उन्हाळी भुईमूगाचे लागवड तंत्र

उन्हाळी भुईमुगातून खरीपाच्या तुलनेमध्ये चांगली उत्पादकता मिळते. याकाळात मजुरांची उपलब्धताही चांगली असते.
उन्हाळी भुईमुगातून खरीपाच्या तुलनेमध्ये चांगली उत्पादकता मिळते. याकाळात मजुरांची उपलब्धताही चांगली असते.
Updated on

भुईमूग हे तीनही हंगामामध्ये घेतले जाणारे गळीत धान्य पीक आहे. खरिपामध्ये भुईमुगाखालील क्षेत्र अधिक असले तरी उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता अधिक असते. उन्हाळ्यामध्ये भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने ओलिताची व्यवस्था असल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. 

उन्हाळी हंगामामध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि रोगांचा कमी झालेला प्रादुर्भाव यामुळे चांगली उत्पादकता मिळते.

उत्पादकतेसाठी आवश्यक बाबी 
स्वच्छ सूर्यप्रकाश, ओलिताची व्यवस्था, जमिनीतील ओलीचे योग्य व प्रमाणशीर प्रमाण, कीड रोग व तणांचा कमी प्रादुर्भाव, योग्य तापमान.
पेरणीचा योग्य कालावधी : १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत.

हवामान 

  • पेरणीवेळी रात्रीचे किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे.
  • फुलोरा अवस्थेदरम्यान या पिकाला दिवसाचे तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस. अन्यथा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम.  
  • अति उशिरा पेरणी केल्यास फुलोऱ्याच्या कालावधीत तापमान वाढलेले असते.

जमीन व मशागत 

  • मध्यम प्रकारची, भुसभुशीत, चुना (कॅल्शिअम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य समजली जाते.
  • जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: फक्त १२ -१५ सें.मी. एवढीच राखावी. जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात. पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना अथवा वखराद्वारे काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहतात. परिणामी उत्पादनात घट येते.
  • नांगरणीनंतर उभी-आडवी वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे २ टन प्रतिएकर याप्रमाणे द्यावे.

पेरणीचे अंतर 
दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. आणि झाडातील अंतर १० सें.मी. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बियाणे प्रमाण 

  • जात निहाय तसेच दाण्याच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण ठरते. 
  • कमी आकाराचे दाणे असलेल्या जातींसाठी एकरी ४० किलो, मध्यम आकाराच्या बियाण्यासाठी एकरी ५० किलो , तर टपोऱ्या दाण्याच्या जातीसाठी एकरी ६० किलो बियाणे वापरण्याची शिफारस आहे.

जाती 

  • जाती : प्रामुख्याने पसऱ्या, निमपसऱ्या तसेच उपट्या अशा तीन जाती आहेत
  • एलजीएन -१, एलजीएन -२, एलजीएन -१२३, टीपीजी -४१ एसबी - ११, टीएजी- २४, फुले उन्नती, टीजी-२६, जेएल -२४ जे एल -२२० जेएल-५०१, विद्यापीठ  शिफारशीत केलेले सुधारित वाण निवडावे.
  • वरील शिफारशीप्रमाणे परिसरात उपलब्ध, उत्पादनक्षमता, उन्हाळी हंगामात वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता या बाबींचा विचार करून जातींची निवड करावी.

बीजप्रक्रिया : ( प्रमाण प्रतिकिलो बियाणे)
पेरणीपूर्वी अर्धा तास आधी थायरम ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा मॅंकोझेब ३ ग्रॅम किंवा ट्रायकोड्रर्मा (भुकटी) ४-५ ग्रॅम किंवा ट्रायकोड्रर्मा (द्रवरूप) ३-५ मि.लि.

जिवाणुसंवर्धकाची बीजप्रक्रिया 
रायझोबिअम कल्चर (द्रवरूप) ५ मि.लि. अधिक स्फुरद विरघळविणारे जिवाणू कल्चर (द्रवरूप) ५ मि.लि. अधिक पोटॅश विरघळविणारे 
जिवाणू कल्चर (द्रव) ५ मि.लि.  बुरशीनाशकांच्या  बीजप्रक्रियेनंतर जिवाणूसंवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.

