शेवगाव : शासनाकडून मिळणारे स्वस्त धान्य लाभार्थ्यांपर्यंत न पोहचल्याने तालुक्यातील गरीबांच्या दिवाळीवर निराशेचे सावट पसरले. दोन महिन्यांपासून तालुक्यातील १२४ स्वस्त धान्य दुकानापर्यंत शासकीय मालाचा पुरवठा न झाल्याने तालुक्यातील लाभार्थ्यांची दिवाळी महागाईच्या सावटाखाली काळी दिवाळी ठरली.
तालुक्यातील गरीबांना स्वस्त दराने धान्य व किराणा मालाचे वितरण करण्यासाठी १२४ स्वस्त धान्य दुकाने आहेत. तालुक्यातील आंत्योदय कार्ड धारकांची संख्या ९७१२ असून त्यावर ४५ हजार १७६ लोकसंख्या अवलंबून आहे. तर प्राधान्य योजनेचे ३२ हजार ४९५ कार्डधारक असून त्यावर १ लाख ४५ हजार ४२९ लोकसंख्या अवलंबून आहे. यंदा महागाईच्या भडक्यामुळे किराणा मालातील तेल, डाळ, साखर, शेंगदाणे यासह अत्यावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. कोरोनाच्या सावटामुळे ग्रामिण भागातील अनेक हातावर पोट असलेल्या सर्व सामान्य मजूर व कामगारांना शासनाच्या विविध योजनेतून मिळणारे धान्य व किराणा संजीवनी ठरत आहे.
मात्र, तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिवाळीच्या पूर्वी ऑक्टोबरमध्ये मिळणारा धान्यादी माल तांत्रिक कारणामुळे मिळाला नाही. तर शहरातील १० व ग्रामिण भागातील २० दुकानांना प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांसाठीचा माल प्राप्त झाला. उर्वरीत ९४ दुकानांना ऐन दिवाळीत माल न मिळाल्याने संबंधीत लाभार्थ्यांना त्याचे वाटप झाले नाही. त्यामुळे शासनाच्या किराणा व धान्याच्या आशेवर नजर लावून बसलेल्या लाभार्थ्यांच्या पदरी निराशा पडली.
गोरगरीब दुकानदारांकडे मालासाठी चकरा मारत होते. मात्र, तालुक्याकडून माल न मिळाल्याने दुकानदारांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. वर्षातील सर्वात मोठ्या असलेल्य दिवाळीच्या सणाला देखील शासनाची या लाभार्थ्याप्रती असलेली उदासिनता दिसून आली. मात्र, त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांची दिवाळी महागाईच्या सावटाखाली काळी दिवाळी ठरली. आता नोव्हेंबर महिन्यात तरी शासनाने मालाच्या पुरवठ्याबाबत असलेली अडचण दुर करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.