‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन् सौर ऊर्जेचा जागर
शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्यामध्ये पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाबाबत जागृती करण्यासाठी विविध संस्था कार्यरत आहेत. या संस्थांपैकीच एक आहे ‘तेर पॉलिसी सेंटर` ही स्वयंसेवी संस्था. हवामान बदलाचे परिणाम, पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम शहरी तसेच ग्रामीण भागातील लोकांच्यापर्यंत पोचविण्यासाठी डॉ. विनीता आपटे यांनी २००९ मध्ये तेर पॉलिसी सेंटर या स्वयंसेवी संस्थेची पुण्यामध्ये सुरवात केली. आज या संस्थेबरोबरीने शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळा, विविध उद्योग समूह आणि पर्यावरणाविषयी काम करणारे लोक जोडले गेले आहेत.
उपक्रमाबाबत संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनीता आपटे म्हणाल्या की, २००५ -०६ मध्ये बॅंक आॅफ महाराष्ट्र मध्ये नोकरी करत असतानाच संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या विभागाने हवामान बदल आणि पर्यावरण विषयक मार्गदर्शक पुस्तके इंग्रजीत प्रकाशित केली होती. ही माहिती ग्रामीण भागातील नागरीक आणि विद्यार्थांना कळण्यासाठी मी ही पुस्तके मराठी, हिंदी, बंगाली, उर्दू आणि गुजराथी भाषेमध्ये भाषांतरीत केली. या पुस्तकांमुळे हवामान बदलाचे ग्रामीण भागावर होणारे परिणाम विद्यार्थ्यांना कळण्यास काही प्रमाणात मदत झाली. २००८ मध्ये बॅंकेतील नोकरी सोडून मी संयुक्त राष्ट्र संघामध्ये तीन वर्ष पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केले. यातून मला जागतिक स्तरावर पर्यावरण आणि हवामान बदलाविषयी सुरू असलेली चर्चा आणि त्याबाबत उपाययोजनांची माहिती मिळत गेली. याच दरम्यान नोव्हेंबर, २००९ मध्ये मी ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. फ्रेंच भाषेत ‘तेर` या शब्दाचा अर्थ पृथ्वी.
आम्ही पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका आणि सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर गाव परिसरात पर्यावरण, शालेय शिक्षण आणि ग्रामीण महिलांच्या विकासाबाबत काम करणाऱ्या संस्था, अभ्यासकांच्या मदतीने पर्यावरण, शिक्षण या विषयात काम सुरू केले. मुळशी तालुक्यातील उरवडे, पिरंगुट, घोटवडे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा, महिला बचत गटांच्याबरोबरीने आम्ही विविध उपक्रम करतो. बचत गटातील महिलांना आम्ही ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन, रोपवाटिका नियोजन, बांबूपासून विविध वस्तू बनविण्याबाबत प्रशिक्षण दिले. गेल्यावर्षी संस्थेने सातारा जिल्ह्यातील बारा शेतकऱ्यांसाठी सिक्कीम राज्यातील सेंद्रिय शेती अभ्यास दौरा आयोजित केला होता.
लोकसहभागातून वनीकरण
संस्थेने पुणे शहरात वनविभागाच्या मदतीने मोकळ्या टेकड्यांवर वनीकरणाचा उपक्रम हाती घेतला. सध्या पुणे शहरातील वारजे टेकडीवर सोळा हेक्टर परिसरात वनीकरणास सुरवात झाली आहे. या टेकडीवर आत्तापर्यंत लोक सहभागातून दहा हजार झाडांची लागवड झाली आहे. यासाठी पुणे परीसरातील कंपन्यांनी रोपांची उपलब्धता करून दिली. पुणे शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रोप लागवडीसाठी पुढाकार घेतला टेकडीवर वड, पिंपळ, मुचकुंद, सप्तपर्णी, कात, कडुनिंब, रूद्राक्ष, औदुंबर यासारख्या देशी वृक्षांच्या लागवडीस प्राधान्य देण्यात आले आहे. या उपक्रमातून वारजे टेकडीवर स्मृतीवन आकार घेत आहे. या ठिकाणी लोकांनी स्वतःच्या नातेवाइकांच्या नावाने झाडे दत्तक घेतली आहेत. या झाडांच्या व्यवस्थापनातही लोक सहभाग वाढतो आहे. संस्थेने या टेकडी परीसरातील जैवविविधतेचा अभ्यास करून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. पुणे शहरातील सुस परिसरातील वनविभागाच्या टेकडीवर गेल्यावर्षी वृक्षारोपण करण्यात आले. पिरंगुट येथे मुलींची सैनिक शाळा आहे. या शाळेच्या मोकळ्या जागेवर विद्यार्थिनींच्या मदतीने गेल्यावर्षी झाडे लावण्यात आली. या झाडांची देखभाल मुलीच करतात.
