संत्रा क्रेटनिर्मिती व्यवसायात शोधली संधी

संत्रा क्रेटनिर्मिती व्यवसायात शोधली संधी
Updated on

संत्रा बाजारपेठ विकसित होण्यामध्ये पॅकिंग महत्त्वाचे झाले आहे. एकदाच वापरासाठी व पुनर्वापरासाठी अशा प्रकारे मागणीनुसार प्लॅस्टिक क्रेट बाजारात आले आहेत. विशेष म्हणजे वरूड (जि. अमरावती) भागातील काही बागायतदारांनी व व्यावसायिकांनी क्रेटनिर्मिती व्यवसाय सुरू केले आहेत. त्यातून स्वतःकडील संत्र्यांची गरज, खर्चात कपात, अधिक दर त्यांनी मिळवलाच. शिवाय उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोतही निर्माण केला आहे. 

प्रत्येक शेतीमालासाठी आता ‘पॅकेजिंग’महत्त्वाचे झाले आहे. संत्रा फळही त्यास अपवाद नाही. पूर्वी लाकडी बॉक्‍समधून संत्र्यांचा देशांतर्गंत आणि देशाबाहेर पुरवठा व्हायचा. आता प्लॅस्टिक क्रेटमधून संत्र्याला बाजारात मागणी येऊ लागली आहे. निर्यात देखील वाढीस लागली असून बांगला देशात तर क्रेटशिवाय अन्य  पॅकिंगमधील संत्रा स्वीकारलाच जात नाही. बाजारपेठेची ही मागणी व संधी काही संत्रा बागायतदार व व्यावसायिकांनी ओळखली. त्यानुसार प्लॅस्टिक क्रेटनिर्मितीच्या नव्या व्यवसायाचा शोध त्यांना लागला आहे. 

 लाकडी बॉक्‍सला मिळाला पर्याय 
पूर्वी लाकडी बॉक्‍समधून संत्रा पाठवताना ट्रकमध्ये विभागणी (पार्टिशन) करावी लागायची. यामध्ये काही वेळा खालील बाजूस असलेला संत्रा निश्‍चित ठिकाणी पोचण्याआधीच खराब व्हायचा. बॉक्‍स तयार करणे व पॅकिंगसाठीही तणस, दोर, रद्दी पेपर, खिळे अशा साहित्याचा उपयोग व्हायचा. प्रति बॉक्स ५५ ते ७० रुपये खर्च यायचा. त्याचे वजन सहा किलो राहायचे. त्यामुळे फळांच्या वजनासोबतच बॉक्‍स आणखी वजनदार व्हायचा. त्यामुळे ट्रकमध्ये माल भरणे आणि उतरविणे यात मोठे श्रम खर्ची व्हायचे.  लाकडी बॉक्‍सच्या तुलनेत २५ वर्षांपूर्वी प्लॅस्टिक क्रेटचा पर्याय होता. मात्र तो महागडा ठरत होता. त्यावेळी २५० ते ६०० रुपये प्रति क्रेट दर होता. त्यामुळे संत्रा पुरवठा केल्यानंतर क्रेट परत आणण्याचे दिव्य व्यापाऱ्यांना करावा लागायचे. विदर्भात पूर्वी मोठ्या संख्येने आमराई होत्या. संत्रा पॅकिंगसाठी  आंब्याचे खोड वापरले जायचे. त्यामुळे झाडांची कटाई झाली आणि आमराईचे अस्तित्वच भागातून नष्ट झाले आहे. 

वरुड परिसरात व्यवसाय 
राज्याच्या एकूण एक लाख २५ हजार हेक्‍टर संत्रा लागवडीपैकी अमरावती जिल्हयात सर्वाधीक सुमारे ७५ हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. देशातील विविध राज्यांसोबतच बांगला देशाला इथला संत्रा निर्यात होतो. बांगला देश नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार आहे. क्रेटमध्येच संत्रा पुरवठा केला जावा अशी या बाजारपेठेची मागणी राहते. हे क्रेट परत मिळण्याची शक्‍यता कमी राहते किंवा ते परवडणारे देखील नसते. त्यामुळे कमी वजनाचे प्लॅस्टिक  क्रेट तयार करण्याची कल्पना पुढे आली. तसे भागात चार उद्योग उभे राहिले आहेत. त्यामध्ये ताजु खान, आदित्य लेकुरवाळे, अनिकेत फुटाणे आणि सोनू खान यांचा समावेश आहे. नागपूर परिसरात चार ते पाच अशाप्रकारचे उद्योग उभारले आहेत. विदर्भात नाशिक, दिल्ली भागातून क्रेटचा पुरवठा यापूर्वी व्हायचा. आता ती गरज कमी झाली आहे.

