नंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात ओळख

Nanda-Bhujbal
Nanda-Bhujbal
Updated on

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा पांडुरंग भुजबळ यांनी महिला शेतकरी ते प्रक्रिया उद्योजक अशी ओळख तयार केली आहे. धान्य महोत्सव, आठवडे बाजार, प्रदर्शनांद्वारे तसेच डाळ मिल उभारून त्यांनी स्वबॅंण्डद्वारे डाळी, तांदूळ, गहू व अन्य उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील भुजबळ कुटुंबाची चार एकर शेती आहे. पैकी तीन एकर क्षेत्र कोरडवाहू आहे. कुटुंबातील पांडूरंग व पत्नी सौ. नंदा यांच्याकडे शेतीची जबाबदारी आहे. सध्या नंदा यांनी शेतीत एक पाऊल पुढे टाकत प्रक्रिया उद्योजक म्हणून आपली ओळख तयार केली आहे.

सेंद्रिय शेतीवर भर देत खरिपात हुलगा, मटकी, मूग, तूर यांचे आंतरपीक पद्धतीने तर रब्बीत हरभरा, लसूण आणि ज्वारी पीक घेण्यास सुरवात केली. लसूण आणि हरभऱ्याच्या बांधावर जवस लावले. मिश्र पीक पद्धतीमुळे जमिनीचा पोत सुधारला. पालापाचोळ्यापासून खतही मिळाले. 

बचत गटाच्या माध्यमातून सक्रिय 
नंदाताई शेतीची जबाबदारी सांभाळून अंगणवाडी सेविका म्हणूनही कार्यरत होत्या. सन २०१० मध्ये त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. दरम्यान महिला बचत गटाच्या माध्यमातून काम सुरू होते. चार- पाच वर्षांपूर्वी आत्माअंतर्गत २५ महिलांनी एकत्र येत सेंद्रिय बचत गट सुरू केला. त्यासाठीच्या प्रशिक्षणासाठी  ‘आत्मा’चे तत्कालीन संचालक सुनील बोरकर, अविनाश निर्मल या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. बियाणे, खतांसाठी अनुदान मिळाले. यातून गांडूळखतनिर्मिती प्रकल्प उभे राहिले. काही महिला सेंद्रिय शेती करू लागल्या. काहींनी आठवडे बाजारात भाजीपाला, मसाले, पापड यांची विक्री सुरू केली.बचत गटांच्या माध्यमातून बंगळूरू, जयपूर, म्हैसूर, नागपूर, कोल्हापूर, पुणे, बारामती या ठिकाणी अन्न प्रक्रिया, मार्केटिंग, जैविक शेती, गोवंश संवर्धन, मित्रकीटक विषयातील प्रशिक्षणेही घेतली.

नंदाताईंची सेंद्रिय शेती
नंदाताईंनी घरच्या सेंद्रिय शेतीलाही चालना दिली. सेंद्रिय कर्ब वाढावा यासाठी धेंचा आणि ताग यांची लागवड करून तो जमिनीत गाडण्यास सुरवात केली. गांडूळखतांचे दोन युनिटस आहेत. दोन देशी गाई आहेत. शेण- गोमूत्रापासून जीवामृत तयार केले जाते. आत्माअंतर्गतही जैविक खते उपलब्ध झाली आहेत. सुमारे पाच वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. जैविक वा वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर होतो. 

गावरान तिळाचे उत्पन्न
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये तीळ आणि भुईमुगाची लागवड केली. पावसाने ओढ दिली. तरीही १० पोती शेंगा मिळाल्या. ५० रुपये प्रतिकिलो दराने विक्री करून सहा हजार रुपयांचे उत्पन्न हाती आले. याच भुईमुगात असलेल्या गावरान तिळाचे एकरी दोन पोती उत्पादन मिळाले. त्याची १७० रुपये प्रतिकिलो दराने जागेवरच विक्री केली. त्यातून सुमारे ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आता जमीन तापण्यासाठी मोकळी ठेवली हे. बागायती क्षेत्रात जनावरांसाठी चारा पिके घेता आली. देशी गायींच्या दुधाची ७० रुपये प्रतिलिटर दराने विक्री करण्याचा प्रयत्न असतो.   

