अकोले : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक पुरस्कृत व बायफ संचलित बीज बँक प्रकल्पांतर्गत अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे रानभाजी महोत्सव व गावरान बियाणे प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश रानभाज्यांबद्दलच्या स्थानिक ज्ञानाचे संकलन करणे, त्यांची सद्यस्थिती पाहणे, जाणीव जागृती करणे आणि त्यांच्या संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी प्रोत्साहन देणे हा होता.
...सुमारे 85 प्रकारच्या रानभाज्या
या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या 13 गावांमधून पारंपारिक बीज संवर्धन करणाऱ्या तज्ञ महिलांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी आदिवासी भागातील जंगलामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध जंगली भाज्या व त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. सुमारे 85 प्रकारच्या रानभाज्या व त्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ प्रदर्शनात मांडण्यात आले होते. चीचुर्डा, भारंगी, आळवड, भोकर, दोडकी, पंधा, बर्की, तेरा, मेक, चाई, फांदी, कौला, चितरुक, बांबू भाजी, कुर्डू, अंबाडी, दिवा, पडदा, करंदा, केना, घोळू अशा नानाविध प्रकारच्या रानभाज्यांनी परिसर नटून गेला होता. विविध गावातून आलेल्या महिला सहभागधारकांनी अतिशय नियोजनपूर्वक या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
रानभाज्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या
या महोत्सवासाठी शबरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नितिन पाटील (IAS), पद्मश्री. बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे, अन्नमाता ममताबाई देवराम भांगरे, बायफ संस्थचे विषय तज्ञ संजय पाटील, जलतज्ञ रामनाथ नवले, विभागीय अधिकारी जितीन साठे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले, एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय राजुरचे निरीक्षक श्री. गंगाराम करवर व श्री. श्याम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विषय तज्ञ संजय पाटील यांनी रानभाज्या आणि त्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यान सुरू असताना त्यांनी उपस्थित सर्व महिला सहभागधारकांना विविध प्रकारचे प्रश्न विचारून रानभाज्यांची विविध गुण वैशिष्ट्ये आणि उपयोग याविषयी माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख जितीन साठे यांनी केले. महोत्सवाला भेट दिल्यानंतर पाटील यांनी प्रकल्पांतर्गत विविध पिकांचे प्रात्यक्षिके आणि वीज निर्मिती उपक्रमांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान त्यांनी मारुती भांगरे, प्रकाश भांगरे यांच्या शेतावर घेतलेल्या नागली, वरई आणि भात पिकांचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहिले.
भोपळ्याची लागवड बघून पाहुणे आश्चर्यचकित
अन्नमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममताबाई भांगरे यांच्या बीजनिर्मिती उपक्रमाला त्यांनी भेट दिली. मुख्यत्वे परसबागेमध्ये लागवड करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे बियाणे ममताबाई भांगरे यांच्या शेतावर केले जाते. या बीजनिर्मिती उपक्रमाची पाहणी करताना ममताबाई भांगरे यांनी गावरान दुधी भोपळ्याची केलेली लागवड व त्याला लागलेली फळे बघून पाहुणे आश्चर्यचकित झाले. संपूर्ण कार्यक्रम अतिशय जिव्हाळ्याने बघत शेतकऱ्यांचे मनोबल त्यांनी वाढवले. दरम्यान ममताबाई भांगरे यांनी लागवड केलेल्या दुधी भोपळ्याचा वेल बघून पाटील भारावून गेले. त्यांनी या परिवारासह भोपळ्याच्या मंडपात छान फोटो काढले. अतिशय आपुलकीने उपक्रमांची पाहणी करून संपूर्ण सहभागधारकांचे व प्रकल्प राबवणाऱ्या टीमचे मनापासून आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्प समन्वयक योगेश नवले ,परिसरातील महिला सहभागधारक तसेच संस्थेचे सहकारी रामकृष्ण भांगरे, खंडू भांगरे, आनंदा घोलवड, मयूर रहाणे, विवेक दातीर, अश्विनी हासे, देवराम भांगरे, यांनी विशेष योगदान दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.