संत्र्याची थेट विक्री करून शेतकऱ्याने कमावले 2 लाखाहून अधिक उत्पन्न

Farmer Chinmay Phutane
Farmer Chinmay Phutane
Updated on

अमरावती - दरातील घसरणीमुळे संत्रा उत्पादक हवालदिल झाले आहेत. अशातच वरुड तालुक्‍यातील शेतकारी चिन्मय फुटाणे यांनी संत्र्याचे थेट मार्केटिंग करीत सरासरी ४० रुपये किलोचा दर मिळविला आहे. या वर्षी चांगला दर आणि ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने पुढील वर्षी २५ ते ३० टन संत्र्याची थेट विक्री करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. 

संत्रा फळाच्या सालीवर संततधार पावसामुळे अपेक्षित रंगधारणा सुरुवातीला झाली नाही. त्यानंतर देशाच्या इतर भागांत देखील पाऊस लांबला, परिणामी संत्रा फळांना मागणी नव्हती. त्याचा परिणाम दरावर झाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. आंबिया बहराचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना अपेक्षित दर मिळत नसल्याने संत्रा तोडणीलाही महाग झाला आहे. सात ते दहा रुपये किलो या दराने संत्र्याची खरेदी होत आहे. परंतु वरुड तालुक्यातील रवाळा गावचे चिन्मय फुटाणे यांनी थेट मार्केटिंगच्या माध्यमातून खर्च वजा जाता चाळीस रुपये किलोचा दर मिळविला आहे. 

चिन्मय फुटाणे यांची पाच एकर संत्रा लागवड आहे. त्यातील अडीच एकर हलकी, तर अडीच एकर भारी जमीन. या वर्षी पावसाची संततधार सुरू असल्याने हलक्या जमिनीवरील बागेत आंबिया बहराची फळधारणा झाली. साडेसहा टन फळांची उत्पादकता अडीच एकरांतून झाली. चिन्मय फुटाणे हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यासोबतच त्यांचे वडील वसंतराव फुटाणे हे गेल्या ३८ वर्षांपासून सेंद्रिय शेतीमाल उत्पादन करतात. संत्रा बागेचे व्यवस्थापनदेखील गेल्या ३८ वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने होत आहे. त्यामुळे त्यांची सर्वदूर सेंद्रिय शेतीमाल उत्पादक अशी ओळख आहे. 

या वर्षी पाऊस लांबल्याने उत्पादकता प्रभावित झाली. साडेसहा टन अडीच एकरांतून उत्पादन झाले. पाच टन १७० किलो फळांची विक्री थेट केली आहे, त्या माध्यमातून दोन लाख ४० हजार रुपये उत्पन्न झाले. बाजारात दहा रुपये किलोचा दर असताना आम्हाला मात्र थेट मार्केटिंगच्या माध्यमातून सरासरी ४० रुपये किलोचा दर मिळाला आहे. 
- चिन्मय फुटाने, शेतकरी, रवाळा, ता. वरूड, जि. अमरावती 

सोशल मीडियावर देखील फुटाणे कुटुंबीय सक्रिय आहे. आपल्या बागेतील सेंद्रिय संत्रा उत्पादनाची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पसरविली. त्या माध्यमातून त्यांना सहज ग्राहक मिळाले. फळाचा दर्जा पाहून ९० ते ६० रुपये किलो याप्रमाणे संत्रा विक्री करण्यात आली. खर्च वजा जाता त्यांना ४५ ते ५० रुपये सरासरी मिळाले. एसटी पार्सल, रेल्वे तसेच खासगी बस या माध्यमांतून संत्रा वाहतूक करण्यात आली. त्याचा खर्च ग्राहकांकडून घेण्यात आला. लाकडी बॉक्समधून संत्रा ग्राहकांना पाठविण्यात आला. 

या वर्षी ग्राहकांचा थेट मार्केटिंगला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील वर्षी २५ ते ३० टन संत्रा देशाच्या विविध भागांत पाठवण्याचा मनोदय चिन्मय फुटाणे यांनी व्यक्त केला. शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापनादेखील ते करणार असून, त्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांचा संत्रा देखील थेट विकण्यावर भर दिला जाणार आहे. 

या ठिकाणी पाठविला संत्रा... 
सातारा, अंबाजोगाई, पुणे, नाशिक, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, मुंबई या शहरांमध्ये संत्रा पाठविण्यात आला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.