फळे, भाजीपाला, फूल शेतीतून उंचावले अर्थकारण

फळे, भाजीपाला, फूल शेतीतून उंचावले अर्थकारण
Updated on

कंझारा (जि. अकोला) येथील जयेश देशमुख या तरुण शेतकऱ्याने पाण्याची गरज, करावी लागणारी मेहनत, कमी वेळेत मिळणारे उत्पादन व तुलनेने दर या बाबींचा विचार करून फळबाग व भाजीपालाकेंद्रित शेती आकारास आणली आहे. आर्थिकदृष्ट्या बळकट केली आहे.

अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथे जयेश देशमुख यांची शेती आहे. सन २००४ नंतर हे कुटुंब व्यावसायिक शेतीकडे वळले. त्यात फळबागा व भाजीपाला केंद्रित शेतीवर अधिक लक्ष दिले. 

व्यावसायिक शेतीत  हे मुद्दे लक्षात घेतले
 पाणी- पाण्याची उपलब्धता पाहून किंवा त्याची गरज तुलनेने कमी लागेल अशा पिकांचा विचार
 मेहनत- कमी मेहनतीत चांगले उत्पादन मिळेल 
 कालावधी- कमा कालावधीत चांगले पैसे देऊ शकणारी पिके 
 दरवर्षी अवकाळी पावसाचा कालावधी, गारपीट आदींचा धोका लक्षात घेऊन मार्चनंतरच लागवडीचे नियोजन 
 

इंधनबचतीसाठी पर्यावरणपूरक सौर चूल

सध्याची पीकपद्धती
 फळे- पपई, केळी, कलिंगड, खरबूज  
 भाजीपाला- फ्लॉवर, कोबी, मिरची, कारले, काकडी
 हंगामी- तूर, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस
 फूल पिके- झेंडू, आता शेवंतीचे नियोजन 

पीकनिहाय तपशील
पपई :
दरवर्षी आठ ते दहा एकरांत पपई असते. लागवड मार्च महिन्यात होते. एकरी सुमारे एकहजार रोपे लागतात. प्रति झाड ३५ ते ४० किलो तर एकरी ३५ ते ४० टनांपर्यंत उत्पादन मिळते. दर किलोला सरासरी सहा ते आठ रुपयांपर्यंत मिळतो.  

झेंडू : लागवडीचे हे सलग दुसरे वर्ष आहे. एकरी झाडसंख्या १० हजारांपर्यंत असते. बेड व मल्चिंग पेपरचा वापर होतो. एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळते. किलोला २० ते ३० रुपयांदरम्यान दर मिळतो. विक्री अमरावती, अकोला, पुणे व हैदराबाद येथे होते. 

कलिंगड : हे पीक चार ते आठ एकरांपर्यंत टप्प्याटप्प्याने लागवड यानुसार वर्षभर शेतात असते. एकरी २५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. किलोला सहा रुपयांपासून आठ रुपयांपर्यंत दर मिळतो. 

केळी : पाण्याची उपलब्धता पाहूनच लागवड करण्याकडे कल असतो. दरवर्षी साधारणतः तीन एकर क्षेत्र असते. लागवड फेब्रिवारीत असते. त्याचे कारण पुढील जानेवारी-फेब्रुवारीत केळीची आवक बाजारात कमी असते. त्या काळात चांगल्या दरांची अपेक्षा असते. एकरी २५ ते ३० टनांपर्यंत उत्पादन मिळते. दर ८ ते १० रुपयांदरम्यान प्रतिकिलो मिळतो.

भाजीपाला :  कारली, काकडी- दोन्ही पिके दरवर्षी असतात. कारले जानेवारीच्या दरम्यान तर काकडी मेअखेरीस घेण्यात येते. मल्चिंगवर दोन एकरांत मिरची असते. तीनही पिकांचे एकरी २० टनांच्या आसपास उत्पादन मिळते.

आंतरपिके : पपईमध्ये देखील कलिंगड, कोबीचे आदींचे आंतरपीक घेतात. त्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात मुख्य पिकाचा खर्च कमी होतो.  

  जयेश बबनराव देशमुख,  ९६८९३१०९५०, ८४५९२७५५९९

जागेवरच विक्री 
जयेश यांनी फळपिकांसाठी शेताच्या बांधावरच विक्री व्यवस्था उभारली आहे. व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. तोडणी व पॅकिंगची जबाबदारीही व्यापाऱ्याकडेच असते. त्यामुळे वाहतूक व बाजारातील अन्य खर्च कमी होतात. कारली, काकडी मात्र मूर्तिजापूर बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते. झेंडू दोन एकरात बारमाही असते. पहिल्या वर्षात जयेश यांनी स्वतः मार्केटींग केले.  दरवर्षी एक एकरात ऊस असतो. जागेवरूनच व्यापाऱ्याला प्रतिधांड्याप्रमाणे विक्री होते. मागील वर्षी  २० रुपये प्रतिधांड्याने विक्री साध्य झाली. 

पाणी व्यवस्थापन : 
देशमुख कुटुंबाची संपूर्ण ४० एकर शेती बागायती आहे. त्यासाठी आवश्‍यक पाण्याचे स्त्रोत विविध ठिकाणांवरून बळकट केले. चार विहिरी खोदल्या. सोबतीला चार बोअर घेतले. चाळीस एकरांत ठिबक बसविले आहे. गरज भासल्यासच स्प्रिंकलरची मदत घेतली जाते. 

पॉलिमल्चिंगचा वापर : जवळपास सर्व पिकांत पॉलिमल्चिंगचा वापर करतात. त्यामुळे पाण्याची बचत होते. निंदणासाठीचा खर्च कमी होतो. सध्या महागलेल्या खतांचा पिकांसाठी वापर प्रभावीपणे होतो. विद्राव्य खतांचा ९० टक्के वापर होतो. रसशोषक किडींवर नियंत्रण राहते. 

झाडांसाठी आच्छादन : मूर्तिजापूर तालुक्यातील उन्हाळा अतिशय तप्त असतो. या कालावधीत पिकांची वाढ करणे मोठे आव्हान असते. त्यामुळे उन्हाळ्यात फळांना ‘कव्हर’ लावले जाते. शिवाय ससा, उंदीर यांच्यापासूनही झाड वाचविण्यासाठी मदत होते. फळांनाही कव्हर लावण्यात येते.  

आठ जणांना वर्षभर काम : फळे, फुले व भाजीपालाकेंद्रित शेती असल्याने मजुरांना सतत काम असते. त्यामुळे चार महिला व चार पुरुषांना देशमुख यांच्या शेतीने वर्षभर रोजगार दिला आहे.

नावीन्याची कास : जयेश वडील बबनराव यांचे मार्गदर्शन तर भाऊ सागर यांची मदत मिळते. शेतीत प्रयोग करणाऱ्या आठ ते दहा मित्रांचा जयेश यांचा गट आहे. सर्व जण शेतीतील ज्ञानाची देवाणघेवाण करतात. त्यामुळेच शेतीत बदल व नवे तंत्रज्ञान वापरणे शक्य होते. येत्या काळात द्राक्ष, पेरू तसेच अभ्यास करून ग्रीनहाउसमध्ये स्ट्रॉबेरी लागवड करण्याचा जयेश यांचा प्रयत्न आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.