सोनई, : नेहमी शहरात पसरणारे धार्मिक द्वेषाचे लोण आता ग्रामीण भागात पसरत असल्याने तरुणाईला आवर घालण्याची कसरत पालकांना करावी लागत आहे. मोबाईल वरील स्टेट्स दंगलीस कारणीभूत ठरत असल्याने नेवासे तालुक्यातील शंभरहून अधिक गावांवर नजर ठेवण्याची कसरत तीन पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सुरु झाली आहे.
जिल्ह्यातील शेवगाव येथे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होवून दंगल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. येथील घटनेनंतर मोबाईलच्या स्टेट्सवर झेंडे,नकाशा आणि आपआपल्या थोर पुरुषांच्या छबी झळकू लागल्या. धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट युवकांच्या हातून प्रसारित होवू लागल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्यास अलर्ट राहण्याच्या सुचना दिल्या. वादग्रस्त स्टेट्सचे लोण ग्रामीण भागात पोचल्याने नेवासे तालुक्यातील गावागावात शांतता समितीच्या बैठका सुरु झाल्या आहेत.
नेवासे,सोनई व शनिशिंगणापुर पोलीस ठाण्याने कार्यक्षेत्रातील गावात नजर ठेवण्यास सुरुवात केली असून गोपनीय पथक युवकांच्या स्टेट्सवर लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यात कारवाईचा धडाका सुरु झाल्याने पालकांची चिंता वाढली आहे. मोबाईलवर प्रबोधन व सूचनांच्या पोस्ट फिरत असतानाही काही गावात धार्मिक द्वेष निर्माण करणा-या पोस्ट प्रसारित झाल्याचे प्रकार घडले.
नेवासे,सोनई पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत प्रत्येक घरातून युवकांवर अंकुश ठेवला तर विपरीत घटना घडणार नाही असे पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेचे संजय गर्जे यांनी सांगितले.
दोन समाजात तेढ निर्माण होईल असे छायाचित्र, वक्तव्य व पोस्ट सोशल मिडीयावर टाकणे गंभीर गुन्हा आहे.याबाबत सुचना देवूनही कृत्य घडवून आणले तर कठोर कारवाई केली जाईल.
- शिवाजी डोईफोडे, पोलीस निरीक्षक, नेवासे
सोनईला जेष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या विचारांचा वारसा असल्याने गावात नेहमीच जातीय सलोखा जपला गेला आहे. यापुढेही गावातील शांततेसाठी सर्वधर्मीय बांधव जागृत राहतील.
- धनंजय वाघ, सरपंच, सोनई
समाजातील सर्व युवक व जेष्ठांना एकत्र घेऊन सद्यस्थितीची कल्पना देण्यात आली आहे. एकोप्यात अधिक आनंद असल्याने भविष्यात वाईट कृत्य होणार नाही याकरीता काळजी घेतली जाईल.
- अॅड जमीर शेख, ग्रामस्थ, सोनई
सण,उत्सव, जयंती व अन्य सोहळ्यानिमित्त गावात लावलेले झेंडे अनेकदा दंगलीस कारणीभूत ठरु शकत असल्याने लावलेले झेंडे व फलक सोहळा झाल्यानंतर पुन्हा काढण्यात यावे अशी सूचना हद्दीतील ग्रामपंचायतीस दिली आहे.
- माणिक चौधरी,सहायक पोलीस निरीक्षक, सोनई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.