अहमदनगर : ‘ताबा मारणे’ हे गुन्हेगारीचे नवे स्वरूप शहरात निर्माण झाले आहे. त्यातून गँगवॉरसारखे प्रकार घडून खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच सावकारी, जुगार आणि अमली पदार्थांच्या देवाणघेवाणीतून गुन्हेगारी फोफावत चालल्याचे चित्र सध्या नगर शहरात पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीचा पदाधिकारी अंकुश चत्तर याच्या खून प्रकरणाला ताबा मारण्याचीच किनार असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. त्याचबरोबर, काही दिवसांपूर्वी ओंकार भागानगरे या तरुणाचा खूनदेखील अवैध गुटखा प्रकरणातून झाला असल्याचे समोर आले आहे. ताबा मारणे, गुटखाविक्री, गांजाची तस्करी, सावकारी, जुगार, गावठी पिस्तुलांची खरेदी-विक्री असे अनेक गुन्हे शहरात राजरोसपणे घडत आहेत.
त्यात ताबा मारणे हे गुन्हेगारीचे नवे स्वरूप पुढे आले आहे. नगर शहर विस्तारत आहे. त्याप्रमाणेच येथील गुन्हेगारीदेखील वाढत चालली आहे. मुंबई-पुणे शहराप्रमाणे येथील जागेचे मोलदेखील वाढले आहे. मोठमोठे मॉल, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, अपार्टमेंट उभे राहत आहेत. फुटभर जागेसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत.
त्यातूनच ‘ताबा मारणे’ हे गुन्हेगारीचे नवे स्वरूप पुढे येत आहे. रिकाम्या भूखंडावर एका रात्रीतून पत्र्याचे शेड उभे करून संबंधित जागेवर दुसराच कुणीतरी आपला मालकी हक्क दाखवत आहे. खोटी कागदपत्रे, दमदाटी, हाणामारी, वेळप्रसंगी खून करून जागा बळकावण्याचे काही प्रकार मागील काही महिन्यांमध्ये समोर आले आहेत. या गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे नवे आव्हान सध्या पोलिसांसमोर निर्माण झालेले आहे.
गुटखा-सुगंधी तंबाखूचे रॅकेट
गुटखा आणि सुगंधी तंबाखूची विक्री करणारे मोठे रॅकेट शहरात आहे. त्यातूनच ओंकार भागानगरे या तरुणाचा खून झाला. मोठ्या आठ ते दहा विक्रेत्यांकडे परराज्यांतून हा गुटखा येतो. आपल्या एजंटांमार्फत ते हा गुटखा शहर, तालुका आणि गावपातळीवर पोचवतात. पोलिसांनी आतापर्यंत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करून आरोपींना अटक केली. मात्र, मोठ्या विक्रेत्यांपर्यंत पोलिस का पोचत नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
विनापरवाना ‘सावकारी’
विनापरवाना सावकारी करून अवाच्या सव्वा व्याज उकळण्याचे काही गुन्हे उघड झाले आहेत. व्याजाच्या रकमेसाठी बाजारपेठेतील एका व्यावसायिकाला शिवीगाळ व मारहाण करून त्याच्या दुकानाला कुलूप लावण्याचा प्रकार नुकताच घडला. कोतवाली पोलिसांनी संबंधित सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, विनापरवाना सावकारीतून अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत. काहींनी आत्महत्या केल्याचीदेखील अनेक उदाहरणे आहेत.
राजकीय वरदहस्त
शहरातील ‘ताबा’ गुन्हेगारीला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप शिवसेनेचे विक्रम राठोड यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीदेखील राजकीय वरदहस्तामुळेच शहरात जागा बळकाविण्याचे प्रकार घडत असल्याचे त्यांच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. काही सामाजिक संघटनादेखील हाच आरोप करत आहेत.
राजकीय ईर्ष्या, संपत्तीचा हव्यास, खोटी प्रतिष्ठा, व्यावसायिक स्पर्धा आदी विविध कारणे म्हणजे गुन्हेगारीचे उगमस्थान. फौजदारी गुन्ह्यांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या वयात ‘जोश जास्त आणि होश कमी’ अशी स्थिती असते. परिपक्वता आलेली नसते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, याकडे लक्ष द्यावे.
ॲड. सतीश पाटील, जिल्हा सरकारी वकील, अहमदनगर
काय वाटते नगरकरांना?
शहरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक आहे. तरुणांना या गुन्हेगारीत ओढले जात आहे. पोलिस प्रशासनाने कठोर पाऊल उचलून गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस ॲक्शन प्लॅन तयार करणे गरजेचे आहे. राजकीय पुढाऱ्यांनीदेखील त्यांच्या कार्यकर्त्यांना आवर घालणे गरजेचे आहे. तसे झाले तरच नगरकर लोकप्रतिनिधींचे स्वागत करतील.
प्रमोद मोहळे, उद्योजक
वारंवार गुन्हे घडतात हे पोलिसांचे अपयश आहे. घरफोड्या, हाणामारीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. पोलिसांनी शहरात पेट्रोलिंग वाढवून गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना धडा शिकवला पाहिजे. एकच गुन्हा पुन्हा घडणार नाही यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
अनंत लोखंडे, अध्यक्ष, मनपा कर्मचारी संघटना
शहरातील अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे. विशेषतः बाजारपेठा अतिक्रमणमुक्त व्हाव्यात. याप्रश्नी तंटे वाढतात. काहींची मजल व्यापाऱ्यांवर खुनी हल्ले करण्यापर्यंत जाते. कापड बाजारात हातगाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांना वेगळी जागा द्यायला हवी. बाजारपेठेचा श्वास मोकळा करण्याची गरज आहे. ग्राहकांना निर्भीडपणे खरेदीचा आनंद लुटता यावा, यासाठी प्रयत्न व्हावा.
ईश्वर बोरा, अध्यक्ष, अहमदनगर व्यापारी महासंघ
गुन्हे हे वेगवेगळ्या हेतूने घडत असतात. आर्थिक गुन्हे हे कमी श्रमात जास्त पैसे मिळविण्याच्या हेतूने होत असतात. मारामारी, खुनी हल्ला, खून हे इर्षापोटी होतात. या गुन्ह्यांमध्ये पीडित आणि आरोपी अशा दोन्ही बाजुच्या कुटुंबाची धुळधाण होते. दोन्ही बाजुच्या व्यक्तींने सामंजस्य दाखविल्यास गुन्हे शंभर टक्के गुन्हे टाळता येऊ शकतात. समाजामध्ये हा संदेश देण्यासाठी ‘लोक न्यायालय’ हा लघुपट आपण तयार केला होता. युट्यूबवर ‘ॲड. सुद्रिक’ टाकल्यास हा लघुपट पाहता येईल.
ॲड. सतीशचंद्र सुद्रिक, ज्येष्ठ विधीज्ञ, अहमदनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.