डाळींची विक्री, उद्योजकतेला वाव 
पुणे शहरातील साखर संकुल येथे तांदूळ महोत्सवाचे आयोजन जानेवारीत करण्यात आले होते. या निमित्ताने बचत गटाच्या माध्यमातून तूर, मूग, हरभरा, उडीद डाळी विक्रीसाठी उपलब्ध केल्या. संक्रात सण तोंडावर आल्याने बाजरीचे पीठही ठेवले होते. या वेळी डाळीं व बाजरी पिठाला ग्राहकांकडून चांगली मागणी आली. चाळीस रुपये प्रतिकिलो दराने हे पीठ विकले गेले. महोत्सवात अनेक ग्राहक जोडले गेले. त्यातून आत्मविश्वास वाढला. मग खऱ्या अर्थाने पुढील व्यवसाय सुरू झाला. भीमथडी यात्रेत सौ. सुनंदाताई पवार यांनी तीन- चार वर्षे मोफत स्टॉल उपलब्ध करून दिला. त्यातून मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. अधिकाधिक ग्राहक जोडले गेले. तेव्हापासून धान्य महोत्सव, भीमथडी यात्रेसह मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथेही प्रदर्शनात स्टॉल घेण्यात येतो.

ब्रॅण्डद्वारे मॉलमध्ये विक्री
  वाढती मागणी लक्षात घेऊन डाळी, तांदूळ व कडधान्यांची ‘होलसेल’ विक्री
  बालाजी एंटरप्रायझेस नावाने ब्रॅण्ड 
  बारामती, नाशिक, मुंबई, ठाणे, ऐरोली, लातूर, औरंगाबाद येथील मॉल्स, गिरगाव येथील इस्कॉन मंदिराला मालाचा पुरवठा. यातून लाखो रुपयांची उलाढाल
  जिल्ह्यातील बचत गटांकडूनही माल घेण्यात येतो. सेंद्रिय मालाच्या विक्रीवर मुख्य भर
  तूर डाळ ११० ते १२० रुपये, मूग डाळ ११० रुपये, उडीद डाळ १२० रुपये, हरभरा डाळ ११५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री
  साल न काढलेली उडीद आणि मूग डाळ ९० ते ९५ रुपये दराने उपलब्ध
  लोकवन, शरबती गहू, इंद्रायणी तांदळाचीही खरेदी करून विक्री  

डाळ मिल उद्योगही 
  ‘स्टार्ट अप इंडिया’ योजनेतून १३ लाखांचे कर्ज घेऊन डाळ मिलही सुरू केली.
  ग्रेडिंग व पॉलिशिंगची त्यात सुविधा. 
  या उद्योगामुळे नफ्याचे प्रमाण वाढणार आहे. 
  डाळ तयार करताना चांगल्या दर्जाच्या खाद्यतेलाचा वापर.
  पालिशिंग केले जात नसल्याने डाळ हातसडीसारखीच दिसते. चव चांगली. लवकर शिजते.  
  शेतकऱ्यांनाही ग्रेडिंग व पॉलिशिंग करून देण्यात येते. 
  उद्योगातून चार- पाच महिलांना रोजगार.  
  एकूण वार्षिक उलाढाल सुमारे २८ लाख रुपये 

भविष्यातील नियोजन 
  सोलर ड्रायरच्या माध्यमातून भेंडी, कांदा, लसूण, कडीपत्ता आदींची सुकवणी करून मॉलमध्ये विक्री.
  मिलच्या माध्यमातून टाकाऊ पदार्थांचा वापर व्हावा, यासाठी पाचशे गावरान कोंबड्यांची पोल्ट्री. 
  बियाण्यांचे ग्रेडिंग करण्यासाठी यंत्र. 

- नंदा पांडुरंग भुजबळ, ९६५७१४५०३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.