नेवासे फाटा : नेवासे तालुक्यात अनेक खासगी आडतदार व व्यापाऱ्यांकडून सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेतमालाच्या खरेदीमध्ये फसवणूक करून मोठी आर्थिक पिळवणूक केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून संबंधित आडतदार व व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
नेवासे तालुक्यात सध्या शेतकऱ्यांची मका, सोयाबीन, बाजरीची पिके निघू लागली आहेत. सर्वसामान्य शेतकरी पिके विकून दोन पैसा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु तालुक्यातील काही आडतदार व व्यापारी या शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक शेतकरी सॅम्पल दाखवून भाव ठरवतात. मात्र, प्रत्यक्षात वाहनांमध्ये माल घेऊन गेल्यानंतर सदर व्यापारी वेगवेगळी कारणे देऊन ठरलेल्या भावापेक्षा कमी भावात माल घेतात. वाहनभाडे व इतर कारणांमुळे शेतमाल परत घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने तो माल संबंधित व्यापाऱ्यालाच द्यावा लागतो. नेमका याचाच फायदा व्यापाऱ्यांकडून उचलला जातो. अनेक व्यापारी नोंदणी पावती किंवा पक्के बिल देत नाहीत.
तालुक्यात अनेक ठिकाणी विनापरवाना खरेदी केली जाते. जे परवानाधारक आहेत त्यांच्याकडूनही शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात आहे. कपात करण्याची कोणतीही तरतूद नसतानाही अनेक व्यापारी शेतकऱ्यांचे एका क्विंटलमागे दोन किलो सर्रास कपात करत आहेत. काही व्यापारी काटा मारून वजनातही शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, असा आरोप केला जात आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांची फसवणूक, व्यापाऱ्यांचा मुजोरपणा या संदर्भात प्रहार संघटनेने आंदोलन केले होते. या आंदोलनाला यशही आले होते. शेतकऱ्यांनी देखील जागरूक राहणे गरजेचे आहे. संपूर्ण चौकशी करून, भाव ठरवूनच शेतकऱ्यांनी आपला कष्टाने पिकविलेला माल व्यापाऱ्यांना द्यावा.
-अनिल विधाटे, प्रहार संघटना, कार्याध्यक्ष, नेवासे
शेतकऱ्यांच्या मालामध्ये क्विंटल मागे कपात करण्याची कुठलीही तरतूद नाही. कोणत्याही व्यापाऱ्याने कपात केल्यास किंवा इतर बेकायदेशीर कृत्य केल्यास शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार करावी. योग्य ती कारवाई केली जाईल.
- देवदत्त पालवे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.