अहमदनगर : शिक्षकांची सध्या विद्यार्थ्यांचा निकाल बनविण्याची घाई सुरू आहे, तर दुसरीकडे आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळावीत यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. ‘बालभारती’कडे जिल्हा परिषदेने सुमारे २२ लाख एक हजार ६६६ पुस्तकांची मागणी नोंदविली आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक व स्वाध्याय पुस्तिकांचे बालभारती भांडाराकडून वितरण केले जाते. ही पाठ्यपुस्तके जिल्हा परिषद, खासगी प्राथमिक, अनुदानित आदी शाळांना वितरित केली जातात.
दर वर्षीप्रमाणे यंदाही शाळा सुरू होण्याअगोदरच पाठ्यपुस्तकांची मागणी ‘बालभारती’कडे जिल्हा परिषदेतर्फे नोंदविण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाल्यानंतर त्यांचे चेहरे आनंदाने खुलतात. कोरोनामुळे मागील वर्षी पुस्तकांची छपाई उशिराने झाल्याने विद्यार्थ्यांना उशिरा पुस्तके मिळाली. मात्र, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने, वेळेत अन् शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडतील, याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या वर्षी पहिली ते आठवीपर्यंत एकूण पाच लाख ४९ हजार ४ विद्यार्थी असून, त्यांच्यासाठी २२ लाख एक हजार ६६६ पुस्तकांची मागणी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थिसंख्या वाढली असून, त्यामुळे पुस्तकांची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षी कोरोना काळात विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी उत्कृष्ट नियोजन करीत, सर्वांना वेळेत पुस्तके पोचण्यासाठी पाठपुरावा केला होता.
वर्गनिहाय विद्यार्थिसंख्या (कंसात पुस्तकांची मागणी)
पहिली ते पाचवी ः २४४२२६ (१०५१३७९)
सहावी ते आठवी ः ३०४७७८ (११५०२८७)
एकूण विद्यार्थी ः ५४९००४ (२२०१६६६)
मागील वर्षीची आकडेवारी
शाळा ः ४४२९
विद्यार्थिसंख्या ः ४३६२१९
पहिलीची दप्तराच्या ओझ्यातून सुटका
पहिलीच्या विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका झाली आहे. पहिलीसाठी सर्व विषय मिळून एकच पुस्तक राहणार आहे. ते दर तीन महिन्यांनी बदलणार असून, चार भागांत राहणार आहे. त्यामध्ये सर्व विषयांचा अभ्यास राहणार आहे.
पारनेर अन् संगमनेरात एकच पुस्तक
एकात्मिक विकास योजना संगमनेर व पारनेर या तालुक्यांना लागू आहे. या दोन्ही तालुक्यांतील विद्यार्थ्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका झाली आहे. या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी तीन पुस्तके अभ्यासक्रमासाठी आहेत. राज्यात या उपक्रमात पूर्वी ५५ तालुक्यांचा सहभाग होता. आता १०० तालुक्यांचा झाला आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके विद्यार्थ्यांच्या मिळावीत, यासाठी शिक्षण विभागाचे नियोजन आहे. या नियोजनातून पाच लाख ४९ हजार चार विद्यार्थ्यांकरिता पुस्तकांची मागणी ‘बालभारती’कडे केली आहे.
-भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.