अहमदनगर : राज्यात द्राक्ष फळबागेखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी मॉलमध्ये वाइनविक्रीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे, अशी भूमिका राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मांडली.
वळसे पाटील आज (शुक्रवारी) शहराच्या दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शहराध्यक्ष माणिक विधाते, घनश्याम शेलार, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, महिला राज्य उपाध्यक्षा शारदा लगड आदी उपस्थित होते.
देशांतर्गत आणि परदेशांतील बाजारपेठेत राज्यातील द्राक्षांचा खप कमी आहे. त्यामुळे अनेकांनी वायनरी टाकलेल्या आहेत. अशा परिस्थितीत, एखाद्या मॉलमध्ये छोट्याशा जागेत वाइनविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र, किरकोळ किराणा दुकानांत अशी विक्री करता येणार नाही, असे सांगत राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. तसेच, वाइनविक्रीतून राज्याच्या महसुलात वाढ होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
न्यायालयाने १२ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय दिला आहे. त्याबाबत ते म्हणाले, की न्यायपालिका व विधिमंडळ यांना राज्यघटनेने काही सीमारेषा आखून दिल्या आहेत. त्यामुळे विधिमंडळ आणि संसदेत घेतलेल्या निर्णयांविरोधात शक्यतो न्यायालयात जाऊ नये. न्यायालयाने त्याची किती दखल घ्यावी, याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबन रद्द केल्याच्या निर्णयावर विधिमंडळ म्हणून आता काय भूमिका घेतली जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे. मात्र, या निर्णयाची प्रत आल्यानंतर सविस्तरपणे भाष्य करता येईल. सर्वोच्च न्यायालयाने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द केले असले, तरी विधिमंडळाने त्यावेळी घेतलेला निर्णय चुकीचा नाही. तो एका व्यक्तीने घेतलेला निर्णय नव्हता. यापूर्वीदेखील असे प्रसंग घडलेले आहेत. भाजपला काय म्हणावयाचे ते म्हणून द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.
पालकमंत्रिपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील
राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी अहमदनगरचे पालकमंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी अहमदनगरचे पालकमंत्री म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी तुम्ही इच्छुक आहात का, अशी विचारणा केली असता त्यांनी, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगून या विषयावर अधिक बोलण्याचे टाळले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.