अहमदनगर : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ४.० अभियानांतर्गत महापालिकेला सहा कोटी रुपयांचा द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. राज्यात अहमदनगर महापालिकेने सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळवला आहे. आयुक्त यशवंत डांगे यांनी उपायुक्त पदावर कार्यरत असताना वसुंधरा अभियानासाठी विशेष परिश्रम घेतले होते.
माझी वसुंधरा अभियानात मागील वर्षी महानगरपालिकेला राज्यस्तरीय दुसरा क्रमांक मिळाला होता. यंदाही महानगरपालिकेने चांगली कामगिरी करत आपले स्थान कायम राखले आहे. भूमी, वायू, अग्नी, जल, आकाश या घटकात शासनाच्या निर्देशानुसार उपाययोजना करण्यात आल्या. शहरात या विषयी विविध अभियान राबवून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले.
महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विशेषतः घनकचरा व्यवस्थापन विभाग व सफाई कामगारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे महानगरपालिकेला ही कामगिरी करता आली. तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात पनवेल महानगरपालिकेला प्रथम व अहमदनगरला ६ कोटी रुपयांचे द्वितीय पारितोषिक राज्य शासनाने जाहीर केले आहे. केलेल्या कामाचे चीज झाले आहे. नागरिकांच्या व महापालिका प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे महानगरपालिकेला ही कामगिरी करता आली, अशी भावना आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केली.
१८ कोटींची बक्षिसे
स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराला थ्री स्टार मानांकन व हागणदारी मुक्त शहराचे प्रमाणपत्र प्राप्त केले. मनपाला माझी वसुंधरा अभियान २.० प्रथम क्रमांकाचे १.५० कोटी, माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये ‘ड’ वर्ग महापालिकेत द्वितीय ६ कोटी, यंदा माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये ‘ड’ वर्ग महापालिकेत द्वितीय ६ कोटी, या व्यतिरिक्त शहर सौंदर्यीकरणामध्ये पाच कोटी असे एकूण १८.५ कोटींचे बक्षीस मिळाले आहे.
असे राबविले अभियान
भूमी: देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली. रोपवाटिका तयार केल्या, हरित अच्छादने तयार केली. कचऱ्याचे घरोघरी जाऊन संकलन करून त्यावर प्रक्रिया केली. सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती केली. शहर हागणदारीमुक्त केले.
वायू : सण-उत्सवात फोडल्या जाणाऱ्या फटाक्यावर बंदी घातली. शहरात सायकल ट्रॅक तयार केला. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले. चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले.
जल : पाणीसाठ्यांची साफसफाई केली. सीना नदीपात्रात स्वच्छता केली. सार्वजनिक इमारतीचे वाटर ऑडिट केले. रेनवॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन दिले. गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड तयार केले.
अग्नी : एलईडी स्ट्रीट लाईट लावले, सोलर प्लॅन्ट उभारले. घरांवर सोलर बसविण्यासाठी जनजागृती केली. ग्रीन बिल्डिंगसाठी जनजागृती केली.
आकाश : स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली. शहर हरित करण्यासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना हरित शपथ दिली. शहरात अभियानाची पंचतत्त्वे दर्शविणाऱ्या वास्तू उभारणी, चौक सुशोभीकरण केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.