अहमदनगर: प्रत्येक कॉलमवर शिवचरित्राची रेखाटने, मल्टिकलर सिस्टीम, ॲम्फी थिएटर, तीन चौकांत आकर्षक झाडे, पुलाखाली बगीचा, अशा वैविध्याने नगर शहराचे वैभव ठरणारा उड्डाणपूल नटणार आहे. या आगळ्यावेगळ्या सुशोभीकरणाची संकल्पना खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांची आहे. एप्रिलमध्ये हे काम सुरू होईल. दिवाळीलाच उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या वर्षभरात नगर शहराचे रुपडे बदलणार आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे मुख्यालय असलेले नगर शहर हे गेल्या अनेक वर्षांपासून टीकेचे लक्ष्य राहिले. ‘मोठं खेडं’ ही उपाधी उपरोधात्मक पद्धतीने देण्यात येते. हाच मुद्दा खासदार व आमदारांना खटकला. शहराचे रूपच बदलायचे, हा ध्यास घेऊन भाजपचे खासदार डॉ. विखे पाटील व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जगताप हे दोन्ही तरुण नेते एकत्र आले. विशेष म्हणजे राजकीय जोडे बाजूला ठेवून त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला. कोणत्याही परिस्थितीत वर्षअखेरीस नगर शहर पर्यटकीय केंद्र होईल.याचे उद्घाटनही अत्यंत आकर्षक पद्धतीने सांस्कृतिक महोत्सव भरवून केले जाईल, असे खासदार व आमदारांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रारंभी हे केले
- उड्डाणपुलासाठीच्या सर्व अडचणी दूर केल्या
- सैनिकी हद्दीतील जागा मिळवून दिली
- काही खासगी जागांचे हस्तांतर
- उड्डाणपुलासाठी आवश्यक परवानग्या मिळविल्या
- तांत्रिक अडचणी दूर केल्या
- निधीसाठी विशेष पाठपुरावा केला शिवचरित्र रेखाटणार
पुलाच्या कॉलमवर दोन्ही बाजूंनी शिवचरित्र रेखाटण्यात येणार आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेक, तसेच जीवनातील महत्त्वाचे प्रसंग असतील. पुढील पिढीला ही चित्रे प्रेरणादायी ठरतील. त्यामुळे हा उड्डाणपूल पर्यटकांचे आकर्षण, शालेय सहलींसाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
आकर्षक विद्युत रोषणाई
पुलाखाली अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे नियोजन आहे. प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन, थोरांच्या जयंती, राष्ट्रीय सण, महत्त्वाचे सण या दिवशी वेगवेगळे रंग आपोआप बदलणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
तीन मोठे चौक होणार खास
पुलाखालील सक्कर चौक, मार्केट यार्ड चौक, चांदणी चौक या तीन चौकांत खास सुशोभीकरण होईल. तेथे शोभेची कृत्रिम भव्य झाडे उभारली जातील. आतील बाजूने ‘अवकाश’ तयार करण्यात येईल. त्यात चांदण्या चमकतील. या झाडांवर विशेष रोषणाई केली जाईल. खाली सुंदर बगीचा असेल. कॉलमवर महत्त्वाची चित्रे असतील. त्यामुळे हे तीनही चौक पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरणार आहेत.
खर्च फिफ्टी-फिफ्टी
उड्डाणपुलासाठी खासदार व आमदार हे दोन्ही वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ नगर शहराच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकल्पात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसेल. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना, नागरिकांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी लागणारा खर्च दोन्ही नेते समसमान करणार आहेत.
उद्घाटनाचा कार्यक्रम भव्य-दिव्य
‘न भूतो न भविष्यति’ असा उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्या दिवशी सांस्कृतिक महोत्सव भरविण्यात येईल. यापूर्वी कधीच झाला नाही व भविष्यातही होण्याची शक्यता नाही, असा कार्यक्रम करण्याचा मनोदय खासदार व आमदारांनी व्यक्त केला.
नगर शहर हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. गेल्या अनेक दिवसांच्या प्रयत्नांतून हा पूल उभारला जात आहे. त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी मी व आमदार संग्राम जगताप एकत्रित प्रयत्न करीत आहोत. लवकरच शहराचे रूप बदलेल.
- डॉ. सुजय विखे पाटील, खासदार
उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू आहे. सुशोभीकरणाचे काम एप्रिल महिन्यात सुरू होईल. त्याचे उद्घाटन अत्यंत वेगळ्या पद्धतीने होणार आहे. हा कार्यक्रम नगरकरांच्या कायम स्मरणात राहील.
- संग्राम जगताप, आमदार आकडे बोलतात
८५ एकूण कॉलम
५.५. मीटर पुढील कॉलमचे पूर्ण सुशोभीकरण करणार
७० कॉलमचे सुशोभीकरण होणार
३ चौकांमध्ये शोभेची कृत्रिम झाडे उभारणार (सक्कर चौक, मार्केट यार्ड, चांदणी चौक)
३२ कॉलमवर शिवचरित्र रेखाटणार
३२ कॉलमवर प्लेन रंग
२ ठिकाणी ॲम्फी थिएटर
२० लाख रुपये एका झाडाला खर्च
१.२५ कोटी अंदाजे खर्च
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.