शिर्डी - साईबाबांनी आयुष्यभर रंजल्यागांजल्यांची सेवा केली. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने साईंच्या शिर्डीत दोन हजार खाटांचे एम्स रुग्णालय उभारावे, अशी मागणी आपण पंतप्रधानांच्या शिर्डी भेटीत करणार आहोत. तसेच जिल्ह्याचे मुख्यालय कुठेही करा. मात्र, नगर जिल्ह्याचे लवकरात लवकर विभाजन करा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, बाजीराव दराडे, बाळासाहेब पवार, विजय काळे, राजेंद्र देवकर, विठ्ठल घोरपडे, सागर बोठे, रावसाहेब थोरात आणि मीनाश्री वाकचौरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.लोखंडे म्हणाले की, पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवून गोदावरी खोऱ्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा. साईबाबांच्या शिर्डीजवळ मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध आहे. औद्योगिक वसाहतीस मंजुरी मिळाली आहे. मोठे उद्योजक साईबाबांचे भक्त आहे.
त्यांना आवाहन करून येथे आयटी पार्क उभारण्यात यावा. खास बाब म्हणून शिर्डीसाठी स्मार्ट सिटी योजना वेगाने राबवावी, अशा विविध मागण्या आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार आहोत. निळवंडे धरण ५२ वर्षे रखडले. दुष्काळी टापूतील तरुणांच्या निळवंडे कृती समितीला सोबत घेऊन आपण या प्रकल्पाचा पाठपुरावा केला.
सर्वांच्या सहकार्याने हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे, कै. शंकरराव काळे, कै. सूर्यभान वहाडणे आदींनी त्यांच्या काळात प्रयत्न केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या सर्वांचेच सहकार्य लाभले. त्यामुळे आता या धरणाचे पाणी शेतात येण्याचा मार्ग मोकळा होत आला आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक तालुक्यात शिवसेना पदाधिकऱ्यांनी बैठका घेऊन मेळाव्यास जाण्याचे नियोजन पूर्ण केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.