योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर क्षेत्रात आठ वर्षांपासून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात सातत्य ठेवण्याचे कौशल्य कासेगाव (जि. सोलापूर) येथील दशरथ आणि दत्तात्रय या कादे बंधूंनी मिळवले आहे. दुष्काळ व अन्य प्रतिकूल परिस्थितीशी धैर्याने सामना करीत शेततळे, सौरपंप व मत्स्यपालन यांची जोड देत शेती किफायतशीर केली आहे.
सोलापूर-तुळजापूर महामार्गावर उळेपासून आत तीन किलोमीटरवर दक्षिण सोलापुरातील कासेगाव आहे. पाण्याचे जेमतेम स्त्रोत असूनही हा परिसर पूर्वीपासून दर्जेदार द्राक्षशेतीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात जवळपास २०० एकरांपर्यंत द्राक्षाचे क्षेत्र होते. मात्र गेल्या काही वर्षांत पाण्याच्या टंचाईमुळे ५० टक्क्यांपर्यंत क्षेत्र घटले. आज ते शंभर एकरांपर्यंत असावे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही उत्पादकता व गुणवत्ता टिकवणं आणि सलग आठ वर्षे निर्यात टिकवणं हे कष्टाचं, धाडसाचं आणि कौशल्याचं काम कासेगावातील बागायतदार पेलताहेत. दशरथ आणि दत्तात्रय हे कादे बंधू त्यापैकीच एक आहेत. त्यांची १५ एकर द्राक्षबाग आहे. आज या भागातील प्रगतिशील आणि प्रयोगशील द्राक्ष उत्पादक म्हणून त्यांनी आपली ओळख तयार केली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सुरुवातीचे प्रयत्न
दशरथ यांची गावात वडिलोपार्जित पाच एकर शेती होती. वडील भीमराव शेतीच करायचे. ज्वारी, बाजरी, कांदा अशी पिके त्यावेळी घेत. दशरथ व दत्तात्रय यांना नाजूक आर्थिक परिस्थितीमुळे दहावी व बारावीच्या पुढे फार शिकता आले नाही. दशरथ यांनी दहावीनंतर ‘ट्रॅक्टर मेकॅनिकल’ चा अभ्यासक्रम पूर्ण केला. दत्तात्रय यांनी थेट मुंबई गाठून नोकरी पत्करली. काही वर्षे अशीच गेली. पण कशाचाच मेळ बसत नव्हता. दरम्यान शेती पाहातच दशरथ यांनी तीन ते चार म्हशींपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला. गावातून सोलापुरात येऊन ते घरोघरी दुधाचे रतीब घालू लागले. पुढे १५ ते २० म्हशींपर्यंत व्यवसाय वाढला. पण तरीही समाधानकारक हाती काही लागत नव्हते.
दुग्धव्यवसायाकडून द्राक्षशेतीकडे
सन २००८ च्या सुमारास मावसभाऊ व द्राक्ष बागायतदार हणमंत गवळी (वडगाव) आणि नातेवाईक राजाराम जाधव (येळवट) यांनी दशरथ यांना द्राक्षशेतीचा सल्ला दिला. पण हे पीक जमेल का अशी शंका होती. अखेर नातेवाइकांनी सर्वतोपरी पाठबळ दिले. मग आत्मविश्वास वाढला. सन २००८ मध्ये अडीच एकरांवर टू ए क्लोन वाणाची लागवड केली. भाऊ दत्तात्रयही गावी आले. दोघांनी मिळून शेतीत पूर्णवेळ लक्ष दिले. व्यवस्थापन चांगले ठेवले. मेहनतीचे फळ मिळाले. एकरी १२ टनांच्या पुढे उत्पादन तर साडेचार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. त्यातून आत्मविश्वास वाढला.
निर्यातीत सातत्य
दरवर्षीचे अनुभव द्राक्षशेतीतील कौशल्य वाढवण्यासाठी उपयोगी पडत होते. मागील चुका सुधारत कादे बंधू पुढेपुढे जात होते. सन २०१० मध्ये बागेचे क्षेत्र वाढवले. सन २०१२ पासून निर्यातक्षम उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
त्यासाठी आणखी कष्ट आणि जोखीम पत्करली. ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादनावर भर दिला. एकरी १२ टनांपर्यंत उत्पादन तर प्रति किलो ६५ रुपये दर मिळाला. सन २०१३ मध्ये मात्र दुष्काळाची परिस्थिती अनुभवावी लागली. त्यातही हिंम्मत न हारता व्यवस्थापनात कसर ठेवली नाही. सध्या १५ एकरांवर व त्यातही सुमारे साडेबारा एकरांत टू ए क्लोन तर उर्वरित क्षेत्रात तास ए गणेश वाणाची लागवड होते. आठ वर्षांपासून युरोपीय देशांतील निर्यातीत सातत्य ठेवले आहे. एकरी १२ टनांपासून ते १७ टनांपर्यंत उत्पादन घेण्यात येते.
दुष्काळात बाग जगविली
सन २०१३ मध्ये दुष्काळाची मोठी झळ बसली. प्रति टँकर हजार रुपयाप्रमाणे पाणी विकत घेऊन बाग जगवावी लागली. त्याचबरोबर गावच्या उत्तरेला २०१४ मध्ये बारा एकर शेती घेतली. ही जमीन हलकी, दगडगोट्याची, माळरान होती. पाण्याचा स्रोत नव्हता. पण पूर्वाश्रमीचा अनुभव लक्षात घेऊन ती चांगली विकसित केली. पाण्याचा शाश्वत स्रोत तयार करण्यासाठी पाच कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले आणि त्यानंतर इथे दहा एकर लागवड केली.
व्यवस्थापनातील ठळक बाबी
शेततळ्यात मत्स्यपालन - शेततळ्यात दरवर्षी जूनच्या दरम्यान ५० हजारांपर्यंत मत्स्यबीज वापरण्यात येते. राहू, कटला, मृगल जातीचे मासे आहेत. एप्रिल-मेमध्ये मासे विक्रीसाठी तयार होतात. प्रति किलो ७० ते ९० रुपये दर मिळतो. त्यातूनही तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते.
सौरकृषीपंपाचा वापर - पाण्यासाठी जसा शेततळ्याचा कायमस्वरुपी स्रोत तयार केला. त्याच पद्धतीने विजेसाठीही यंदा मुख्यमंत्री योजनेतून पाच एचपी क्षमतेचा कृषीपंप घेतला. पाच तासांहून अधिक काळ तो चालतो. त्यातून विजेची बचत करताना शाश्वत सोयही तयार केली आहे.
द्राक्ष उत्पादकांचा समूह - द्राक्षशेतीत जवळपास शून्यातून कादे बंधूंनी प्रगती केली आहे. नातेवाईक, मित्र, शास्त्रज्ञ यांच्या मदतीने त्यांनी ते करून दाखवले. त्याचप्रमाणे आपणही अन्य शेतकऱ्यांना पुढे न्यावे या भावनेतून गावातील काही शेतकऱ्यांना द्राक्षलागवडीसाठी प्रवृत्त केले आहे. त्यांचा वैष्णवी शेतकरी गट आहे. शेतीतील अडचणी आणि उपायांवर त्यात देवाणघेवाण होते.
- दशरथ कादे, ९९२१६३२१७४
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.