अहमदनगर : महावितरणच्या सावळ्या गोंधळात ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी महावितरणच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यात सुधारणा होण्याऐवजी आणखी वाढ झाली आहे. सध्या अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात रिडिंग न घेताच ॲव्हरेज बिले दिली जात आहेत. त्यामुळे अव्वाच्या सव्वा येणाऱ्या बिलाने ग्राहक त्रस्त झाला असून बिले कमी करण्यासाठी घरची सर्व कामे सोडून महावितरणच्या कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत.
जिल्ह्यातील अनेक भागातील ग्राहक सध्या अव्वाच्या सव्वा आलेल्या बिलाने त्रस्त झालेले असून महावितरणच्या कार्यालयात जाऊन बिले कमी करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या सर्व चुका वीज मीटरचे रिडिंग घेणाऱ्यांच्या असून त्याचा मनस्ताप मात्र ग्राहकांना सहन करावा लागत आहे. महावितरणने जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या मीटरचे रिडिंग घेण्यासाठी खासगी ठेकेदार नियुक्त केले आहेत.
या ठेकेदारांनी काही खासगी व्यक्तींची नियुक्ती करून त्यांच्याकडून ग्राहकांच्या मीटरचे रिंडिंग घेऊन त्यांना बिले पोहच केली जातात. अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात घरगुती मीटरचे रिंडिंग न घेताच मनमानी पध्दतीने युनिट टाकून बिले ग्राहकांच्या माथी मारले जात आहे. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे.
याबाबत अनेकांनी महावितरणच्या वरिष्ठांशी संपर्क साधून माहिती दिली आहे. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून तक्रारींची गांभिर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे ग्राहकांना न वापरता अतिरिक्त वीज बिल भरावे लागत आहे. तसेच बिल कमी करून घेण्यासाठी महावितरणच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
ठेकेदाराची यंत्रणा जागेवर बसून घेते रीडिंग
अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागात मीटरचे रीडिंग न घेता अंदाज पंचे बिले पाठविली जात आहे. काहीजण ग्राहकांनाच दूरध्वनी करून तुमच्या मीटरचे रिंडीग आलेले नाही. तुम्ही फोटो काढून पाठवा, असे सांगून रिंडिंग एका जागेवर बसून घेत आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक मीटरचे रिडिंग व बिल देण्याचे संबंधितांना पैसे मिळत असले तरी रिडिंगला घरोघरी न जाता एका जागेवर बसून सर्व व्यवहार संबंधितांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी वीज बिले हरवली जात असून ग्राहकांना घरी आणून दिली होती. आता डुप्लीकेट घेऊन बील भरा असाही सल्ला संबंधित यंत्रणेतील लोक देत आहेत.
शहरासह ग्रामीण भागातील घरगुती वीज ग्राहकांना नेहमीच अव्वाच्या सव्वा बिले येत आहे. महावितरणने नियुक्त केलेल्या ठेकेदरांची माणसे योग्य पध्दतीने कामकाज करीत नाहीत. त्याचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे. या महावितरणच्या कारभारात सुधारणा होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या प्रश्नावर वेळ प्रसंगी आंदोलन छेडू.
-राहुल कांबळे, नगरसेवक, केडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.