राशीन : राशीनसह(rashin) परिसरातील काही लोकांच्या डोक्यात अंधश्रद्धेचे(Superstition) भूत चांगलेच घुसले आहे. राशीनच्या मुख्य बाजारपेठेतील जनरल स्टोअर्समधून उतारा आणि जादूटोण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री होते. महिन्याकाठी तब्बल सव्वा लाख रुपयांच्या घरात हा आकडा आहे. यामध्ये स्वत:ला देवऋषी म्हणवून घेणाऱ्या मंडळींनी अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा(Law) धाब्यावर बसवून आपले उखळ चांगलेच पांढरे केले आहे.
काळी बाहुली, गळ्यातील ताईत, पंचरंगी दोरा, टाचण्या, बिब्बा, काळे राळे, उडीद, दातवण, भोजपत्र, सुया, दाभण, चमड्याची चप्पल, घोड्याच्या पायाचे नाल, चांभारी खिळे, प्लॅस्टिकचे लिंबू-मिरची, विविध जातींचे ऊद आदी साहित्याला राशीनमध्ये रोज मोठी मागणी आहे. एका दुकानात महिन्याला किमान चाळीस हजारांची उलाढाल या वस्तूंच्या विक्रीतून होत आहे. जादूटोणा आणि गंडादोऱ्याचे साहित्य विकणाऱ्या केवळ तीन दुकानांतील उलाढाल सव्वा लाखाच्या आसपास आहे. यामध्ये देवऋषी म्हणणाऱ्या भोंदूबाबांची दक्षिणा किमान पाचशे ते हजार रुपयांच्या घरात आहे. समोरच्याचा अंदाज घेऊन ही दक्षिणा काही हजारांच्या घरात नेली जाते. हा उद्योग अनेक दिवसांपासून राशीनमध्ये राजरोसपणे सुरू आहे.
असे आहे साहित्य
जादूटोण्याच्या या साहित्यामध्ये महिन्याला २१० डझन काळ्या बाहुल्या, सहा हजार ताईत, पंधरा किलो पंचरंगी दोरा, तीन हजारांच्या टाचण्या, २५ एमएमची ६० डझन छोटी कुलपे, १५ किलो बिब्बा, १५ किलो काळे राळे व उडीद, तीन हजार भोजपत्रे, तीन हजारांच्या सुया-दाभण, चमड्याच्या बारीक तीन हजार चपला आणि काही हजारांत विकला जाणारा महागडा ऊद यांचा या साहित्यात समावेश आहे.
असा असतो प्रकार
भानामती, करणी करणे, भूतबाधा दूर करणे, उतारा करणे, गायीचे दूध उडविणे यांसह विविध गोष्टींसाठी देवऋषांकडून वरील वस्तूंना मोठी मागणी असते. ईर्ष्या, दुश्मनी, स्पर्धा, अनारोग्य, चैनीच्या गोष्टींसाठी, तसेच विकृती आणि अज्ञान, दारिद्र्यामुळे माणसे आजही अंधश्रद्धेच्या विळख्यात पूर्णत: अडकली आहेत. या माध्यमातून लोकांना भीती घालून, बरे करण्याचा दावा करून संबंधितांकडून फसविले जाते.
अंधश्रद्धेबाबत २०१३ मध्ये कायदा करण्यात आला आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. केवळ भोंदू, बुवाबाजी करणारेच यात दोषी नाहीत, तर त्यांच्याकडे जाणारा समाजघटकही दोषी आहे.
- रंजना गवांदे, राज्य सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा आणि लोकांना ठकवून भोंदूगिरी करून लुटण्याचा प्रकार समोर आल्यास अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा प्रकार आमच्या निदर्शनास आला, तर कोणाचीही गय केली जाणार नाही.
- दिनकर मुंडे, सहायक पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.