अहमदनगर: शहराचे वैभव ठरणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे, मात्र ते सुरू असताना पुलाखालून वाहतूकही सुरू आहे. पुलावर काम सुरू असताना जड वस्तू पडून धोका होऊ शकतो. नुकताच मॅनलिफ्ट घसरल्याने एक कामगार जखमी झाला. हा धोका प्रवाशांच्या बाबतीतही होऊ शकतो. त्यामुळे उड्डाणपुलाच्या प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे. काम करणाऱ्या एजन्सीचे दुर्लक्ष असल्याने अपघाताला निमंत्रण मिळू शकते. याबाबत आमदार संग्राम जगताप यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
नगर शहरात स्टेट बँक चौक ते सक्कर चौकापर्यंत पुलाचे काम सध्या सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कामाची नगरकरांना प्रतीक्षा होती. दोन जागांच्या हस्तांतराचा प्रश्न प्रलंबित होता, तो दूर करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना यश आले. अडथळ्यांची शर्यत जिंकत हे काम सुरू झाले. स्टेशन रस्ता अतिवर्दळीचा आहे. या रस्त्यालगत स्वस्तिक चौक बसस्थानक, माळीवाडा बसस्थानक, अहमदनगर कॉलेज, स्टेट बँक, एलआयसी कार्यालय, बाजार समिती आहे. त्यामुळे या रस्त्यावर शेतकरी, विद्यार्थी, प्रवाशांची कायम वर्दळ असते. शिवाय रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना हाच मार्ग आहे. बसस्थानकामुळे बसची ये-जा सुरू असते. पुणे बसस्थानकासमोर खासगी वाहनचालकांची रेलचेल असते. शिवाय, रस्त्यावर कायम वाहतुकीची कोंडी असते. याशिवाय लहान व्यवसाय करणारे टपरीधारक बाजूने असतात. या सर्व बाबींमुळे कायम वर्दळ असते.
पुलाचे काम सुरू झाल्यानंतर तेथे मोठ्या मशिनरी दाखल झाल्या. हे नगरकरांना नवीन होते. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर भव्य उभारलेले पिलर लक्ष वेधून घेत होते. ते काम सुरू असताना प्रवाशांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. काम सुरू असताना काही भागातील पाण्याच्या पाइपलाइन फुटल्याने त्या दुरुस्त करण्यास उशीर झाल्याने पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागला. त्यासाठी नागरिकांनी आंदोलने केली.
संबंधित काम करणाऱ्या एजन्सीचे पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे साइटवर लहान-मोठे अपघात घडत आहेत. संबंधित एजन्सीच्या कार्यालयाजवळच पंधरा दिवसांपूर्वी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मार्केट यार्डजवळही अपघातात एका युवकाला जीव गमवावा लागला. या एजन्सीला केवळ रात्रीच काम करण्याची परवानगी आहे. काम सुरू असताना चारचाकी, तसेच मोठी वाहने येतातच कशी? ती इतर मार्गाने वळविण्याची जबाबदारी संबंधित कामाच्या व्यवस्थापनाची आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. बायपासने वाहने वळविण्याच्या मागणीसाठी मी दोनदा आंदोलने केली. तेव्हा कुठे ट्रकसारखी जड वाहतूक बायपासने वळविली गेली. असे असले, तरीही दुर्लक्षामुळे अशी वाहने पुलाखालून येतात. अनेक ठिकाणी रिफ्लेक्टरही नसतात. मोठ्या अपघाताची भीती आहे.
- संग्राम जगताप, आमदार
‘मॅनलिफ्ट’चे मशिन ऑपरेटरचे लक्ष नसताना सुरू झाले. व्यवस्थित ऑपरेट होत नसल्याने त्याला जेसीबीच्या साह्याने सुरू करण्यात आले. ते घसरल्याने एक कामगार किरकोळ जखमी झाला आहे. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली.
धोकादायक काम, तरीही वाहतूक
पुलावर धोकादायक कामे सुरू असतानाही खाली व बाजूला वाहतूक सुरू असते. त्यामुळे अनेकदा प्रवाशांना भीती वाटते. काही ठिकाणी कामाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर बसविले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारकांचे अपघात होतात. पुलाचे काम करणाऱ्या प्रशासनाने अशा कामाच्या वेळी पोलिसांच्या मदतीने संबंधित वाहतूक इतरत्र वळविण्याची गरज आहे. काही दिवस वाहतूक बायपासने वळविण्यात आली. नंतर मात्र या कामाकडे संबंधित एजन्सीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.