तेर संस्था, जेएसडब्लू फाउंडेशन आणि वनविभागाच्या सहकार्याने अलिबाग तालुक्यातील डोलवी, कारावी या डोंगरी भागातील आदिवासी गावात ५६ हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. या वनीकरणाच्या माध्यमातून गाव परिसरातील लोकांना खड्डे खणणे, रोपे लावणे आणि देखभालीतून रोजगार निर्मिती होत आहे. या ठिकाणी काही फळझाडे, बांबू लागवडीचे नियोजन केले आहे. यातून पुढील काही वर्षांत स्थानिकांना रोजगार तयार होईल.
विद्यार्थ्यांसाठी तेर आॅलिंपियाड
संस्थेतर्फे गेल्या तीन वर्षांपासून सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत आॅनलाईन तेर आॅलिंपियाड घेतले जाते. यामध्ये देशभरातील विद्यार्थी सहभागी होतात. यावर्षी दीड लाख विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. विजेत्या मुलांना बक्षिसे दिली जातात. दर महिन्याला संस्थेतर्फे पर्यावरण विषयात काम करणाऱ्या व्यक्तिला ‘प्रकाशाचे बेट` या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
दुर्गम गावातील विहिरींची दुरुस्ती
पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाच्या परीसरातील दुर्गम गावातील महिलांना दररोज पाण्यासाठी पायपीट करावी लागते. हे लक्षात घेऊन संस्थेने विविध कंपन्यांच्या सहकार्याने पिंपरी, गोसावी वस्ती, सुसाळे या गाव परिसरातील वाड्या वस्तातील सहा विहिरीचे खोलीकरण केले. काही विहिरींचे बांधकाम करून दिल्याने पाणी साठा वाढला. यामुळे महिलांचे श्रम वाचले, जनावरांना पुरेसे पाणी मिळू लागले. काही विहिरींवर सौर पंप बसविलेले आहेत. एका गावात सायफन पद्धतीने विहिरीतील पाणी गावातील टाकीत सोडले आहे. त्यामुळे गावातच पाण्याची उपलब्धता झाली. गाव परिसरातील महिलांना संस्थेने बांबू टोपल्या विणणे, बांबू कलाकुसरीबाबत प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. यातून स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होणार आहे. मुऱ्हा खराबा हे मुळशी तालुक्यातील पंधरा उंबऱ्यांचे गाव. दुर्गम भाग असल्याने या गावात वीज पोचलेली नाही. संस्थेने या लोकांची मागणी लक्षात घेऊन टाटा मोटर्सच्या आर्थिक सहकार्याने सौर ऊर्जा प्रकल्प उभारला आहे.
सौर दिवेनिर्मिती उपक्रम
कार्यक्षेत्रातील गावांच्यामध्ये सौर ऊर्जेच्या वापराबाबत जागृती.
शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना सौर दिवे बनविण्याचे प्रशिक्षण. दिव्यांसाठी सुट्या भागांची भारतीय कंपन्यांकडूनच खरेदी. हे सुटे भाग विद्यार्थ्यांना सौर दिव्यांच्या जोडणीसाठी पुरविले जातात. दिव्यांच्या जोडणीसाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मोबदला.
राज्यातील पंचवीस गावातील शालेय विद्यार्थ्यांना याबाबत सौर दिव्यांच्या जोडणीबाबत प्रशिक्षण. दरवर्षी पाच हजार सौर दिव्यांची निर्मितीचे लक्ष्य.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले दिवे विविध संस्था, कंपन्या विकत घेऊन ग्रामीण भागातील गरजू लोकांना देतात.
खेळातून पर्यावरण शिक्षण
शहरी, ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये हवामान बदल आणि पर्यावरणाबाबत जागृती होण्यासाठी सोप्या भाषेत माहिती पुस्तिकांची निर्मिती. पुस्तकांमध्ये पाणी, हवा प्रदूषण, हवामान बदलाचे धोके आणि उपाययोजनांची सचित्र माहिती.
सापशिडी, पत्यांच्या माध्यमातून मुलांना पर्यावरण विषयक शिक्षण देण्यावर भर.
राज्यातील विविध शहरे तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्षभर उपक्रम.
गेल्यावर्षी खेळातून पर्यावरण शिक्षण या उपक्रमांतर्गत पुणे जिल्ह्यातील ३५ शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण. या उपक्रमासाठी संस्थेने प्रत्येक गावातील दहा होतकरू मुलींचा गट तयार केला. या मुलींच्या शैक्षणिक खर्चासाठी संस्थेचा हातभार.
कास पठार परिसरातील गावांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन विषयक प्रशिक्षण.
०२० - २५४४८६५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.