अहमदनगर : बीड येथून मुंबईच्या बाजारात विनापरवाना विक्रीसाठी चालविलेला तब्बल ६०० गोण्या रेशनिंगचा तांदूळ पोलिसांनी पकडला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर-जामखेड रस्त्यावरील कँटोन्मेंटच्या बंद टोलनाक्याजवळ ही कारवाई केली. याप्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून रेशनिंगचा तांदूळ व एक ट्रक, असा एकूण ५६ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
बीड येथून मुंबईतील बाजारात रेशनिंगचा तांदूळ विक्रीसाठी चालविला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार आहेर यांच्या पथकाने नगर-जामखेड रस्त्यावरील कँटोन्मेंटच्या बंद पडलेल्या टोलनाक्याजवळ सापळा लावला. यावेळी १४ टायर ट्रकमधून रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याचे निदर्शनास आले.
पथकाने कृष्णा गोविंद ढाकणे (वय ३१) व विवेक रामभाऊ ढाकणे (वय १९, दोघे रा. धनगरवाडी, डोईठाण, ता. आष्टी, जि. बीड) यांना ताब्यात घेतले. ट्रकमध्ये तांदळाच्या गोण्या भरलेल्या दिसल्या. त्यांनी हा माल प्रकाशजी धनराजजी तोतला व पवन प्रकाशजी तोतला (दोघे फरार, रा. वंजार गल्ली, जि. बीड) यांच्या मालकीचा असून, बीड एमआयडीसी येथील महेश गृहउद्योग येथील पत्र्याच्या शेडमधून शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेतील ५० किलो वजनाच्या ६०० गोण्या तांदूळ मुंबई येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली.
गोदामातच काळा बाजार
जिल्ह्यात रेशनिंगच्या धान्याची अनेक गोदामे आहेत. या ठिकाणाहून रेशनचे धान्य वितरित केले जाते. परंतु बहुतांश गोदामांत रेशनिंगच्या गोण्यांतील तांदूळ, तसेच धान्य काढून ते इतर गोण्यांमध्ये भरून त्याची विल्हेवाट काळ्या बाजारात लावल्याचे प्रकार यापूर्वी उघड झाले आहेत. पुरवठा विभागाने वेळोवेळी कारवाया करूनही हा प्रकार थांबण्यास तयार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.