राहाता : उत्तर नगर जिल्ह्यात वाचकांना वर्षानुवर्षे दर्जेदार पुस्तके घरपोच पुरविणारे ग्रंथविक्रेते डी. यू. जोशी यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी कोविडला नमविले. काल ते आपल्या पुस्तकांच्या दुनियेत पुन्हा परतले. या संकटकाळात त्यांचे सेवाभावी डॉ. पी. जी. गुंजाळ मदतीला धावून आले. दुसरे मित्र निवृत्त बॅंक अधिकारी पद्माकर कुलकर्णी मुंबईहून राहात्यात आले. तिसरे उद्योजक मित्र मुरलीधर ऋषिपाठक यांनी मदतीचा हात दिला. काल या चौघा मित्रांनी एकत्र येत कोविडवरील विजय साजरा केला.
पुस्तकवाले डी. यू. जोशी मामा’ या नावाने ते वाचकांत परिचित आहेत. ज्येष्ठ नेते माजी मंत्री शंकरराव कोल्हे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, माजी खासदार (कै.) शंकरराव काळे, रयतचे तत्कालीन अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांच्यासह विविध राजकीय नेत्यांची व्यक्तिगत ग्रंथालये जोशी मामांनी दिलेल्या पुस्तकांमुळे समृद्ध झाली. वयोमानानुसार त्यांचे वाचकांपर्यंत जाणे बंद झाले. आता बरेचसे वाचक त्यांच्या दुकानात जाऊन पुस्तके खरेदी करतात. ग्रामीण भागात वाचनसंस्कृती रुजविणाऱ्या जोशी मामांचा नामांकित प्रकाशकांनी गौरवही केला.
पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोविडने गाठले. त्यांचे मित्र डॉ. गुंजाळ यांनी त्यांना रुग्णालयात नेले. डॉ. संतोष दिघोळकर, डॉ. गोकुळ घोगरे व डॉ. स्वाती म्हस्के यांनी उपचार केले. मित्र कुलकर्णी यांनी सेवा केली. कोविडला नमवून जोशी मामा पुस्तकांच्या दुनियेत काल पुन्हा हजर झाले.
मित्रांनी जीवन केले सुकर
पुस्तकविक्रेते डी. यू. जोशी मामा हे ग्रामीण भागात वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी झटतात, हे लक्षात घेऊन त्यांचे उद्योजक मित्र मुरलीधर ऋषिपाठक यांनी आपली बसस्थानकाशेजारील मोक्याची जागा त्यांना दुकानासाठी मोफत दिली. सेवाभावी डॉ. पी. जी. गुंजाळ, निवृत्त बॅंक अधिकारी पद्माकर कुलकर्णी, उद्योजक मुरलीधर ऋषिपाठक आणि प्राचार्य इंद्रभान डांगे या चार मित्रांमुळे जोशी मामांचे जीवन सुकर झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.