अकोले - ‘ती’च्या फुलांना स्वप्नांचा गंध’ या मथळ्या खाली दैनिक ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित होताच रतनवाडी येथील सोनाली ज्ञानेश्वर वैराळ या चिमुरडीचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक दानशूर दात्यांचे हात पुढे आले आहेत. मायेचा आधार मिळाला अन् तिच्या शिक्षणाचा, वसतिग्रहात राहण्याचा सर्व खर्च एका सेवानिवृत्त शिक्षकाने उचलला आहे. त्यामुळे सोनाली १५ जूनपासून आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी राजूर येथील शाळेत व वसतिगृहात प्रवेश घेणार आहे.
सोनाली पाचवी इयत्तेत शिकते. वर्गात तिचा नेहमी पहिला नंबर येतो. तिची आई तिला सोडून गेली, तर ती व तिची आजी एक भाऊ, वडील, असा परिवार आहे. घरची परिस्थिती अठरा विश्व दारिद्र्य, मग आपल्या कुटुंबास हातभार लागावा, आपले शिक्षणासाठी थोडेफार पैसे मिळावेत. म्हणून ती पहाटे पाच वाजता उठून जंगलातील रानफुले वेचून तिचे गुच्छ बनवते.
हे आकर्षक रंगीबेरंगी रानफुलांचे गुच्छ अमृतेश्वर मंदिरात जाऊन मंदिराबाहेर बसून विकते. शनिवारी, रविवारी सुटीमध्ये पर्यटकांची संख्या बरी असते, गाडी थांबली की, सोनाली पळत गाडीजवळ जाते अन् गाडीतील पर्यटकांना हातातील रानफुले महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी ‘ताजी फुले घ्या..., दहा रुपयाला एक गुच्छ..,’ अशी विनंती करते. प्रत्येक पर्यटक तिच्या आर्जव विनंतीचा मान ठेवत फुले घेतोच घेतो. गाडीतून येणारा प्रत्येक जण फुले घेऊन महादेवाच्या पिंडीवर अर्पण करतो. त्यामुळे सोनाली खुष असते.
गर्दी संपली की, सोनाली पुन्हा मंदिरात येऊन पिंडीवरील सर्व फुले काढून मंदिर स्वच्छ करते व आपल्या घरी निघून जाते. हे वृत्त प्रसिद्ध होताच या चिमुरडीला एका सेवानिवृत्त शिक्षकाने मदतीचा हात देत तिच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.
उरलेले पैसे आजीकडे देते
सोनाली वैराळ म्हणते, मला पोलिस अधिकारी होऊन देशसेवा करायची आहे. त्यामुळे रोज अमृतेश्वर मंदिरात जंगलातील फुले आणून विकते. त्यातून मला रोज ५० ते १०० रुपये मिळतात. त्यातून माझे शालेय साहित्य, ड्रेस, अन्य खर्च भागवते आणि उरलेले पैसे आजीकडे देते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.