राहुरी : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अखेर तनपुरे साखर कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला. आज मंगळवारी बँकेतर्फे ३५ सुरक्षा रक्षक कारखान्यावर तैनात करण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने यंदाच्या हंगामात गळीत हंगाम चालू करण्यास असमर्थ असल्याचे कळविल्याने, द्विपक्षीय करारानुसार कारवाई केल्याचे जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक तथा प्राधिकृत अधिकारी नंदकुमार पाटील यांनी सांगितले.
डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यास जिल्हा बँकेचा वित्तपुरवठा आहे. २०१३ साली कारखान्यावर ६० कोटींच्या कर्जाची थकबाकी होती. तेव्हा, बँकेने कारखान्याची चल-अचल मालमत्ता जप्त केली होती. २०१६ साली कारखान्याची निवडणूक प्रक्रिया झाली. त्यात, डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ विजयी झाले. बँकेचे संचालक तत्कालीन आमदार शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले.
२०१७ साली ९० कोटी कर्जाचे पुनर्गठन होऊन, अकरा वर्षांसाठी मुद्दल, व्याजाचे हप्ते पाडून देण्यात आले. बँक व कारखाना व्यवस्थापनामध्ये द्विपक्षीय करार होऊन, बँकेने जप्त केलेली मालमत्ता संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आली. सलग तीन वर्षे बंद पडलेला कारखाना २०१७-१८ पासून सुरू झाला. २०१९-२० मध्ये ऊस टंचाईमुळे कारखाना बंद राहिला. मागील वर्षी ४ लाख ८५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले.
कारखाना व्यवस्थापनाने चार वर्षे उसाचे गाळप करून ४८ कोटी रुपये बँकेला कर्जापोटी अदा केले. परंतु, सर्व रक्कम व्याजात जमा झाली. कर्ज पुनर्गठण करताना ९० कोटींची मुद्दल कायम राहिली. त्यावर ऑक्टोबर २०२२ अखेर २१ कोटींच्या व्याजासह १११ कोटी कर्जाची थकबाकी झाली आहे. बँकेने कर्जफेडीसाठी ५०० ऐवजी १०० रुपये प्रतिक्विंटल साखरेवरील टॅगिंग करावे, असा कारखाना व्यवस्थापनाचा आग्रह होता. परंतु, त्यास बँकेने नकारघंटा वाजविली. त्यामुळे, यंदाच्या वर्षी कारखान्याचा गळीत हंगाम चालविण्यास व्यवस्थापनाने असमर्थता दाखविली.
कारखान्याच्या संचालक मंडळाने बँकेला मालमत्ता ताब्यात देण्याच्या सुपूर्दनाम्याची गरज नाही. गाळप हंगाम चालू करण्यास असमर्थता दर्शविल्याने, द्विपक्षीय कराराचा भंग झाला आहे. करारातील अटी, शर्तीनुसार बँकेतर्फे कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची प्रक्रिया केली आहे.
- नंदकुमार पाटील, सरव्यवस्थापक तथा प्राधिकृत अधिकारी, एडीसीसी बँक, अहमदनगर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.