घारगाव : साततत्याने दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील पिंपळगाव देपा गावाने नवा आदर्श उभा केलाय. शेततळ्यांच्या माध्यमातून किमया करीत हे गाव टोमॅटोचे आगार म्हणून नावारूपास आणले आहे. सद्यःस्थितीत शेतकर्यांनी दोनशे हेक्टरवर टोमॅटोची लागवड केली आहे.
पिंपळगाव देपा गावांतर्गत खंडेरायवाडी, मोधळवाडी आदी वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. सातत्याने येथील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करत असतो. सिंचनाची समस्या मिटावी म्हणून शेततळ्यांची निर्मिती केली. पावसाळ्यात शेतकरी शेततळे भरून ठेवत असतात आणि त्या माध्यमातून दर वर्षी टोमॅटोची लागवड करून चांगल्या पद्धतीने उत्पादन घेतात.
मात्र, या वर्षी शेतकऱ्यांनी दोनशे हेक्टरवरील क्षेत्रात मल्चिंग पेपरचा वापर करून टोमॅटोची लागवड केली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र टोमॅटोचे फड पाहायला मिळत आहेत. पाण्याची कमतरता असतानाही येथील शेतकऱ्यांनी जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर ही किमया साधली आहे.
आजही पिंपळगाव देपा परिसराला मोठ्या पावसाची गरज आहे, कारण शेततळ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा राहिला नाही, तर विहिरी, बोअरवेल, छोटे-मोठे बंधारे कोरडेठाक पडले आहेत. अशा कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांनी टोमॅटोचे प्लॉट अतिशय उत्तमरीत्या फुलविले आहेत.
विशेष म्हणजे, दर वर्षी उन्हाळ्यात या गावाला पिण्याचा पाण्याचा टँकर सुरू असतो. आतापर्यंत गावासह वाड्या-वस्त्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. तरीदेखील शेततळ्यांच्या माध्यमातून टोमॅटो पिकाचे आगार बनविण्यात शेतकर्यांना यश मिळाले आहे.
पिंपळगाव देपा गावासह खंडेरायवाडी, मोधळवाडी या भागातील शेतकरी दर वर्षी टोमॅटोची लागवड करतात. या वर्षी दोनशे हेक्टरच्या वर शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या लागवडी केल्या आहेत. या वर्षी टोमॅटोचे क्षेत्र चांगलेच वाढले आहे.
- संकेत देशमुख, कृषी सहायक, पिंपळगाव देपा
आमच्या भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक हे टोमॅटोचे आहे. त्यावरच सर्व आर्थिक गणित अवलंबून असते. त्यामुळे दर वर्षी येथील शेतकरी हे पीक घेतात. याही वेळी सहा एकर क्षेत्रात मल्चिंग पेपरवर आम्ही टोमॅटोची लागवड केली आहे. या सर्व टोमॅटोला शेततळ्यांच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे.
- नंदू ढेरंगे, टोमॅटो उत्पादक, खंडेरायवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.