केडगाव ः गुळात साखर, रंग, चॅाकलेट, अशास्त्रीय रसायन आढळले संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनचे विधी अधिकारी संपत देशमुख व सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिला आहे.
गूळ जनजागृतीस्तव अन्न व औषध प्रशासन विभागाने गूळ उत्पादक व विक्रेते यांची कार्यशाळा आज केडगाव येथे घेतली. त्यावेळी देशमुख व देसाई बोलत होते. कार्यशाळेस माजी आमदार रमेश थोरात यांनी भेट दिली. यावेळी संतोष पिसे, दिलीप हंडाळ, सोमनाथ ताकवणे, सुनील मोहिते, दिगंबर चव्हाण, अक्षय गायकवाड आदी गु-हाळ चालक उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, राज्यात ३२ टक्के ऊस गुळासाठी वापरला जातो. गूळ भेसळीबाबत राज्यात कुठेही कारवाईसाठी गेले की, तेथे दौंडच्या गुळाचा प्रश्न उपस्थित होतो. इतका दौंडचा गूळ बदनाम झाला आहे. मात्र दौंडमध्ये एक नंबर प्रतिचा गूळ बनविणारे आहेत. चुकीच्या उत्पादकांमुळे चांगला गुळाला बाजार मिळेना झाला आहे. गूळ बनवताना गैर प्रकार करणा-या उत्पादकांवर आम्ही कारवाई करण्याचा ठाम निश्चय केला आहे. दोषींना सहा महिन्यांचा कारावास व पाच लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.
मार्क लॅबच्या डॅा. वसुधा केसकर म्हणाल्या, गुळातील साखरेची भेसळ लपविण्यासाठी विविध रंग वापरले जातात. हे शरीराला घातक आहेत. गुळात आद्रता कमी असेल तर जास्त टिकतो. गूळ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेटीया म्हणाले, गूळ बनविताना तो आपल्या मुलाला खायला देऊ शकतो का याचा झाला पाहिजे.
राज्य गूळ समितीचे सुरेश शहा म्हणाले, गुळातील साखर भेसळीबाबत व्यापा-यांनी उत्पादकांकडे बोट दाखवायचे आणि उत्पादकांनी व्यापा-यांकडे बोट दाखवायचे ही पळवाट आहे. नियमात गूळ तयार करून आपणच आपले नाव उज्वल करू. रमेश थोरात म्हणाले, तालुक्यात ४५ लाख टन ऊस उत्पादन असल्याने गु-हाळांना पर्याय नाही. गु-हाळ मालकांनी शिस्त पाळणे गरजेचे आहे.
परवाने काढा नाही तर कारवाईला सामोरे जा.
सहआयुक्त देसाई म्हणाले, ''दौंडच्या गुळाची भीती वाटते इतका धोकादायक पद्धतीने गूळ बनवला जातो. दौंडमध्ये सुमारे ७०० गु-हाळघरे आहेत. त्यापैकी फक्त १८० उत्पादकांकडे परवाने आहेत. येत्या दहा दिवसात परवाने काढा नाही तर कारवाईला सामोरे जा. दूधात दूध भुकटी टाकणे गुन्हा आहे त्याच प्रमाणे गुळात साखर मिसळणे हा देखील गुन्हा आहे.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.