Ahmednagar News : महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत आज एक हजार ५६० कोटी ९१ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सूचविली नाही. परंतु महापालिका नगरकरांना मोजून पाणी देणार आहे. त्यासाठी नळांना मीटर, तर उपनगरांसाठी स्वतंत्र भूयारी गटार देणार आहे.
प्रशासक तथा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी आज एक हजार ४०० कोटी ९१ लाखांचे मूळ अंदाजपत्रक प्रशासकीय स्थायी समितीला सादर केले. स्थायीने त्यात वाढ सूचवून एक हजार ५६० कोटी ९१ लाखांचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले.
महासभेने त्यास मंजुरी दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, डॉ. सचिन बांगर, प्रभारी उपायुक्त सपना वसावा, नगरसचिव मेहेर लहारे, मुख्यलेखाधिकारी डॉ. सचिन धस, मुख्यलेखापरीक्षक विशाल पवार आदी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. जावळे यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात शहर विकासासाच्या दृष्टीने भरीव तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न ४३० कोटी ८ लाख, तर भांडवली जमा एक हजार ५० कोटी ८ लाख अपेक्षित आहे.
तसेच महसूली उत्पन्नात संकलित करापोटी १०३ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. उपनगरांसाठी स्वतंत्र भुयारी गटार योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शहरातील चौकांचे लोकसहभागातून सुशोभीकरण, महापालिका शाळांचे डिजिटायझेशन, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, उद्यानांची दुरुस्ती अशा विविध सेवा-सुविधांवर अंदाजपत्रकात भर देण्यात आला आहे.
शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात अनधिकृत नळजोडांची संख्या समोर येणार आहे. नळांना मीटर बसविण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. मंजुरीनंतर प्रत्येक नळाला मीटर बसविण्यात येणार आहे. त्यातून मोठी पाणी बचत होणार आहे.
पाणीपुरवठ्यासाठी सुमारे ४९५ कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित आहेत. या योजना दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहेत. त्यात महापालिकेला स्वहिस्सा भरावा लागणार आहे. त्यासाठी दीडशे कोटी रुपये कर्ज घेण्यात येणार आहे. अमृत योजनेअंतर्गत उपनगरांत भुयारी गटार योजना (फेज २) राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात शंभर कोटींची तरतूद आहे.
वेतन व भत्ते - १६९
पेन्शन - ४९
पाणीपुरवठा वीजबिल - ३६
पथदिवे वीजबिल - ६
शिक्षकांचे वेतन - ७
कचरा संकलन - २
टँकरने पाणीपुरवठा - ३
वाहन खरेदी - १
नवीन रस्ते - ५०
रस्ते दुरुस्ती - ४
पुतळे बसविणे - २
उपनगरांसाठी भुयारी गटार
मीटरद्वारे पाणीपुरवठा
शाळांचे डिजिटायझेशन
चौकांचे सुशोभीकरण
अग्निशमन वाहन खरेदी
महिलांसाठी विविध योजना
दिव्यांगांसाठी विशेष तरतूद
मालमत्तांचे सर्वेक्षण
उद्यानांची दुरुस्ती
नगरकरांवर कोणतीही करवाढ लादण्यात आलेली नाही. अंदाजपत्रक सादर करताना सेवा-सुविधांवर भर देण्यात आलेला आहे. उपनगरांसाठी स्वतंत्र भुयारी गटार योजना, मीटरद्वारे पाणीपुरवठा, चौकांचे सुशोभीकरण, चांगले रस्ते यासारख्या सुविधांसाठी अंदाजपत्रकात तरतूद आहे. रस्त्यांची कामेदेखील मार्गी लागतील. महिला व बालकल्याणसाठी मोठी तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
- डॉ. पंकज जावळे, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.