Christmas : नगरच्या भूमीत नाताळची परंपरा

अहमदनगर शहर व जिल्ह्यात रविवारी (ता. २५) नाताळ उत्साहाने साजरा होत आहे. ऐतिहासिक नगरमध्ये चर्चलाही मोठी परंपरा आहे.
Christmas Celebration
Christmas CelebrationSakal
Updated on
Summary

अहमदनगर शहर व जिल्ह्यात रविवारी (ता. २५) नाताळ उत्साहाने साजरा होत आहे. ऐतिहासिक नगरमध्ये चर्चलाही मोठी परंपरा आहे.

अहमदनगर - अहमदनगर शहर व जिल्ह्यात रविवारी (ता. २५) नाताळ उत्साहाने साजरा होत आहे. ऐतिहासिक नगरमध्ये चर्चलाही मोठी परंपरा आहे.

ब्रिटिशकालीन अनेक चर्च स्थापन झालेले आहेत. तेथे आजही अत्यंत भक्तिभावाने नाताळ साजरा होतो. शहराबरोबरच संगमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी, जामखेड आदी ठिकाणी मोठे चर्च आहेत. या उत्सवात ख्रिस्ती बांधवांबरोबरच इतर धर्मीयही सहभागी होतात.

नगर शहरात सर्वात जुने चर्च म्हणजे सेंट ॲना चर्च. कॅम्पमधील रोमन कॅथॉलिक सेंट जॉन हे चर्च १८५१ मध्ये बांधले आहे. त्यास ब्रिटिश सरकारने मोफत जागा दिली. तसेच त्या वेळी २२०० रुपयांचे अनुदानही दिले होते. १९५७ मध्ये गॅरिसन चर्च बांधल्याचा उल्लेख आढळतो. एस. पी. जी. मिशनने सेंट झेविअर्स चर्च १८७३ मध्ये स्थापन झाले.

हातमपुरा रोडवरील चर्चही अत्यंत जुने आहे. तसेच परदेशी गल्लीच्या कोपऱ्यावर एक चर्च बांधण्यात आले आहे. चर्च ऑफ दी लॅम्प हे (कै.) शाहूराव मोडक यांनी नगर वाचनालया- शेजारी आपल्या घरातच बांधले. या वास्तू आज इतिहासाच्या साक्ष देत आहेत.

जिल्ह्यातील बहुतेक सर्वच गावांत चर्च आहेत. तेथे येशूचे भजन होतात. प्रत्येक रविवारी प्रार्थना होतात. एकमेकांच्या अडचणींवर चर्चा होते. संबंधित फादर लोकांचे दुःख निवारण्यासाठी प्रार्थना करतात. गरजूंना मदतीसाठी मोठ्या शहरातील ख्रिस्ती बांधव मदत करतात. या काळात सर्वच शाळांना दहा दिवसांच्या सुट्ट्या असतात. त्यामुळे या काळात विद्यार्थीही कुटुंबासोबत आनंद घेतात. नाताळाच्या सुटीचा काळ हा नाताळ व नवीन वर्षाचे स्वागत असा असतो. त्यामुळे २५ डिसेंबर ते १ जानेवारी हा उत्सवाचा काळ असतो.

जिल्ह्यात ब्रिटिश काळापासून या उत्सवांना विशेष चालना मिळाली. इंग्रज अधिकाऱ्यांनी चर्चसाठी मदतीचे धोरण धरले. त्यामुळेच अनेक जुने चर्च सुंदर वास्तुशिल्पाचा नमुना आहे. विशेषतः नगर शहरातील चर्च हे शहराचे ऐतिहासिक ठेवा आहे.

ख्रिसमस ट्री व कॅरोल गीते

दहाव्या शतकात ख्रिसमस-ट्री उभारण्याची परंपरा सुरू झाली. असे मानले जाते, की ख्रिसमस-ट्री स्वर्गातील इडन नावाच्या बागेतील एका झाडाचे आणि क्रुसाच्या झाडाचे एक अनोखे प्रतीक आहे. याचा उल्लेख १६०५ मध्ये झालेला दिसतो. तसेच, कॅरोल म्हणजे नाताळगीतांची सुरवात अकराव्या शतकात झाली. ही प्रथा प्रथम जर्मनीमध्ये सुरू झाली.

सांताक्लॉज

हे पाश्चिमात्य ख्रिश्चन धर्मात आणि संस्कृतीत आढळणारे एक काल्पनिक पात्र आहे. सांताक्लॉजचे नाताळ सणाशी अतूट नाते आहे. नाताळाच्या आदल्या रात्री तो मुलांना भेटवस्तू देतो. त्यामुळे मुलांमध्ये त्याचे विशेष आकर्षण आहे. सध्या या पोषाखाची दुकाने सजली आहेत.

देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. ती, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो, त्या नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. पवित्र शास्त्र सांगते,त्याप्रमाणे येशू ख्रिस्त पापाचे ओझे वाहणारा आहे. नवीन करारामध्ये प्रभूने या भूतलावर जन्म घेतला, असाच संदेश नाताळनिमित्ताने दिला जातो.

- सुहास वाघमारे, लेफ्टनंट

रविवारी जिल्हाभर नाताळनिमित्त विविध प्रार्थना, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात बंधुभाव निर्माण व्हावा, कोरोना दूर व्हावा, सर्वांना चांगले आरोग्य मिळावे, अशी प्रार्थना बहुतेक जण करीत आहेत. नाताळाच्या पूर्वसंध्येला अनेक जण रात्र जागून काढतात.

- दत्तात्रेय गायकवाड, बास्को ग्रामीण केंद्र

नाताळनिमित्त मित्र, कुटुंब एकत्र येतात. आनंदाने सण साजरा करतात. लोक एकमेकांच्या घरी जातात. मुलांना भेटवस्तू देतात. प्रभू येशू ख्रिस्ताने समाजाला प्रेम व माणुसकीची शिकवण दिली. हीच शिकवण विविध उपक्रमांतून दिली जाते. नगर शहर व जिल्ह्यात विविध उपक्रमांनी हा सण साजरा केला जातो.

- माया साळवी, सेवानिवृत्त अध्यापिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.