घरीच तयार करा सौरकुकर

घरीच तयार करा सौरकुकर
Updated on

आपल्याकडे सौरऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु आपण अजूनही त्याचा पुरेसा वापर करत नाही. दैनंदिन कामासाठी आपल्याला सौरऊर्जा किफायतशीर ठरू शकते. यामध्ये प्रामुख्याने सौर दिवे, सौरकुकरचा वापर उपयोगी ठरणारा आहे. हाच विचार करून अहमदाबादमधील (गुजरात) सैयद अल जुबैर या युवकाने ग्रामीण भागात सौरऊर्जा प्रसारासाठी मोहीम हाती घेतली आहे. गुजरात राज्यात विविध संस्थाच्या सहकार्याने सैयद अल जुबैर याने सौरकुकर निर्मितीसाठी ५२ कार्यशाळा घेतल्या असून, सुमारे १५०० लोकांपर्यंत सौरकुकर निर्मितीचे तंत्रज्ञान त्याने पोचविले आहे. 

सौरकुकरची निर्मिती 
सैयद अल जुबैर हा थर्मल इंजिनिअरींग या विषयातील पदवीधर. शिक्षणानंतर त्याने महाविद्यालयात शिकवत असताना ग्रामीण भागात सौरऊर्जेचा वापर कशा पद्धतीने करता येईल, याबाबत देखील प्रयत्न सुरू केले. सध्या तो अहमदाबादमधील ‘ग्यान` या स्वयंसेवी संस्थेमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. सैयद अल जुबैर याने बॉक्स पॅकिंगसाठी उपयोगात येणारा कोरूगेटेड कार्ड बोर्ड आणि ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करून सौरकुकर तयार केला आहे. 

याबाबत माहिती देताना तो म्हणाला, की ग्रामीण भागात फिरताना असे दिसून आले की, दररोजच्या स्वयंपाकासाठी इंधनाची समस्या महिलांच्या समोर आहे. सध्या स्वयंपाकासाठी गॅस तसेच आधुनिक सौरकुकर उपलब्ध आहेत. परंतु काहीवेळा त्याची खरेदी करणे आर्थिक अडचणींमुळे काही कुटुंबांना शक्य होत नाही. त्यामुळे मी उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून किफायतशीर सौरकुकर निर्मितीवर लक्ष केंद्रीत केले. यासाठी मला विरेंद्र धाकड या विद्यार्थाची साथ मिळाली. आम्ही गावामध्येच उपलब्ध साहित्याच्या वापर करून सौरकुकर कसा तयार करता येईल यावर संशोधन सुरू केले.  सौर कुकर निर्मितीसाठी आम्ही बॉक्स निर्मितीसाठी वापरण्यात येणारा योग्य जाडीचा कोरूगेटेड कार्ड बोर्ड आणि ॲल्युमिनियम फॉईलचा विचार केला. कारण हे घटक सहज उपलब्ध होतात.

सौर कुकर तयार करताना तळाला म्हणजेच ज्यावर भांडे ठेवले जाणार आहे, त्यासाठी योग्य जाडीचा कोरुगेटेड कार्डबोर्डचा वापर केला. सौरकुकर तयार करण्यासाठी एक फूट बाय एक फूट आकारामानाचे चार कोरुगेटेड कार्डबोर्ड तुकडे आणि त्याच आकाराचे ॲल्युमिनियम फॉईलचे चार तुकडे लागतात.  कोरुगेटेड कार्डबोर्ड तुकड्यावर ॲल्युमिनियम फॉईलचे तुकडे चिटकवले जातात. त्यानंतर चित्रात दाखविल्याप्रमाणे साधारणपणे अर्धगोलाकार बॉक्सचा आकार दिला जातो. कडेचे कोरूगेटेड कार्डबोर्ड हे मध्यभागी योग्य प्रकारे सौर किरणे परावर्तीत करतील, अशा पद्धतीने योग्य कोनात बसविले जातात. वरील बाजू उघडी ठेवली जाते. 

अशारीतीने सौरकुकर तयार झाल्यावर त्यामध्ये टिन किंवा ॲल्युमिनियमचा काळ्या रंगाने रंगविलेला डबा ठेवला जातो. या डब्यात भात, डाळ, केक तयार करता येतो. साधारणपणे एका तासात तांदूळ शिजतात, दोन तासात डाळ तसेच बेकिंग केक तयार होतो. सर्व साहित्य उपलब्ध असेल तर सौरकुकर निर्मितीचा खर्च केवळ साठ रुपये आहे. साधारणपणे चार व्यक्तींच्या कुटुंबासाठी हा सौर कुकर उपयुक्त ठरतो. कोरूगेटेड कार्डबोर्डच्या तुकड्याचा आकार वाढवून मोठा सौरकुकर आपण तयार करू शकतो. ग्रामीण भागातील शाळा तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून कमी खर्चाचा हा सौरकुकर पोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सैयद अल जुबैर - ७९९०७७१४४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.