अहमदनगर: महापालिकेच्या रुग्णालयातील रक्तपेढीतून रक्तपिशव्या मोफत

स्थायी समितीच्या सभेत निर्णय पदाधिकाऱ्यांच्या निधीत वाढ ठेकेदारांची बिले वेळेत मिळणार
महापालिकेच्या स्थायी समितीची अर्थसंकल्पी सभा आज
महापालिकेच्या स्थायी समितीची अर्थसंकल्पी सभा आज sakal
Updated on

अहमदनगर: महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील रक्तपेढीतून रक्तपिशव्या नगर शहरातील नागरिक असलेल्या रुग्णांना मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय सभेत घेण्यात आला. पिशवी नेताना एका नातेवाइकाने रक्तदान करणे आवश्यक असल्याची अट मात्र त्यामध्ये घालण्यात आली. अन्यथा शंभर रुपये दर आकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेच्या स्थायी समितीची अर्थसंकल्पी सभा आज झाली. या वेळी वाकळे यांनी, महापालिकेला उत्पन्नवाढीसाठी करावयाच्या विविध उपाययोजनांबाबत आदेश दिले, तसेच थकलेल्या करांच्या वसुलीसाठी प्राधान्य देण्याचे आदेश देण्यात आले. सभेत नगरसेवक गणेश कवडे, मुदस्सर शेख, गणेश कवडे, रवींद्र बारस्कर, विनीत पाऊलबुद्धे, गौरी ननवरे, तसेच स्थायीच्या सदस्यांनी विविध प्रश्न मांडले. त्याला आयुक्त शंकर गोरे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त यशवंत डांगे, अभियंता सुरेश इथापे, तसेच विविध विभागांच्या खातेप्रमुखांनी उत्तरे दिली.

यापूर्वी महापालिकेच्या रक्तपेढीत ५०० रुपयांना रक्तपिशवी मिळत असे. तसेच रक्तदाता असेल तर ३५० रुपये आकारले जात होते. आता शहरातील नागरिकांसाठी, म्हणजे महापालिका हद्दीतील रुग्णांना मोफत रक्तपिशवी मिळणार आहे. ग्रामीण भागातून आलेल्यांना मात्र प्रचलित दरानुसार रक्तपिशवी मिळणार आहे. रक्तपिशवी मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असते, तसेच आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे रक्तपिशवी खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागते. यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे.

मोबाईल मनोऱ्याचे भाडे ठरवा

शहरातील मोबाईल मनोऱ्यांचे भाडे थकलेले असते. अनेकदा एकाच मनोऱ्यावर अनेक कंपन्यांचे अँटेना लावले जातात. त्यामुळे महापालिकेचा कर बुडतो. त्यावर सभेत चर्चा झाली. मनोरा उभारताना रजिस्टर्ड भाडे करार आवश्यक असून, त्यानुसार महापालिकेला उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने कर वाढविण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या.

पुतळ्यांसाठी मोठी तरतूद

शहरातील सर्व पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याच्या बाजूला अनेकदा अस्वच्छता असते. पुतळ्याला रंगरंगोटी करणे, नवीन पुतळे व पुतळ्यांच्या देखभालीसाठी अडीच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे आदेश या वेळी सभापती वाकळे यांनी दिले. केडगाव येथील पुतळ्यांसाठी निधीची तरतूद करावी, असेही या वेळी सांगण्यात आले.

शॉपिंग कॉम्प्लेक्सबाबत अधिकारी निरुत्तर

सावेडी येथील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गाळेधारकांच्या करारांचे नूतनीकरण करण्याचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत सभेत जोरदार चर्चा झाली. अधिकाऱ्यांना नेमके त्याचे भाडे किती येते, याबाबत सांगता आले नाही. नंतर मात्र तब्बल ३५ लाखांची थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. सभापती वाकळे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत, संबंधित गाळेधारकांना तातडीने नोटिसा देण्याचे आदेश दिले.

सभेत राष्ट्रगीताचा पायंडा

महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या सभेला सुरवात होण्यापूर्वी सभापती कुमार वाकळे यांनी सर्व अधिकाऱ्यांना राष्ट्रगीताने सभा सुरू करण्याचे आदेश दिले. आपला देश विविध जातिधर्मांनी व संस्कृतीने नटलेला देश आहे. आपल्या देशाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हावी, राष्ट्रगीतामुळे प्रत्येकाला आपल्या देशाबद्दल अभिमान वाटतो. यापुढील काळात स्थायी समितीची सभा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत होईल, असे वाकळे यांनी सूचित केले.

पदाधिकाऱ्यांचा निधी वाढविला

पदाधिकाऱ्यांना विकासकामे करताना निधी कमी पडतो, याबाबत सभेत चर्चा झाली. त्यानुसार महापौरांचा निधी दोन कोटींऐवजी अडीच कोटी करण्याचे ठरले. उपमहापौरांचा निधीही ५० लाखांहून दीड कोटी, सभापतींचा निधी ५० लाखांहून एक कोटी करण्याचे आदेश सभापती वाकळे यांनी दिले. नगरसेवकांना दहा लाखांचा निधी खर्च करता येणार आहे.

दहापैकी सात लाख रोख

नगरसेवकांनी दहा लाखांच्या बिलांपैकी सात लाखांची बिले रोख देण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. त्यामुळे ठेकेदारांची बिले आता रखडणार नाहीत. कामे होतील तशी बिले तातडीने अदा करावीत, असे या वेळी सांगण्यात आले. त्यामुळे लहान कामांच्या ठेकेदारांची बिले अडकून पडणार नाहीत.

फायर ऑडिट दरवाढीच्या रडारवर

मोठ्या इमारती, कमर्शिअल इमारती, हॉस्पिटल, हॉटेल यांच्या फायर ऑडिटसाठी दर वर्षी केवळ ५०० रुपये फी आकारली जाते. त्यात तातडीने वाढ करून महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या सूचना सभापती कुमार वाकळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हॉस्पिटल, हॉटेल, कमर्शिअल इमारतींमध्ये फायर ऑडिट दर वर्षी करणे आवश्यक असते. अग्निशामक दलाकडून तपासणी करून प्रमाणपत्र देते. त्यासाठी केवळ ५०० रुपये आकारले जातात. रक्कम वाढविण्याची मागणी नगरसेवक विनित पाऊलबुधे यांनी केली. त्यावर कार्यवाहीच्या सूचना वाकळेंनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.