अहमदनगर: धीर सोडू नका; सर्व उसाचे गाळप होणार

जिल्ह्यात अद्यापही गाळपासाठी अठरा ते वीस लाख टन उभा आहे.
ऊस
ऊसsakal
Updated on

शिर्डी: अहमदनगर जिल्ह्यात अद्यापही गाळपासाठी अठरा ते वीस लाख टन ऊस उभा आहे. तुरे फुटल्याने हिरवे वाढे नष्ट झाले. तोडणी कामगारांचे वाढ्याचे उत्पन्न बंद झाले. रणरणत्या उन्हामुळे तोडणीचे काम करणे जिकिरीचे झाले. फड लोळल्याने उंदराचा उपद्रव आणि वजन घटू लागले. अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे उसाला पाणी देणे मुश्कील झाले. काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला. त्यामुळे उत्पादक रडकुंडीला, तर तोडणी कामगार घायकुतीला आले. तरीही येत्या मे महिन्यापर्यंत जिल्ह्यातील जवळपास सर्व उसाचे गाळप होईल, असा विश्वास जिल्ह्यातील साखर वर्तुळातून व्यक्त होतो आहे.

जिल्ह्याबाहेरील गळीत आटोपलेल्या कारखान्यांचे तोडणी मजूर जिल्ह्यात आणले जात आहेत. मात्र, कडाक्याच्या उन्हामुळे ते फार काळ थांबत नाहीत. मे महिन्यात तोडणी कामगारांना शेतीची मशागत करण्यासाठी घरी परतण्याचे वेध लागतात. यंदा कदाचित मे अखेरपर्यंत कारखाने सुरू ठेवण्याची वेळ येऊ शकते. अशा वेळी या कामगारांना थांबवून ठेवायचे कसे, असा प्रश्न निर्माण होईल. उसाला हिरवे वाढे नसल्याने तोडणी कामगारांचा उत्पन्नाचा स्रोत बंद झाला. त्यातच तोडणीसाठी शेतकरी घायकुतीला आला. त्यामुळे तोडणी कामगार शेतकऱ्यांकडून सर्रास पैसे घेतात. काही ठिकाणी तर शेतकी विभागाचे अधिकारीदेखील वाहत्या गंगेत हात धुऊन घेत शेतकऱ्यांना लुटण्याचा आनंद घेत आहेत.

यंदा उसाचे सरासरी हेक्टरी उत्पादन ८५ टन आहे. दर वर्षीच्या तुलनेत त्यात हेक्टरी दहा ते पंधरा टन वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एक ते दीड लाख टन उसाची वाढ झाली. त्यातून गळिताचे सुरवातीचे अंदाज चुकले. यंदा अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात विक्रमी म्हणजे सुमारे नऊ लाख टन ऊस होता. जिल्ह्यातील युटेक शुगर व प्रसाद शुगर हे दोन खासगी कारखाने वगळता अन्य सर्व कारखान्यांचे गाळप अद्याप सुरू आहे.

संगमनेर कारखान्याने दैनंदिन ऊसगाळप क्षमता साडेसात हजार टनांपर्यंत वाढविली. गणेश आणि राहुरी कारखान्यांचे गाळप सुरू राहिले. मुळा आणि ज्ञानेश्वर यांची गाळपक्षमता मोठी आहे. त्यामुळे अधिक ऊसउत्पादन होऊनही पुढील दाड महिन्यात जिल्ह्यातील सर्व उसाचे गाळप पूर्ण होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी को-२६५ ऐवजी को-८६०३२ उसाच्या लागवडीवर भर द्यायला हवा होता. आडसाली उसाचे क्षेत्र घटले आणि सुरू उसाचे क्षेत्र वाढले. एकाच वेळी हा ऊस गाळपाला आलाय. १९९० मध्ये सात जुलैपर्यंत कारखाने चालवावे लागले होते. २००९ मध्ये गाळपाविना ऊस शिल्लक राहिला होता. त्या तुलनेत यंदाची परिस्थिती बरी आहे. मेअखेर सर्व उसाचे गाळप होईल, यात शंका नाही.

मच्छिंद्र टेके पाटील, माजी सभापती, पंचायत समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()