अहमदनगर - आष्टीहून नगरकडे येत असलेल्या रेल्वेगाडीला आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. आठ डबे असलेल्या या रेल्वेत अवघे दहा ते बारा प्रवासी होते. ते रेल्वेतून सुखरूप बाहेर पडले. नगर-सोलापूर महामार्गावर वाळुंज शिवारात हा बर्निंग ट्रेनचा थरार घडला.
सकाळी ११ वाजता आष्टीहून नगरकडे येण्यासाठी रेल्वे निघाली. वेग कमी असल्याने दुपारी तीनच्या सुमारात नगर- सोलापूर महामार्गावरील वाळुंज शिवारात पोहोचली. या ठिकाणी महामार्गावर रेल्वेगेट आहे. हे गेट बंद केल्यानंतरच रेल्वे पुढे जाते. मात्र, गेट बंद करण्यासाठी रेल्वेचा एकही कर्मचारी या ठिकाणी नाही.त्यामुळे रेल्वेचा चालक रेल्वे थांबून गेट बंद केले. त्यानंतर रेल्वे पुढे घेण्यासाठी चालक पुन्हा रेल्वेत बसला. याच वेळी रेल्वेच्या इंजिनरूममधून धूर निघत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर काही वेळातच मागील डबे पेटले. पाच डब्यापर्यंत ही आग पसरली.
जवळच पुलाचे बांधकाम सुरू होते. तेथील कामगार आणि आजूबाजूचे लोक आग विझविण्यासाठी धावले. घटनेची माहिती मिळताच महापालिका, एमआयडीसी, एमआयआरसी आणि व्हीआरडीईच्या अग्निशामक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. तोपर्यंत रेल्वेचे आठपैकी पाच डबे जळून खाक झाले होते. दरम्यान, रेल्वेत प्रवासी नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
आष्टी-नगर रेल्वे बंदचा निर्णय
अहमदनगर-न्यू आष्टी -अहमदनगर ही गाडी रॅक उपलब्ध नसल्याने मंगळवार (ता. १७) पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाने ठरविले आहेत. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे पत्रक रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीस दिले आहे. त्यामुळे आगीच्या घटनेमुळे या रेल्वेची फेरी तूर्त स्थगीत होणार आहे.
प्रथम ब्रिटिशांकडून पाहणी
१९२७ - नगर -बीड- परळी रेल्वे मार्गासाठी ब्रिटिशांकडून पाहणी
१९७२ - रेल्वे सुरू करण्याबाबत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची बीडमधील सभेत घोषणा
१९८० - तत्कालीन खासदार केशरकाकू क्षीरसागर यांंचा पंतप्रधानांकडे पाठपुरावा
२३ सप्टेंबर २०२२ - बीड-परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर-आष्टी रेल्वे सेवा सुरू.
नगर-आष्टी रेल्वे मार्ग - ६६ किलोमीटर.
आष्टी ते परळी १९५ किलोमीटरचे अंतराचे काम बाकी.
कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी, नारायणडोह या स्थानकावर गाडीला थांबा
कर्मचाऱ्यांची जीवाची बाजी
रेल्वेला आग लागल्याची माहिती कळताच महापालिकेसह अन्य अग्निशामकच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी जीवाजी बाजी लावली. पेटत्या रेल्वेत चढून त्यांनी आग विझवली. त्यात एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला.
नगर-आष्टी दरम्यान रेल्वे सुरू झाली खरी; रुळाच्या बाजूने नीट रस्ता नाही. त्यामुळे आगीसारख्या प्रसंगी अग्निबंब पोहोचण्यास अडचण होते. हीच घटना थोडे पुढे गेल्यानंतर घडली असती, तर मोठे नुकसान झाले असते. कारण रेल्वे रुळाच्या बाजूने चांगला रस्ता आवश्यक असतो. त्याबाबत रेल्वे प्रशासनाची दिरंगाई दिसून येते.
- संदेश कार्ले, माजी सदस्य, जिल्हा परिषद.
या गाडीत दहा-बारा प्रवासी होते. आगीनंतर ते उडी मारून बाहेर पडले. गाडी उशिरा का सुटली? आग कशी लागली? हा मोठा प्रश्न आहे. त्यात काही घातपात करण्याचा उद्देश होता का? याबाबत सखोल चौकशी करावी. रेल्वेचे महाप्रबंधक, सोलापूर विभागीय रेल्वे प्रबंधक आणि रेल्वे मंत्र्यांना मेल केला आहे.
- हरजितसिंह वधवा,
अध्यक्ष, अहमदनगर- पुणे इंटरसिटी रेल्वे कृती समिती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.