उमेश मोरगावकर
पाथर्डी - पक्ष व सरकार तुमच्या बाजूने नसले तरीही चालेल पण तुम्ही खचून जाऊ नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी भूमिका जाहीर करत तालुक्यातील शेकडो समर्थकांनी पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यासाठी आर्थिक मदतीचा ओघ सुरु केला आहे. तालुक्यातून जवळपास चार ते पाच कोटी रुपयांचा निधी स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला देण्यास सुरूवात केली आहे.
मुंडे यांच्या ताब्यातील कारखान्यावर १९ कोटीच्या थकीत रकमेसाठी कारवाई करण्यात आली. राज्यात व देशात सध्या भाजपचे सरकार असूनही राज्यातील इतर कारखान्यांना मदत करण्यात आली, मात्र मुंडे यांच्या कारखान्याबाबत आखडता हात घेतला गेला. त्यामुळे मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यातच स्वतः पंकजा मुंडे यांनीही याबाबत भावना व्यक्त केल्या होत्या. ‘
मी कारखान्याच्या मदतीसाठी अनेक बँकाच्या हातापाया पडले, मात्र उपयोग झाला नाही. माझे वजन कमी झाले आहे,’असेही मुंडे जाहीरपणे म्हणाल्या होत्या. त्यामुळे भाजपमध्ये असलेले त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले. या पार्श्वभूमीवर पाथर्डी तालुक्यातील गोकुळ दौन्ड, अमोल गर्जे, दत्ता बडे, नितीन गर्जे, मुकुंद गर्जे, राजेंद्र दगडखैर आदींनी लाखो रुपयांच्या देणग्या मुंडे प्रतिष्ठानला जाहीर केल्या. इतरांनी सुद्धा पुढे येण्याचे आवाहन सोशल मीडियावर केले.
कोणत्याही परिस्थितीत पंकजा मुंडे यांना एकाकी पडू द्यायचे नाही, असा त्यांच्या समर्थकांचा सूर आहे. अनेकांनी मदत जाहीर करतानाच ‘ताई, आता तरी वेगळा पवित्रा घ्या’ असा सुद्धा सूर आळवला आहे. यासंदर्भात ‘आपणास मदत करा’ असे जाहीर वक्तव्य अद्याप पंकजा मुंडे यांनी केले नसले तरीही मदतीचा ओघ सुरु झाला असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
पंकजा मुंडे यांनी आपणास कोणतीही बँक मदत करत नाही, असे जाहीर केल्याने आम्ही मदत करण्यासाठी पुढे सरसावलो. आम्ही सुरु केलेल्या अभियानात संपूर्ण राज्यातील समर्थक सहभागी होऊन पंकजा मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत.
अमोल गर्जे, पंकजा मुंडे समर्थक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.