Ahmednagar City : एक दिवस आपल्या शहरासाठी!

२८ मे १४९० रोजी कोटबाग निजाम हा राजवाडा बांधून नगर शहराची स्थापना झाली. अहमदशहा बिहरी याने सीना नदीकाठी वसाहत स्थापन केली. तेथेच शहर वसण्यास सुरुवात झाली.
Nizam Palace
Nizam Palacesakal
Updated on

- भूषण देशमुख

२८ मे १४९० रोजी कोटबाग निजाम हा राजवाडा बांधून नगर शहराची स्थापना झाली. अहमदशहा बिहरी याने सीना नदीकाठी वसाहत स्थापन केली. तेथेच शहर वसण्यास सुरुवात झाली. या जिल्ह्याला राजकीय इतिहास जुना आहे. या शहराने अनेक लढाया अंगाखांद्यावर झेलल्या. अनेक लढवय्यांना कवेत घेतले.

काळ बदलत गेला, तसा इतिहास मागे पडत गेला, तरीही इतिहासाच्या पाऊलखुणा आजही शाबूत आहेत. अहमदनगरचा भुईकोट किल्ला त्यातील एक साक्षीदार. आताच्या युवा पिढीने हा इतिहास समजावून घ्यायला हवा. आपल्या शहरासाठी एक दिवस द्यायला हवा.

वर्षभरातले अनेक दिवस आपण विविध कारणांसाठी साजरे करतो. ‘१५ आॅगस्ट’ देशाच्या स्वातंत्र्यासाठी, ‘२६ जानेवारी’ लोकशाहीसाठी, ‘१ मे’ महाराष्ट्रासाठी, तसाच ‘२८ मे’ हा दिवस प्रत्येक नगरकरानं आपल्या अहमदनगर शहरासाठी राखून ठेवायला हवा. या शहराला तब्बल पाचशे वर्ष होईपर्यंत त्याचा स्थापन दिन किंवा वाढदिवस कधी साजरा झाल्याची नोंद नाही.

‘सकाळ’चे माजी संपादक एस. के. कुलकर्णी यांनी नगर शहराला पाचशे वर्षे पूर्ण होत असल्याचं १९९० मध्ये सर्वप्रथम लक्षात आणून दिलं. नगरचा ‘पंचशताब्दी महोत्सव’ आणि दर वर्षी २८ मे रोजी स्थापना दिन साजरा करताना कुठलाही राजकीय किंवा धार्मिक हेतू कधीच नव्हता, नसायला हवा.

ज्यांनी हे शहर स्थापन करण्यासाठी, त्याला मोठं करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी हातभार लावला, त्या सर्व जाती, धर्माच्या कर्तबगार व्यक्तींविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, पुढच्या पिढीला आपला गौरवशाली इतिहास, इथल्या मातीत नांदत असलेला सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुतेची जाणीव करून देणं, इतिहासाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देत इथल्या तरूण पिढीसाठी रोजगार आणि व्यापारी उलाढाल वाढण्यासाठी हातभार लावणं या हेतूनं नगरचा स्थापना दिवस साजरा व्हावा, अशी अपेक्षा होती.

काही गोष्टी साध्य झाल्या, काही राहून गेल्या. नगर परिसरातील ऐतिहासिक वास्तू पहायला येणाऱ्यांची संख्या वाढली, या वास्तुंसाठी पुरातत्व विभागाच्या तरतुदीत भर पडली, काही प्रमाणात व्यवसाय आणि आर्थिक उलाढालही वाढली. मात्र, बऱ्याच गोष्टी कागदावरच राहून गेल्या.

या शहराच्या संस्थापकाचं स्मृतिस्थळ असलेल्या सीना नदीकाठच्या निसर्गरम्य बागरोजा’त जाण्यासाठी चांगला रस्ता होण्याची गरज आहे.

नगरचा भुईकोट किल्ला, अष्टकोनी फराहबख्श महाल, डोंगरावरचा सलाबतखान मकबरा पहायला आता देश-विदेशांतील पर्यटक येतात. त्यांच्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध होण्याची गरज आहे. अहमदनगर शहराचा पर्यटन विकास झाला, तर सगळ्यात जास्त फायदा होणार आहे महापालिकेला. तथापि, महापालिका त्यासाठी आपल्या अंदाजपत्रकात कसलीच तरतूद करत नाही. पिंपळगाव माळवी तलावासह नगर शहराचा पर्यटन विकास आराखडा अजून तयार झालेला नाही, यासाठी मनपाने पुढे येण्याची गरज आहे.

ऐतिहासिक वास्तुंच्या साक्षीनं नगरमधल्या सगळ्याच संस्था, संघटनांनी या आठवडाभरात, शक्य नसेल, तर वर्षभरात कधीतरी आपले सभासद आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी उपक्रम आयोजित करायला हवेत. 'नगरचं भलं कसं होईल' या मध्यवर्ती कल्पनेवर वेगवेगळ्या स्पर्धा घेता येतील.

नव्या पिढीची नाळं नगरशी जोडली गेली नाही, तर त्यांच्या मनात या शहराविषयी आपुलकी निर्माण होणार नाही. त्यासाठी नगरकरांनी एकत्र यायला हवं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.