अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील तीन रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार आहे. कोपरगाव व बेलापूर स्टेशनचा त्यांत समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत या स्थानकांसाठी ९३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. सोलापूर मंडलातील १५ स्टेशनवर जागतिक दर्जाची सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती वरिष्ठ मंडल सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम यांनी दिली.
रविवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता कलबुर्गी स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व स्थानकांवर तो कार्यक्रम दाखवला जाणार आहे.
भारतीय रेल्वे बोर्डाच्या वतीने मध्य विभागात ही योजना राबविली जात आहे. या कार्यक्रमासाठी नगर स्थानकात खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे, असे कदम यांनी सांगितले.
अहमदनगरच्या स्टेशनसाठी ३० कोटी ९२ लाख, बेलापूरसाठी ३१ कोटी ९६ लाख, कोपरगावसाठी २९ कोटी ९४ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील या तीन स्थानकांचा समावेश आहे. उर्वरित स्थानकांचाही टप्प्याटप्प्याने विकास केला जाणार आहे.
प्रवाशांना जागतिक दर्जाची सुविधा देण्यावर रेल्वेचे प्राधान्य आहे. प्रवाशांना प्लॅटफॉर्म अपुरे पडतात. त्यामुळे त्यांची लांबी वाढविली जाणार आहे. सरकते जिने बसविले जाणार आहेत. वीज, पाण्याचीही उत्तम दर्जाची सुविधा असेल. नगरमधून दररोज ५२ रेल्वेगाड्या धावतात. त्यांत मालगाड्यांचाही समावेश आहे. गहू, फर्टिलायझर, सिमेंटची वाहतूक होते. ४० रेक उतरविली जातात.
सरकते जिने, सुसज्ज प्लॅटफॉर्म
प्रवाशांना स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी प्रवेश दिला जाणार आहे. सध्या नगरला एकाच बाजूने प्रवेशद्वार आहे. लिफ्ट, तसेच एक्सलेटरही बसविले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सामानाची वाहतूक करणे सुलभ होईल. सुसज्ज प्रतीक्षालय उभारण्यात येणार आहे. शौचालयही सुविधापूर्ण असेल. पार्किंग व्यवस्थाही बदलली जाणार आहे. सर्वत्र लाइटिंग केली जाईल. डिजिटल घड्याळ, वॉटर कुलर, वातानुकूलित सुविधा मिळेल. स्थानकाच्या छतावर प्लाझा उभारणार आहेत.
हेरिटेज लुक कायम
स्थानकांचा विकास करताना त्यांचा हेरिटेज लुक तसाच ठेवला जाणार आहे. स्थानक असलेल्या शहरातील, जिल्ह्यातील कला, संस्कृतीचा या आधुनिकीकरणात विचार केला गेला आहे. तेथील वैशिष्ट्यांची छायाचित्रे स्थानकांत लावली जातील. सर्व प्लॅटफॉर्मना आच्छादित केले जाईल. सुविधांबाबत नागरिकांचेही मत जाणून घेतले जाणार आहे. त्यांना drmoffice211@gmail.com या मेल आयडीवर १५ ऑगस्टपर्यंत सूचना पाठविता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.