शकत नाहीत, त्यामुळे सौर पेटीच्या आतील भागात तापमान वाढते. सौर पेटीला असलेल्या पारदर्शक दोन काचांमध्ये थोडे अंतर ठेवून ते झाकण रबरपट्टीद्वारे घट्ट बसविले जाते. त्यामुळे पेटीतील उष्णता जास्त काळ टिकते. सौर पेटी चूल उन्हात ठेवल्यास पेटीमध्ये ठेवलेली काळ्या रंगाची धातूची भांडी तापतात आणि त्यातील अन्न तापमानवाढीमुळे ठरावूक कालावधीनंतर शिजते.

सूर्यकिरणाच्या प्रखरतेवर व उष्णतारोधकाच्या कार्यक्षमतेवर आतील तापमान अवलंबून असते. बिजागिरीच्या साह्याने चौकटीस लावलेल्या परावर्तित काचेमुळे (आरसा) सूर्यकिरणे संकलित करण्याचे क्षेत्र वाढविता येते. या परावर्तित काचेमुळे सूर्यकिरणे परावर्तित होऊन पारदर्शक काचेतून आतील असलेल्या काळ्या रंगांच्या धातूच्या डब्यावर शोषली जातात व पेटीतील आतील तापमान वाढते.

या परावर्तक काचेचा (आरसा) कोन सूर्यकिरणाच्या परावर्तन पेटीमध्ये होईल अशा प्रकारे ठेवल्यास १५ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत जादा तापमान मिळते. सौर पेटी चूल ६०×६०×२० सें मी., ५०×५०×१६.५ सें मी. आणि ६०×६०×१७ सें मी. या आकारामध्ये बाजारात उपलब्ध आहेत. एक परावर्तक (आरसा) असलेल्या सौर चुलीमध्ये बाहेरील तापमानापेक्षा पेटीच्या आतील भागात ७० ते ११० अंश सेल्सिअस अधिक तापमान मिळते. त्यामुळे अन्न शिजण्यास मदत होते.

केंद्रीय सौर चूल/पॅराबोलिक सौर चूल
ज्या पदार्थांना शिजण्यासाठी जास्त तापमानाची आवश्‍यकता असते, त्याकरिता केंद्रीय सौर चूल/पॅराबोलिक सौर चुलीचा वापर होतो. सौर पॅराबोलिक कुकरचा उपयोग ५ ते ७ माणसांच्या कुटुंबाच्या कमीत कमी वेळेमध्ये कोणतीही अतिरिक्त ऊर्जा न वापरता स्वयंपाक करण्यासाठी होतो. हा सौर कुकर, पॅराबोला आकाराच्या तबकडीपासून बनविण्यात येतो. या सौर कुकरची निर्मिती करताना मुख्यतः एम. एस. रॉड, चकाकी दिलेला अॅल्युमिनियम पत्रा, लोखंडी पट्टी, स्क्रू इत्यादींचा वापर करण्यात येतो. पॅराबोलिक सोलर कुकर हा सुट्या भागाच्या रूपात उपलब्ध असून, त्याची जोडणी अत्यंत सोपी असते. हा सोलर कुकर घरगुती तसेच होस्टेल्स, धाबे इत्यादी ठिकाणी स्वयंपाक करण्यास उपयुक्त आहे. यामध्ये एकाच वेळेला ५ ते ७ माणसांचे अन्न ४० ते ४५ मिनिटांत शिजविले जाते. त्यामुळे या कुकरच्या वापराने विविध प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ कमी वेळेत बनविणे शक्य आहे. वापरण्यास अत्यंत सोपा व कोठेही वाहून नेता येणारा असा हा बहुपयोगी कुकर असून, यामध्ये सर्व प्रकारचे भाजण्याचे पदार्थसुद्धा करता येतात. यामध्ये आपला नेहमी वापरातला प्रेशर कुकर ठेवून त्यामध्ये सर्व प्रकारचे अन्न शिजवता येते.

केंद्रीय/पॅराबोलिक सौर चुलीची वैशिष्ट्ये
इंधनाची बचत करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतो.
या कुकरद्वारे २३०० अंश सेल्सिअस इतके उच्च तापमान मिळू शकते. चांगल्या सूर्यप्रकाशात एक तासामध्ये अन्न शिजवू शकतो.
हाताळण्यास आणि स्वच्छ करण्यास अगदी सोपा आहे. टिकाऊ, सुरक्षित व अधिक कार्यक्षम आहे. 
दिवसातून कितीही वेळा वापरता येतो. (ऊन असेपर्यंत)
हेमंत श्रीरामे, ९४२२५४५९१५
मयूरेश पाटील, ९०२१६८२३९५

(विद्युत आणि अपारंपरिक ऊर्जास्रोत विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.