लेकुरवाळे यांचा व्यवसाय  
शेंदूरजणा घाट (ता. वरूड) येथील आदित्य लेकुरवाळे सांगतात की माझी ६५ एकर शेती आहे. त्यात ४५ एकर संत्रा बाग आहे. सुमारे पाच हजार झाडे आहेत. दरवर्षी उत्पादनानुसार मला २० हजार ते २५ हजार क्रेट लागतात. मी सुमारे ८० लाख ते एक कोटी रुपयांचे भांडवल गुंतवून एक एकरांत क्रेट निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे. सुमारे ७५ लाख रुपयांचे यंत्र आहे. आकारमानानुसार क्रेट तयार करण्यासाठी मोल्डची (साचा) गरज राहते. त्याची किंमत २५ लाखांपेक्षा अधिक राहते. सप्टेंबर ते डिसेंबर असे चार महिने व्यवसायासाठी महत्त्वाचे ठरतात. दरवर्षी ४० ते ४५ हजारांपर्यंत क्रेटसची विक्री होते. 

आदित्य सांगतात...
लाकडी बॉक्स पॅकिंगमधील संत्र्याला सातशे रुपये दर असेल तर क्रेट पॅकिंगमधील संत्र्याला हाच दर ८०० रुपये मिळतो. प्रति १०० रुपये दर क्रेट पॅकिंगमुळे अधिक मिळतात.

या क्रेटचे वजन दीड किलो असल्याने ट्रकमध्ये संत्रा जास्त प्रमाणात बसतो. 
प्रति क्रेट २५ किलोपर्यंत फळे बसतात.

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

क्रेटमध्ये दोन प्रकार- १) एकदा वापरायचे (वन टाइम यूज) व २) दोन ते तीन खेपांपुरते वापरायचे (अप ॲण्ड डाउन). यात पहिल्या प्रकाराला सर्वाधिक मागणी. 
पहिल्या प्रकाराला नगाला ५५ रुपये, तर दुसऱ्या प्रकारातील क्रेटला ७० ते ७५ रुपये दर
स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री 
प्रति क्रेट मागे सरासरी पाच ते सहा रुपयांचे उत्पन्न मिळते. 

कोरूगेटेड बॉक्‍सचा पर्याय 
प्लॅस्टिक क्रेटसोबतच कोरूगेटेड बॉक्‍सचा पर्याय देखील संत्र्यासाठी उपलब्ध आहे. निर्यातक्षम पॅकिंगसाठी १० किलो क्षमतेच्या बॉक्‍सचा वापर होतो. जाडीनुसार त्याचे दर वाढतात. सरासरी ४५ ते ५५ रुपयांना हा बॉक्‍स उपलब्ध होतो असे ‘महाऑरेंज’चे संचालक श्रीधर ठाकरे यांनी सांगितले. मात्र  क्रेटमध्ये खेळती हवा राहत असल्याने या बॉक्सच्या तुलनेत फळे खराब होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे कोरूगेटेड बॉक्‍सच्या तुलनेत क्रेटचाच पर्याय बहुतांशी शेतकरी वापरतात. अर्थात क्रेट व्यवसायातील उलाढाल मात्र काही कोटी रुपयांत गेली आहे. वीस किलो बॉक्समध्ये किती फळे बसतात, त्यावरून आकाराचे मोजमाप केले जाते. ९६ फळे म्हणजे मोठ्या आकाराची तर निर्यातक्षम दर्जासाठी १४१ फळे व ३० किलो बॉक्ससाठी १७१ फळे असे त्याचे मोजमाप आहे. 

आमच्या प्रकल्पात दोन यंत्रे उभारली आहेत. प्रति यंत्र क्षमता १७५० क्रेट प्रति दिन आहे. त्यानुसार दिवसाला ३५०० क्रेट तयार होतात. सरासरी ७० रुपयांना दर पडतो. या ‘मटेरियल’चा पुनर्वापर शक्‍य होतो. त्यामुळे पॅकिंगसाठी हे साहित्य फायदेशीर ठरते. 
-ताजू खान 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.