सिंचन व्यवस्थापन 

  • जातीनुसार कालावधी साधारणत: ९० ते ११५ दिवसांचा
  • ओलित व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर फायद्याचा 
  • पेरणीपूर्वी ओलित देऊन जमीन भिजवून घ्यावी. 
  • वाफसा आल्यावर अथवा जमिनीचा वरचा पापुद्रा सुकल्यावर लगेच पेरणी करावी. पेरणीनंतर ४-५ दिवसांनी पाणी द्यावे किंवा उगवण झाल्यानंतर लगेचच ओलित करावे.  
  • पीक फुलोरा अवस्थेत येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा. यादरम्यान जमिनीला भेगा पडू देऊ नयेत.

सिंचन 

  • फुले येण्याच्या अवस्थेपासून (पेरणीपासून २२ -३० दिवस ) ठराविक अंतरानुसार. 
  • आऱ्या सुटण्याची अवस्था (पेरणीपासून ४०- ४५ दिवस), शेंगा पोसण्याची अवस्था (पेरणीपासून ६५-७० दिवस) यावेळी पाण्याची पाळी चुकवू नये.
  • पाण्याच्या पाळ्यांचे प्रमाण जमिनीचा प्रकार, मगदूर, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण, चुनखडीचे प्रमाण यानुसार 
  • एप्रिल-मे महिन्यांत गव्हाचा गव्हांडा व बारीक काड पिकाच्या ओळीमधील जागेत पातळ थरात पसरावे.
  • आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्यक आहे.

खत व्यवस्थापन : (प्रति एकरी) 
पेरणीवेळी 

  • युरिया २५ किलो अधिक सिंगल सुपर फॉस्फेट १२५ किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश ३५ किलो अधिक जिप्सम १५० ते २०० किलो  
  • ४-५ किलो झिंक सल्फेट, बोरॅक्स २ किलो   
  • आऱ्या सुटण्याच्या अवस्थेत- जिप्सम १५० ते २०० किलो. त्यामुळे शेंगा चांगल्या पोसून उत्पादन वाढण्यास मदत होते.

आंतर मशागत 

  • पेरणीपासून साधारणत: १०-१२ दिवसांनी खांडण्या (तुटाळ्या) भरून घ्याव्यात.
  • सुरवातीच्या ६ आठवड्यांपर्यंत २-३ डवरणी तसेच १-२ वेळा खुरपणी   
  • आऱ्या सुटण्याच्या अवस्थेपासून आंतरमशागत (डवरणी) नको.  

तणनाशकांचा वापर (आवश्यकता असेल तर)

  • फवारणी प्रतिलिटर पाणी 
  • पेंडीमिथॅलीन ७ मि.लि.- पेरणीनंतर ४८ तासांच्या आत पीक उगवणीपूर्वी जमिनीत भरपूर ओल असताना. 
  • किंवा गवताचा प्रादुर्भाव  जास्त असेल तर, पेरणीनंतर २० दिवसांनी, जमिनीत मुबलक ओलावा असताना.
  • क्विझॉलोफॉफ ईथाईल २ मि.लि.

कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन 

  • फवारणी प्रति लिटर पाणी

मावा, फूलकिडे, तुडतुडे 

  • प्रादुर्भाव दिसताच ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मि.लि. 
  • १५ दिवसांनंतर, डायमिथोएट १ मि.लि.

पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळी 
क्विनॉलफॉस (२५ ईसी) ०.२४ मि.लि.   

टिक्का रोग नियंत्रण 
गंधक (८०% पाण्यात मिसळणारे) ४ ग्रॅम प्रति लिटर. (२ किलो प्रति ५०० लिटर पाणी.)  किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम. ( १ किलो प्रति हेक्टरी ५०० लिटर पाणी वापरावे.) 

तांबेरा रोग नियंत्रण  
मॅन्कोझेब (७५%) २ ग्रॅम प्रति लिटर. (१ किलो प्रति ५०० लिटर पाणी) प्रति  हेक्टर. 

उत्पादन 
भुईमुगाची सुधारित पद्धतीने पेरणी, योग्य पद्धतीने संतुलित खतांचा वापर, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन व पीक संरक्षण केल्यास भुईमुगाच्या सुधारित वाणांपासून हेक्टरी २० ते २५ (खरीप), तर ३० ते ३५ (उन्हाळी) क्विंटल, अशाप्रकारे चांगले उत्पादन मिळू शकते. 

प्रीतम भुतडा,  ९४२१८२२०६६    
डॉ. जे. ई. जहागीरदार  ७५८८५९८२५४
(वसंतराव  नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.