नेवासे : येथील ॲड. मोअज्जनखान पठाण यांच्या उच्चशिक्षित कुटुंबाने पंचवीस वर्षांपासून ऊसपट्ट्यात निर्यातक्षम व दर्जेदार केळीउत्पादनाचा आदर्श जपला आहे. एकत्रित कुटुंबाच्या १२० एकर जमीन क्षेत्रापैकी सध्या त्यांच्याकडे २० एकर केळी असून, यंदा सौदी अरेबिया, इराणमध्ये केळीची निर्यात केली आहे. ऊस, कापसाचेही यशस्वी उत्पादन घेत पठाण कुटुंबाने शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.
नेवासे येथे (स्व.) अॅड. जमशीदखान समशेरखान पठाण व रशीदखान समशेरखान पठाण या भावंडांचे एकत्र कुटुंब नांदते आहे. कुटुंबातील अॅड. मोअज्जमखान रशीदखान पठाण, आजमखान रशीदखान पठाण, मजहरखान जमशेद खान व दिवंगत अॅड. रियाज जमशेदखान पठाण या चौघा चुलत भावंडांचे १६ सदस्यीय कुटुंब सध्या शेतीत विविध प्रयोग करत आहे. नेवासे परिसरात बऱ्यापैकी पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी उसाचे पीक घेतले जाते. मात्र पठाण कुटुंबाने १९९७ पासून केळीचे उत्पादन घ्यायला सुरवात केली. तसेच ऊस पट्ट्यात यशस्वीरीत्या केळीचे पीक घेतले.
आज या भागात पठाण यांच्या पुढाकारातून शेकडो शेतकरी उत्पादन घेत आहेत. यंदा पठाण यांच्याकडे ३० एकर केळीचे क्षेत्र असून, दर्जेदार केळीचे उत्पादन घेत गुजरातच्या देसाई ग्रुपच्या माध्यमातून ७६ टन केळीची सौदी अरेबिया, इराणला निर्यात केली आहे. केळीचे कुकुंबर मोझॅक, रस शोषणाऱ्या किडी, तंबोरा रोगापासून बचाव करण्यासाठी संरक्षित पिशवीसह इतर प्रयोग ते करतात. शेणखतासह सेंद्रिय खताचाही वापर करतात. याशिवाय तागासारख्या हिरवळीच्या खताचाही ते वापर करतात.
"एकत्रित कुटुंब व शेतीतील विविध प्रयोगामुळे समाधान मिळते. वकिली क्षेत्रात असूनही शेतीत वेगवेगळे प्रयोग राबवतो. केळीची निर्यात होत असल्याने दर्जेदार केळी उत्पादनाचे समाधान आहे. शेतीवर प्रेम करण्याचा व त्यातून मिळणारा आनंद वेगळाच असतो."
- अॅड. मोअज्जमखान पठाण, शेतकरी, नेवासे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.