श्रीगोंदे (जि.अहमदनगर) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीने भाजप व काँग्रेस पक्ष तयारीला लागले आहेत. खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी शनिवारच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांसह लोकांशी संवाद साधत आढावा घेतला. नगरला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या बैठकीत इतरांसोबत श्रीगोंद्याचा आढावा घेत ‘कामाला लागा’ असा आदेश दिला. तथापि, तालुक्यात राष्ट्रवादीच्या गोटात शांतता दिसत आहे. (Bjp-NCP-congress-political-news-shrigonda-marathi-news)
श्रीगोंद्याचा आढावा घेत ‘कामाला लागा’ असा आदेश
खासदार डाॅ. विखे पाटील यांनी महामार्गाच्या कामाची पाहणी करण्याबरोबरच आढावा बैठक घेऊन तालुक्यातील राजकारण समजून घेतले. खासदारकीचे संभाव्य उमेदवार पारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्यावर तोफ तर डागली. मात्र नामोल्लेख न करता तो वार इतरांनीही लागू पडेल्याचे कसब त्यांनी दाखविले. विकासकामांत ठेकेदारांकडून नेते टक्केवारी घेतात, हे स्पष्ट करीत पुढच्या निवडणुकीत सगळा हिशोब मांडू, असे सांगत निवडणुकांची तयारी सुरु केल्याचे दाखविले. दौऱ्यात विखे गटाची विभागणी झाल्याचे लक्षात आल्यावर भाषणात कुणाचेही नाव न घेता त्यांनी सगळे आपलेच आहेत, ही राजकीय परिपक्वता दाखविली.
पक्षाचे पुढचे नेमके काय ठरत आहे, याबद्दलच वेगळीच चर्चा
नगरला महसूलमंत्री थोरात यांनी तालुकानिहाय बैठका घेऊन निवडणुकांची चाचपणी केली. तीत श्रीगोंद्यातून जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, तालुकाध्यक्ष दीपक भोसलेंसह कार्यकर्ते उपस्थितीत होते. तालुक्यातील पक्षाची जबाबदारी नागवडे यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्या उमेदवार राहतील, हेही त्यातूनच पुढे येत आहे. नागवडे कुटुंबाला पुढच्या निवडणुका ताकदीनिशी लढाव्या लागतील, हेही स्पष्ट असल्याने तेही तयारीत दिसत आहेत.
एकीकडे भाजप, काँग्रेस कुठल्या ना कुठल्या माध्यमातून चर्चेत येण्याचा प्रयत्न करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील नेते मात्र शांत आहेत. मुळात राष्ट्रवादीचे काही नेते भाजप व काँग्रेस नेत्यांसोबतच कार्यक्रमात जास्त दिसत असल्याने पक्षाचे पुढचे नेमके काय ठरत आहे, याबद्दलच वेगळीच चर्चा आहे. माजी आमदार राहुल जगताप व प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी कार्यकर्त्यांनी एकत्रित आधार देण्यासाठी तरी मेळावा घेण्याची गरज आहे. मात्र अजून तरी तसे होताना दिसत नाही.
खासदारांनी केले थोरातांना लक्ष्य
खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या बैठकीत वाळू चोरी व प्रशासनाचे आर्थिक संबंध यावर थेट आरोप झाले. हे पैसे पुढे नेमके कुठे जातात, असा प्रश्न विचारत विखे पाटील यांनी टाकलेली गुगली सगळ्यांच्या लक्षात आली होती. थोड्याच दिवसात या प्रकरणाचा पर्दाफाश करणार असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. त्यामुळे महसूलमंत्री थोरात यांच्या विभागाला श्रीगोंद्यात चेक देत काँग्रेसला टक्कर देणार असल्याचे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.